घरताज्या घडामोडीभावावरच्या बलात्काराच्या आरोपांवर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया...!

भावावरच्या बलात्काराच्या आरोपांवर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया…!

Subscribe

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने ते आरोप आता मागे घेतले आहेत. त्यामुळे या मुदद्यावर पडदा पडल्याचं जरी म्हटलं जात असलं, तरी विरोधकांनी मात्र अजून देखील हा मुद्दा लावून धरला आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या भगिनी आणि राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री, तसेच भाजपच्या केंद्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी संवेदनशील प्रतिक्रिया दिली आहे. भावावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘एक नातं आणि एक महिला म्हणून मी या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहाते’, असं त्या म्हणाल्या आहेत. तसेच, या मुद्द्यावर मी राजकारण केलं नसतं, अशी देखील सूचक प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावरच्या बलात्काराच्या आरोपांचं भाजपकडून मोठ्या प्रमाणावर राजकीय भांडवल केलं गेलं होतं. अजून देखील या मुद्द्यावरून विरोधकांकडून सत्ताधारी, विशेषत: धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांची आलेली प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.

- Advertisement -

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

या प्रकरणी पत्रकारांनी विचारणा केली असता पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘राज्यात मी देखील महिला व बालकल्याण मंत्री राहिलेले आहे. त्यामुळे एका नात्याच्या दृष्टीने आणि एक महिला म्हणून देखील मी या प्रकरणाकडे संवेदनशीलतेने पाहाते. हे कुणाच्याही बाबतीत घडलं असतं, तरी मी त्याचं राजकीय भांडवल केलं नसतं. आजही मी ते करणार नाही. माध्यमांनी देखील संवेदनशीलता दाखवून त्यांच्यावर किंवा कुटुंबीयांवर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. नैतिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या किंवा कायदेशीरदृष्ट्या देखील या प्रकाराचं समर्थन होऊ शकत नाही. पण अशा गोष्टींमुळे एखाद्या कुटुंबाला किंवा निर्दोष लहान मुलांना त्रास होण्याची शक्यता असते. या प्रकरणाचा भविष्यात निकाल लागेलच’.

‘या गोष्टीवर राजकारण करावा किंवा विरोधक म्हणून याचा राजकीय फायदा घ्यावा असं मला कधी वाटलं नाही. सामाजिक जीवनात एका चौकटीतच जगायचं असतं. मी आधी स्त्री म्हणून विचार करावा, सामाजिक नेता म्हणून विचार करावा की नातं म्हणून विचार करावा? मी त्याचं भांडवल नाही केलं हीच फार मोठी बाब आहे.’

पंकजा मुंडे, राष्ट्रीय सचिव, भाजप

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -