घरठाणेचिमुरड्या साईवर बेतला जीवघेणा प्रसंग

चिमुरड्या साईवर बेतला जीवघेणा प्रसंग

Subscribe

उपचार, मदतीसाठी धावून आले मनसेचे प्रल्हाद म्हात्रे

डोंबिवली । जिन्यावरून कोसळल्याने एका पाच वर्षांच्या चिमुरड्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्याने उपचाराचा खर्च पेलवत नव्हता. मात्र मुलाचे आजारपण बळावत गेले,त्यातच चिमुकल्याला टिबीचा आजारही जडला. अशा संकटकाळात डोंबिवली विधानसभा अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे धावून आले. या चिमुरड्याच्या संपूर्ण उपचारांसाठी लागणार्‍या खर्चाची जबाबदारी प्रल्हाद म्हात्रे यांनी उचलली असून आता या चिमुरड्यावर मुंबईच्या वाडिया रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

साई कपिल कांगडा असे या पाच वर्षीय चिमुरड्याचे नाव आहे. त्याचे वडील कपिल आणि आई पिंकी हे दाम्पत्य केडीएमसीच्या डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडी येथील सार्वजनिक शौचालयात सफाई कामगार म्हणून काम करतात . तीन मजली सार्वजनिक शौचालयाच्या गच्चीवर कांगडा दाम्पत्य आपल्या मुलासह राहतात ृ. या शौचालयाच्या तिन्ही मजल्यांवर लोकांची सतत ये-जा असल्याने शौचालयाचा जिना सतत ओला असतो.

- Advertisement -

याच ओल्या जिन्यावरून पाय घासरून पाच वर्षीय साईच्या कमरेला गंभीर दुखापत झाली. अशिक्षित व अज्ञान यामुळे आई-वडीलांनी घरीच उपचार केले. मात्र आठवडाभरात जखम जास्त चिघळल्याने साईला जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले. तेथे 15 दिवस औषधोपचार करून देखील जखम बरी होत नसल्याने त्याला मोठ्या दवाखान्यात नेले. तेथे औषधे देऊन एमआयआर काढण्याचा सल्ला दिला. पाठीच्या मणक्याचा एमआयआर काढण्यासाठी 5 ते 7 हजार रुपये नसल्याने कमी खर्चात उपचार करण्यासाठी साईला गावी घेवून गेले .तेथेही एक महिना घालवला मात्र जखम बरी होण्याऐवजी अधिक चिघळल्याने तेथील डॉक्टरांनी मुलाला मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. वाडीया हॉस्पिटलने देखील एमआयआर काढण्याचा सल्ला दिला. तसेच मुलाला टीबीची लागण झाली असून उपचारांसाठी जवळपास 30 ते 35 हजार रुपये खर्च येईल, असे सांगण्यात आले. खर्चाचा हा आकडा ऐकून हातावर पोट भरणारे कांगडा दाम्पत्य हादरले.

डोंबिवलीतील एका रिक्षावाल्याने दिलेल्या सल्ल्यानुसार कांगडा दाम्पत्याने मनसेचे प्रल्हाद म्हात्रे यांच्याकडे धाव घेऊन आपल्या लाडक्या मुलावर जीवघेणा प्रसंग ओढवल्याचे सांगितले. साईची परिस्थिती पाहून गहिवरून आलेल्या प्रल्हाद म्हात्रे यांनी त्याच्यावर तात्काळ उपचार करण्याचा निर्णय घेतला. लगेच दुसर्‍या दिवसापासून वाडीया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले. एमआयआर केल्यानंतर पाठीच्या मणक्याला मोठ्या प्रमाणावर इजा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे साईला महिनाभर डमीट करून जखम बरी करण्यास आणि टीबीवर नियंत्रण आणण्यास प्राधान्य दिले आहे.त्या नंतर त्याच्या मणक्याची शस्त्रक्रिया करून महिनाभराने रॉड टाकावा लागेल, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. प्रल्हाद म्हात्रे वेळीच मदतीसाठी धावून आल्याने आता साई आजारातून बरा होणार असल्याने त्या माता-पित्याची चिंता मिटली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -