मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या याद्या एकामागून एक प्रसिद्ध होत आहेत. काल, बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 17 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या पाचही विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे. अशा वेळी शिवसेनेत बंड करणारे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला साथ देणाऱ्या खासदारांचेच तिकीट कापायला सुरुवात केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी करून दाखविले तर, एकनाथ शिंदे यांनी गमावून दाखवल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा – Loksabha 2024: कंगना प्रकरण श्रीनेत यांना भोवले; कॉंग्रेसने तिकीट नाकारले
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला शिवसेनेच्या 39 आमदारांनी आणि 13 खासदारांनी पाठिंबा दिला. 29 जून 2022 रोजी राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 जून 2022 रोजी शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतरच्या पावणेदोन वर्षांच्या काळात एकनाथ शिंदे यांची शिवसेना कोणत्याही निवडणुकीला सामोरी गेली नाही. अपवाद राज्यसभेचा होता, पण तीही निवडणूक बिनविरोध झाली आणि काँग्रेसमधून शिंदे गटात आयात झालेले मिलिंद देवरा शिंदे गटाकडून राज्यसभेवर गेले.
आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात शिंदे यांची शिवसेना उतरत असली तरी, भाजपाच्या प्रभावाखाली ती निवडणूक लढवत आहे. सन 2019च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 जागांपैकी भाजपाने 25 तर शिवसेनेने 23 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यावेळी भाजपाने 23 तर, शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. पण आता सत्तेत विरोधी पक्षनेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेला यावेळी सुद्धा 23 जागा हव्या असल्या तरी, त्यांना तेवढ्या जागा मिळणार नाहीत, अशी शक्यता आहे. महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला केवळ सात ते आठ जागा मिळतील, असे सांगण्यात येते. परिणामी, पाच ते सहा विद्यमान खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यात यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा – Lok Sabha 2024 : …ते तुम्हाला उद्धव ठाकरे शिकवतील; स्टार प्रचारकांच्या यादीवरील टीकेवरून सेनेचा पलटवार
अशातच शिवसेनेच्या विद्यमान खासदारांचे तिकीट कापून शिंदे यांनी दुसऱ्यांना दिले असल्याचे समोर आले आहे. शिवसेनेचे रामटेकमधील विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी नाकारून राजू पारवे यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पाचच दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
एकीकडे ही परिस्थिती असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या पाचही विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, ठाणे येथून राजन विचारे, रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून विनायक राऊत, उस्मानाबादेतून ओमराजे निंबाळकर आणि परभणी येथून संजय जाधव यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. म्हणूनच, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करून दाखवले, पण विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती तडजोड करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – Chitra Wagh : एक अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्या मोठ्ठ्या ताई…, चित्रा वाघांकडून सुप्रिया सुळे लक्ष्य