घरमहाराष्ट्रमहापालिका निवडणूक कधी होईल हे ईश्वर आणि न्यायालयालाच ठाऊक : फडणवीस

महापालिका निवडणूक कधी होईल हे ईश्वर आणि न्यायालयालाच ठाऊक : फडणवीस

Subscribe

न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिल्याने निवडणुकीचा विषय हा न्यायालय आणि आयोगाकडे आहे. त्यामुळे महापलिका निवडणुका कधी होतील हे ईश्वर आणि न्यायालयालाच ठाऊक असल्याचे फडणवीस म्हणाले.

मुंबई : इतर मागासवर्ग समाजाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाल्यानंतरही स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः महापालिका निवडणुकीचा संभ्रम कायम आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिवाळीनिमित्त पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना महापालिका निवडणूक कधी होईल हे ईश्वर आणि न्यायालयालाच ठाऊक, असे सांगत महापालिका निवडणुका नेमक्या कधी होतील, याबाबत अनिश्चितता कायम असल्याचे स्पष्ट केले.

लोकशाही व्यवस्थेत प्रशासकाने फार काळ संस्था चालवणे योग्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. निवडणुका घेण्याचे अधिकार या संस्थेला आहेत. महापालिका निवडणुकीचा विषय राज्य सरकारकडे प्रलंबित नाही. न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिल्याने निवडणुकीचा विषय हा न्यायालय आणि आयोगाकडे आहे. त्यामुळे महापलिका निवडणुका कधी होतील हे ईश्वर आणि न्यायालयालाच ठाऊक असल्याचे फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

राज्य सरकारचे शेतकऱ्यांकडे नीट लक्ष आहे. शेवटच्या पावसापर्यंत राज्य सरकारने शेतकऱ्यांना सात हजार कोटी रुपयांची मदत केली. गेल्या चार दिवसात झालेल्या परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. आमचे सरकार मदत करणारे आहे. आम्ही घोषणा केल्यानंतर एक महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा केली, असेही फडणवीस म्हणाले.

राजकारणात कटुता वाढली

दरम्यान, अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात कटुता वाढल्याचे फडणवीस यांनी यावेळी मान्य केले. मात्र राजकारणात कटुता असू नये, वैमनस्य असू नये, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. कटुता असेल तर ती सगळ्यांनीच हळूहळू कमी केली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मी देखील करेन. पण एक चांगले आहे की सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी माझा अद्यापही संवाद आहे. उद्धव ठाकरे यांना अद्याप दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या नाहीत पण त्या जरूर देऊ असेही ते म्हणाले.

- Advertisement -

खाते कुठलेही असो आपण मन लावून काम केले पाहिजे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे. पण खरे पाहिले तर पायाभूत सुविधांच्या संदर्भात काम करायला आवडते, कारण तिथे रिझल्ट लवकर देता येतो. गृहखाते सांभाळताना फार सावध राहावे लागते. इतर खात्यांच्या तुलनेत गृह खाते हे आव्हानात्मक आहे, असेही फडणवीस म्हणाले.

पुन्हा युती होणार का?

राजकारणात अशक्य काहीच नसते. हा सिद्धांत पाहता उद्धव ठाकरे यांच्या सोबत कधी पुन्हा युती होईल का असे विचारले असता, राजकारणात अशक्य काहीच नसते हे खरे असले तरी जर-तरच्या प्रश्नांना देखील राजकारणात उत्तरे नसतात. ती दिली तर संशयाचे वातावरण उगाचच निर्माण होते, फडणवीस म्हणाले.

ते वादळ ठरलेले होते!

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस ‘वर्षा’वर दिवाळीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधायचे. आता अडीच वर्षांनंतर हा योग जुळून आला. अडीच वर्षांपूर्वी वादळ आले होते, पण ते वादळ ठरलेलेच होते, असे सांगत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा युती तोडण्याचा निर्णय पूर्वनियोजित होता, असे सूचित केले.


हेही वाचाः ‘राज’दरबारी महायुतीची खलबतं? खासदार शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -