घरमहाराष्ट्रप्लास्टिक पिशवी बंदी ३ कोटी १८ लाखांचा दंड वसूल

प्लास्टिक पिशवी बंदी ३ कोटी १८ लाखांचा दंड वसूल

Subscribe

मुंबईसह राज्यात प्लास्टिक पिशवी बंदी लागू होवून एक वर्ष पूर्ण होत आहे. राज्याच्या पर्यावरण विभागाने गेल्यावर्षी २३ जून २०१८ला प्लास्टिक पिशवी बंदी लागू केल्यानंतर मुंबईत याची कडक अंमलबजावणी सुरु झाली. परंतु वर्ष होत आले तरी प्लास्टिक पिशवी बंदीचा परिणाम दिसून येत नसून मुंबईतील पदपथावरील फेरीवाल्यापासून दुकानांमध्ये पुन्हा एकदा प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होवू लागला आहे. दुकानांमध्ये सुरुवातील कडक कारवाई झाली असली तरी त्या कारवाईचा धाकच नसल्याने मुंबईत प्लास्टिक पिशव्या पुन्हा एकदा घरोघरी जमा होवू लागल्या आहेत.

मुंबई शहर आणि उपनगरांत प्लास्टिक पिशव्यांमुळे होणारा वाढता कचरा आणि प्रदुषण पाहता राज्याच्या पर्यावरण विभागाने ही बंदी घातली. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज्यात प्लास्टिक पिशव्यांसह थर्माकोलच्या वापरावर बंदी घातल्यानंतर २३ जून २०१८पासून बंदी लागू केली. त्यानंतर मुंबई महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांचा साठा व वापराविरोधात दुकानदार, गाळेधारक यांच्याविरोधात कडक कारवाई मोहिम हाती घेतली. सर्व दुकानदार,मंडई, मॉल्समधील गाळेधारक, हॉटेल्स आणि हॉस्पिटलमध्ये कारवाई करून प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यास सुरुवात केली. यासाठी महापालिकेने २४९ निरिक्षकांची स्वतंत्र टीम बनवून बंदीनंतरही याचा वापर करणार्‍यांवर पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यास सुरवात केली.

- Advertisement -

या कारवाईअंतर्गत २३ जून २०१८ ते ३१ मे २०१९ या कालावधीत बाजार विभाग, दुकाने व आस्थापने आणि परवाना विभाग यांच्या माध्यमातून केलेल्या कारवाईत आतापर्यंत १ लाख ६८ हजार २६३ दुकाने,मॉल्स तसेच मंड्यांमधील गाळ्यांना भेटी दिल्या. त्यामध्ये ६० हजार ८८६ किलोचा प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला. तर ३ कोटी १८ लाख २० हजारांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती दुकाने व आस्थापने विभागाने दिली आहे.मात्र,आतापर्यंत जप्त करण्यात आलेला ६० हजार किलोच्या प्लास्टिकचा साठा महापालिका विभाग कार्यालयांच्या हद्दीतील गोदामांमध्ये ठेवण्यात आला आहे. मात्र, या प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी कंपन्यांना ते परत करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे. पुढील पाच दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल,असे परवाना विभागाने स्पष्ट केले आहे.

उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी सुरुवातीला प्लास्टिक विरोधी कारवाई आणि सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी प्लास्टिकबाबत जनजागृती मोहिम राबवल्याने कारवाई जोरात सुरु होती. परंतु चौधरी प्रसुती रजेवर गेल्यानंतर या कारवाईला खिळ बसली. त्यामुळे सुरुवातीच्या काही दिवसांमध्येच दुकानांमध्ये केलेल्या कारवाई व्यतिरिक्त काहीच दिसलेले नाही. उलट कारवाई सुरु असतानाही दादरसह अनेक भागांमध्ये फेरीवाल्यांकडून पातळ पिशव्यांचा वापर सर्रास केला जात आहे.

- Advertisement -

परंतु यांच्यावर कारवाई होत नसल्याने आता दुकानदारांकडूनही याचा वापर केला जात असल्याने पर्यावरण खात्याने लागू केलेल्या या बंदीचा फुसका बार निघाला आहे. प्लास्टिक बंदीची जनजागृती आणि कडक कारवाई यामुळे मुंबईत प्लास्टिक बंदी आहे का असाच प्रश्न मुंबईकरांना पडलेला आहे. या बंदीनंतर महापालिकेने घराघरांतील प्लास्टिक पिशव्यांचा साठा जमा केला. परंतु आता कारवाईच थंड पडल्याने आणि दुकानदारांकडून पुन्हा याचा वापर होवू लागल्याने घराघरांत पुन्हा प्लास्टिक पिशव्या जमा होवू लागल्या आहेत.

२३ जून २०१८ ते ३१ मे २०१९ची कारवाई
दुकान,गाळ्यांना दिलेल्या भेटी = १ लाख ६८ हजार २६३
तक्रार अहवाल : ४४८
जमा झालेले प्लास्टिक पिशव्यांचा साठा = ६० हजार ८८६ किलो
वसूल करण्यात आलेला दंड = ३ कोटी १८ लाख २० हजार रुपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -