घरदेश-विदेशआता करोनासोबत जगायचं!

आता करोनासोबत जगायचं!

Subscribe

सरकारसह सर्वांचीच चलबिचल

सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांची सांगा कसं जगायचं ही कविता सध्याच्या करोनाजन्य परिस्थितीला चपखल लागू पडते.
करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन लागू केला. हा लॉकडाऊन चक्क १७ मेपर्यंत लांबला आहे. मंगळवारी या लॉकडाऊनला ४२ दिवस पूर्ण होत आहेत. मात्र देशात करोनाचे रुग्ण काही कमी झाले नाहीत. लॉकडाऊन अजून किती काळ सुरू ठेवायचा, याचा नेमका अंदाज कोणालाच घेता येईनासा झाला आहे. उलट लॉकडाऊनमुळे दुकाने, उद्योगधंदे बंद असल्यामुळे सर्वसामान्यांपासून उद्योगपतींपर्यंत सर्वांचेच हाल झाले आहेत.

- Advertisement -

हे लक्षात घेऊन इन्फोसिस कंपनीचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी, सरकारने हळूहळू उद्योगधंदे सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करतानाच आपण करोनासोबत जगायला शिकले पाहिजे, असा विचार मांडला. त्यामुळे सरकारसह सर्वांचीच चलबिचल सुरू झाली असून लॉकडाऊन की करोनासोबत जगायचं, हा प्रश्न आता गंभीर होऊ लागला आहे. करोनाचा विषाणू देशात दाखल झाल्यानंतर त्याचा संसर्ग पसरू नये म्हणून २४ मार्च रोजी देशात लॉकडाऊन करण्यात आला. देशातील उद्योगधंदे, आस्थापने, दुकाने बंद करण्यात आली. करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विविध महानगरपालिकांकडून आवश्यक ते उपाय योजण्यात येत होते. मात्र देशभरात करोनाचा संसर्ग काही कमी झालेला नाही.

तो दिवसेंदिवस वाढतच होता. मात्र लॉकडाऊनदरम्यान, देशातील उद्योगधंदे बंद असल्यामुळे रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत होता. ३ मे रोजी दुसरा लॉकडाऊन संंपल्यानंतर केंद्र सरकारने देशात ग्रीन, ऑरेंज, रेड, बाधित क्षेत्र आणि महापालिका-मुंबई, एमएमआर, मालेगाव, असे विभाग केले. तर राज्य सरकारने त्यापैकी ग्रीन झोनमधील उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली. तसेच बाधित क्षेत्र सोडून प्रत्येक विभागात एकल दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र राज्य सरकार, जिल्हाधिकारी, महापालिका यांच्यामधील समन्वयाचा अभाव आणि स्पष्ट गाईडलाईन्स नसल्यामुळे दुकाने सुरू झाली नाहीत. तसेच खाजगी उद्योगही सुरू होऊ शकले नाहीत. राज्य सरकारला महसूल मिळेल, यासाठी दारूची दुकाने सुरू करण्याचे आदेश दिले, मात्र त्यातही गोंधळ असल्यामुळे अद्याप सर्व दारूची दुकाने सुरू झालेली नाहीत.

- Advertisement -

या परिस्थितीचा आढावा घेत असतानाच इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती यांनी अजून किती दिवस उद्योग बंद ठेवणार, असा सवाल उपस्थित करत अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर आपल्याला करोनासह जगावेच लागेल, असेही त्यांनी म्हटले. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीही लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार असल्याचे भाकित करताना करोनासह जगण्याचा सल्ला दिला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही करोनासोबत जगूया, असे स्पष्ट करत दुकाने, रोजगार सुरू करण्याची मागणी केली. तर उद्योजक आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनीही राज्यात आता उद्योगधंदे सुरू करण्याची शिफारस केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. त्यामुळे लॉकडाऊन कायम ठेवायचा की करोनासह जगायचे, असा प्रश्न उपस्थित झाला असून राज्य सरकार आणि जनतेमध्येही चलबिचल निर्माण होऊ लागली आहे.

कायमचे लॉकडाऊन करणे सोपे आहे. पण ते अर्थव्यवस्थेला पूरक नाही. लॉकडाऊन उठवताना भारताने हुशारी दाखवायला हवी. लॉकडाऊन उठवले आणि पुन्हा मोठ्या प्रमाणात करोनाबाधित सापडले तर अजून एक लॉकडाऊन सरकारची पत आणि आत्मविश्वासाला घातक ठरेल.
-रघुराम राजन, माजी गव्हर्नर, आरबीआय.

भारत लॉकडाऊनच्या परिस्थितीत दिर्घकाळ राहू शकत नाही. ठराविक कालावधीनंतर देशातील भूकबळी, करोनामुळे होणार्‍या बळींच्या संख्येला मागे सोडतील. देशात ९ दशलक्ष लोक नैसर्गिक मृत्युमुखी पडतात. त्याची तुलना मागील दोन महिन्यात झालेल्या एक हजार बळींशी केली तर घाबरून जाण्याचे कारणच उरत नाही.
-नारायणमूर्ती, संस्थापक, इन्फोसिस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -