मुंबई: उदयनराजेंना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी तीन दिवस ताटकळत ठेवण्यात आलं, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. यावर भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांनी उत्तर दिलं आहे. मला ताटकळत ठेवण्यात आलं असं म्हणणं योग्य नाही, असं ते म्हणाले. (Politics Not kept in Delhi Udayan raje Bhosale reply to Sanjay Raut)
उदयनराजे काय म्हणाले?
महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर झाली, ही चांगली बाब आहे. प्रत्येक पक्षात काही ना काही अडचणी असतात. वाटाघाटी करत असताना प्रत्येकाला असं वाटत असतं की आपला पक्ष वाढला पाहिजे. महायुतीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. या सगळ्यांच्या संगनमताने निर्णय होत असतात. त्यामुळे ताटकळत ठेवलं असं म्हणणं योग्य नाही, या शब्दांत उदयनराजे यांनी पलटवार केला. तसंच, माझे या अगोदरही दिल्लीत दौरे सुरूच होते. मधल्या काळात जरा दिल्लीला जावे लागले. केवळ आपल्या सातारा आणि महाराष्ट्राची निवडणूक नाही. वेगवेगळ्या पक्षांमध्ये तेढ निर्माण झाली होती. महायुतीत तेढ निर्माण झाली, पण ते सोडवण्याचे काम आता झालेले आहे, असं उदयनराजे यांनी सांगितलं.
उदयनराजे यांची दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी बैठक पार पडली. ही बैठक सकारात्मक ठरली. त्यांना साताऱ्यातून लोकसभेच्या जागेवर उमेदवारी मिळाल्याचे जवळपास निश्चित झाले, असं म्हटलं जात आहे.
राऊत काय म्हणाले होते?
राऊत म्हणाले उदयनराजे आमच्यासाठी प्रिय आहेत, आदर्श आहेत. शाहू महाराज यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली, तेव्हा एका मिनिटांत निर्णय घेतला आणि उमेदवारी जाहीर केली. आमचे निर्णय आम्ही महाराष्ट्रात घेतो. आम्हाला दिल्लीत निर्णयासाठी चार चार दिवस जाऊन कोणाच्या लॉनवर बसावं लागत नाही, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्यासंदर्भात केली. यावर उदयनराजे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती.
(हेही वाचा: Lok Sabha 2024 : काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राजीनामा देण्याचा इशारा, काय आहे कारण?)