घरठाणेयेऊर येथील आरक्षित भुखंडावर पर्यटनस्थळाचे काम लवकर सुरू होईल

येऊर येथील आरक्षित भुखंडावर पर्यटनस्थळाचे काम लवकर सुरू होईल

Subscribe

आमदार सरनाईकांची माहिती

ठाणे: ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील २७ आदिवासी पाड्यातील नागरिकांच्या समस्या राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनी जाणून घेत, त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. तर त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनाही योग्य त्या सुचनाही केल्या आहेत. याशिवाय येऊर येथील आरक्षित असलेल्या भुखंडावर पर्यटन स्थळाचे काम लवकरात लवकर मंजूर करून चालू होणार आहे. तर हुमायून धबधब्याजवळील तीन बंधारे बांधण्याच्या कामाला तसेच पाटोणा पाड्याजवळील व चेना नदीवरील बंधाऱ्याच्या कामाला लवकरात लवकर मंजूरी देण्याचे आदेश ही आदिवासी विकास मंत्री गावीत यांनी दिल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

याचबरोबर येत्या ६ डिसेंबर रोजी मिरा-भाइर्दर महानगरपालिका क्षेत्रामधील मुन्शी कंपाऊंड येथे आदिवासी भवनाचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याचे सरनाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. ठाणे व मिरा-भाइर्दर महानगरपालिका क्षेत्रातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील २७ आदिवासी पाड्यांमधील समस्यांबाबत आदिवासी विकास मंत्री गावीत यांच्या दालनामध्ये आमदार सरनाईक यांच्या विनंतीवरून बैठक आयोजिण्यात आली होती.या बैठकीमध्ये प्रामुख्याने आदिवासी पाड्यांमध्ये पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या जुन्या स्मशानभुमीची पुर्नबांधणी करून त्यामध्ये चिता ठेवण्यासाठी लोखंडी जाळी व पत्र्याची शेड बसविण्याच्या कामाला वनखात्याने ना-हरकत दर्शविली.

- Advertisement -

त्याचबरोबर ज्या-ज्या आदिवासी पाड्यांमध्ये पाण्याची कमतरता असेल त्या-त्या ठिकाणी बोअरवेल खोदून हॅन्डपंप लावण्याच्या कामालाही ना-हरकत दर्शविली. तसेच ज्या आदिवासी पाड्यांमध्ये शौचालयांची गरज असेल त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेटला परवानगी देत असताना त्या ठिकाणी त्याची स्वच्छता, निगा व देखभाल स्थानिकांनी करण्याच्या अटीवर मान्यता देण्याचे ठरले, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.

तसेच आदिवासी पाड्यांमध्ये नाले, ओढे असून पावसाळ्यामध्ये तुडुंब वाहत असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना सुध्दा नाले ओलांडता येत नाही, त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी नाले, ओढे असतील त्यावर साकव बांधण्याचे धोरण निश्चित करण्यात आल्याचे पत्रकात नमूद केले आहे. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील आदिवासी पाड्यांसाठी सरनाईक यांच्या प्रयत्नाने नवीन टेकनॉलॉजियुक्त सोलर दिवे लावण्याच्या कामाला मंजूरी मिळाली असून आदिवासी पाड्यांपर्यंत जाणारे रस्ते सुस्थितीत करण्याच्या सुचना गावीत यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर तुंगारेश्वर डोंगरावरील सदानंद महाराजाच्या आश्रमापर्यंत जाणाऱ्या रस्त्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्याचे निश्चित करण्याचेही शेवटी म्हटले आहे. या बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव जी. मल्लीकार्जुन, उपसचिव (वने) भानुदास पिंगळे, सहाय्यक वन अधिकारी उदय ढगे, कार्यकारी अभियंता आदिवासी विभाग सिध्देश सावर्डेकर हे आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -