कोरोनानंतर स्कूल बसेसऐवजी स्कूल व्हॅनना पालकांची पसंती

स्कूल व्हॅनची संख्या १६ हजारांहून १८ हजारांवर

कोरोनानंतर सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षात शालेय प्रवासाचे मोठे आव्हान पालकांसमोर उभे राहिले आहे. काही शाळांकडून बसची सक्ती होत आहे, तर बसचालकांनीही १५ टक्के शुल्कवाढ केली आहे. त्यामुळे पालकांना आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून यंदा अनेक पालकांनी छोट्या व्हॅन्सचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे या व्हॅन्सच्या वापरात १३ टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे.

मुंबईतील रस्त्यांवर धावणार्‍या स्कूल बसेसची संख्या ८ हजारांवरून ६ हजारांवर आली आहे. म्हणजे या वापरामध्ये २५ टक्के कपात झाल्याचे समोर आले आहे, तर खागी व्हॅन्सची संख्या १६ हजारांवरून १८ हजारांवर पोहचली आहे. म्हणजे यामध्ये सुमारे १३ टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. यंदा स्कूल बसचालकांनी शुल्कात १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे व्हॅनचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. यामध्ये महिन्याला १००० ते १२०० रुपये वाचतात. यामुळे या पर्यायाचा स्वीकार केल्याचे पालक सांगतात, मात्र नुकतीच एका स्कूल व्हॅनला आग लागल्याने पुन्हा एकदा व्हॅन्समधील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मुंबईत अनेक बेकायदा स्कूल व्हॅन्स धावत आहेत. त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसवून प्रवास केला जात असल्याचे स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले. सध्या शहरात स्कूल बसेसची कमतरता आहे, मात्र आपल्या पाल्याला व्हॅन्समधून पाठवणे धोकादायक असल्याचेही ते म्हणाले. या व्हॅन्समध्ये सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन केलेले नसते.

स्कूल बसला रस्त्यावर धावण्यासाठी मान्यता घ्यावी लागते. त्यापूर्वी त्यांना बसचे परमिट, विमा, फिटनेस प्रमाणपत्र, अग्निशमन यंत्र, जीपीएस आणि महिला कर्मचारी या सर्व गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक असते, मात्र व्हॅन्ससाठी या सर्व गोष्टी पडताळून पाहिल्या जात नाहीत, तर काही व्हॅन्स टी परमिटच्या नंबर प्लेटशिवाय चालत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. यंदा कोरोनामुळे जुने बसचालक गावाला निघून गेल्याने नवीन बसचालकांची नियुक्ती करण्यापासून अनेक गोष्टींची पूर्तता करण्यात आली, मात्र स्कूल बसेस पूर्णपणे सुरक्षित असतात, असे मतही गर्ग यांनी व्यक्त केले. १३पेक्षा कमी आसन क्षमता असलेल्या कोणत्याही वाहनाला शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास मुभा देऊ नये, अशी आमची प्रमुख मागणी असल्याचे गर्ग यांनी सांगितले. पालकांचे पैसे वाचत असले तरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हॅन्सच्या प्रवासाबाबत पुन्हा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.