घरमहाराष्ट्रगोडसेच्या भूमिकेवरून राजकीय वादंग

गोडसेच्या भूमिकेवरून राजकीय वादंग

Subscribe

काँग्रेस-राष्ट्रवादीत तीव्र मतभेद, काँग्रेसकडून चित्रपटाला विरोध, शरद पवारांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण तर जितेंद्र आव्हाडांची टीका, भाजप गांधीवादी कधीपासून झाला? : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी ‘मैने गांधी को क्यों मारा’ या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारण्यावरून राज्यात नवा वादंग निर्माण झाला आहे. काँग्रेसने या चित्रपटाला विरोध केला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हेंची पाठराखण केली आहे. पवार यांच्या भूमिकेला ठाणे जिल्ह्यातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी छेद दिला आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चित्रपटाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोल्हेंच्या भूमिकेवरून राष्ट्रवादीतील मतभेद समोर आले आहेत.

अमोल कोल्हेंनी कलावंत म्हणून गोडसे साकारला असेल तर ते काही गांधीविरोधक ठरत नाहीत. कलावंताकडे कलावंत म्हणूनच पाहिले पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. भाजपकडून कोल्हेंवर टीका होत असल्याबद्दल पवारांनी भाजप गांधीवादी कधी झाला? असा सवाल केला आहे. पवारांनी कोल्हे यांचे समर्थन केले असताना काँग्रेसने चित्रपटाला विरोध केला आहे. तर आव्हाड यांनी कोल्हेंच्या भूमिकेवर टीका करून राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला आहे.

- Advertisement -

डॉ. अमोल कोल्हे यांनी एका चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका करून पुन्हा एकदा गोडसेचा उदोउदो करण्याचा प्रयत्न केला असून काँग्रेस पक्ष महात्मा गांधींच्या मारेकर्‍याचे उदात्तीकरण कदापी खपवून घेणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. तर कोल्हे यांनी केलेली कृती कलाकार म्हणून केली असली तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही, असा घराचा आहेर जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे

याआधी महात्मा गांधी यांच्यावर रिचर्ड टेनबरोंनी चित्रपट बनविला होता.आंतरराष्ट्रीय पातळीवर तो नावाजला गेला. गांधीजींचे विचारही त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यास मदत झाली. त्यातही कोणीतरी गोडसे साकारला होता. छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेल्या चित्रपटातही कोणीतरी औरंगजेबाची भूमिका केली असेल म्हणजे ती व्यक्ती काही मोगल साम्राज्याची पुरस्कर्ती होत नाही.

- Advertisement -

राम आणि रावणावरील चित्रपटात कोणी रावण साकारत असेल तर ती व्यक्ती रावण होत नाही. कलावंत हा कलावंत असतो. तसेच कोल्हेंनी हा चित्रपट केला तेव्हा ते आमच्या पक्षातही नव्हते. त्यांनी जर गोडसेची भूमिका केली तर ते काही गांधीविरोधक ठरत नाहीत. तो देशाचा इतिहास आहे. कलावंत म्हणून त्यांनी काम केले आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

भाजपनेही कोल्हे यांच्यावर टीका केल्याबद्दल विचारले असता, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासावर मी भाष्य करू इच्छित नाही. एकेकाळी गांधीविरोधात भूमिका घेणार्‍या शक्ती आता कुठे आहेत हे पहावे लागेल, असे शरद पवार म्हणाले.

डॉ. अमोल कोल्हे यांनी एका चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका करून पुन्हा एकदा गोडसेचा उदोउदो करण्याचा प्रयत्न केला असून काँग्रेस पक्ष महात्मा गांधींच्या मारेकर्‍याचे उदात्तीकरण कदापी खपवून घेणार नाही.
-नाना पटोले , काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

मी सार्वजनिक जीवनात अथवा वैयक्तिक जीवनात नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण करणार नाही, केले नाही. तसेच गांधीजींच्या हत्येचे समर्थनही केले नाही आणि करणार नाही. गोडसे यांची विचारधारा ही माझी विचारधारा नसली तरी कलाकार म्हणून मला आव्हानात्मक भूमिका वाटली. त्यामुळे मी ती भूमिका स्वीकारली.
– डॉ.अमोल कोल्हे, खासदार, राष्ट्रवादी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -