मनुच्या स्मृती किती काळ जागवणार?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे दोघे ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या उद्घाटनप्रसंगी एकत्र आले होते. यावेळी दोघांची भाषणे झाली, त्यावेळी त्यांनी जी भाषणे केली, त्यात त्यांचे लक्ष्य होते ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप. आज समाजाला आणि देशाला प्रबोधनकारांच्या विचारांची गरज आहे. कारण समाजात मनुस्मृती जोपासणार्‍यांचे बळ वाढत आहे. त्यांना सत्तेची शक्तीही मिळाली आहे, त्यामुळे देश हुकूमशाहीकडे निघाला आहे. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र यायला हवे, असे त्यांचे म्हणणे होते. पण या दोन्ही नेत्यांच्या पक्षांचे इतके तुकडे का झाले, याचा ते विचार करतील का, संघाचा संघटितपणा हे नेते लक्षात घेणार आहेत का? की केवळ मनुच्या स्मृती जागवून टाळ्या मिळवत राहणार आहेत.

महाराष्ट्र हा नेहमीच अनेक सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक चळवळींचे उगमस्थान राहिलेला आहे. अनेक समाजसुधारक, क्रांतिकारक, बुद्धिवादी महाराष्ट्राने देशाला दिलेले आहेत. महाराष्ट्राने अगोदर सुरुवात केली आणि त्यानंतर इतर राज्यांनी त्यांचे अनुकरण केले अशा बर्‍याच गोष्टी आहेत. महाराष्ट्रात विविध विचारसरणींचे लोक बरेचदा एका व्यासपीठावर येऊन आपले विचार मांडत असतात. ही विविध विचारसरणींची नेते मंडळी एका व्यासपीठावर आली आणि त्यांना जर राजकीय पार्श्वभूमी असेल तर हे नेते पुढील काळात निवडणुका लढवण्यासाठी एकत्र येतील का, अशी शक्यता व्यक्त करण्यात येते. ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या उद्घाटनप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी एकाच मंचावर उपस्थित होते.

यावेळी दोघांनीही आपले विचार मांडले. हे दोन्ही नेते राजकीय पक्षांचे नेतृत्व करत असल्यामुळे त्यांनी जरी आपल्या भाषणांतून सामाजिक आणि समानतेचे विचार मांडले तरी त्याला राजकीय शेरेबाजीची किनार होती, हे दिसून आले. या दोन्ही नेत्यांचे लक्ष्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होते, हे त्यांच्या बोलण्यातून लपून राहिलेले नाही. उद्धव ठाकरे यांनी बोलताना आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रुढी आणि परंपरा यांच्यावर कसे आघात केले. हिंदूंमधील जातीव्यवस्था दूर करण्यासाठी कसे कार्य केले ते सांगितले. उद्धव ठाकरे यांचे मुख्य लक्ष्य हे भाजप आणि पर्यायाने संघ होता. कारण भाजप ही संघाची राजकीय शाखा आहे. त्यामुळे प्रबोधनकारांनी सांगितलेले हिंदुत्व हे कसे अधिक सरस आणि शास्त्रशुद्ध आहे, हे पटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

१९८४ साली भाजप आणि शिवसेना यांनी पहिल्यांदा राज्यात युती केली होती. सध्या ती अस्तित्वात नाही, ती पुन्हा होऊसुद्धा शकते, कारण हे त्यांनीच २०१९ च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी सिद्ध करून दाखवले आहे. कारण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप आणि शिवसेनेने युती तोडून एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना काहीही हातचे राखून ठेवलेले नव्हते. आम्ही पुन्हा कदापिही भाजपशी हातमिळवणी करणार नाही, असे उद्धव ठाकरे त्यावेळी प्रचारसभांमधून सांगत होते. लोकांनी शिवसेनेला बहुमत द्यावे, अशीच त्यांची अपेक्षा होती, पण त्यांना बहुमत मिळाले नाही. त्यावेळी ते मागाहून भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले, पाच वर्षे सत्तेत राहिले. मंत्र्यांच्या राजीनाम्याचा दबाव ठेवला, पण ते दिले नाहीत. त्यानंतर जेव्हा भाजपने २०१९ च्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव ठेवला तेव्हा शिवसेनेने त्याचा स्वीकार केला आणि अनेकांना आश्चर्याने तोंडात बोटेच नाही तर अख्खा हात घालण्याची पाळी आली.

खरे तर शिवसेना पक्षप्रमुखांनी ज्या पातळीवर जाऊन भाजपवर टीका केली होती, ती पाहता ते पुन्हा भाजपशी हातमिळवणी करतील, असे लोकांना वाटले नव्हते, पण त्यांनी ती केली. खरे तर त्यांनी भाजपशी पुन्हा हातमिळवणी न करण्यावर ठाम रहायला हवे होते. पुढे उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडून महाविकास आघाडी स्थापन करताना म्हटले होते की, भाजपचे नेते अमित शहा यांनी आम्हाला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचे वचन दिले होते, ते त्यांनी पाळले नाही, म्हणून आम्ही युतीतून बाहेर पडलो. याचा अर्थ भाजपने शिवसेना पक्षप्रमुखांना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचे वचन दिले होेते हे स्पष्ट होते. म्हणजे मुख्यमंत्रीपद मिळणार म्हणून ज्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टोकाची टीका केली होती, त्यांच्याशी पुन्हा मिळवणी केली, असेच स्पष्ट झाले. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, तो त्यांच्या सोयीप्रमाणे प्रादेशिक पक्षांचा वापर करून घेतो, हे जरी खरे मानले तरी शिवसेनेने भाजपला टोकाचा विरोध करून पुन्हा हातमिळवणी कशी काय केली, त्या प्रश्नाचे उत्तर सत्तालाभ या व्यतिरिक्त कुठले असू शकते, असे वाटत नाही.

याच भाजप आणि शिवसेनेने ३८ वर्षांपूर्वी राज्यात युती करताना आमची विचारसरणी सारखी आहे, हिंदुत्ववादाची आहे. काँग्रेसमुळे हिंदुत्वाला जो धोका निर्माण झालेला आहे, मुस्लिमांचे त्यांनी जे लांगुलचालन चालवले आहे, हे टाळण्यासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आम्ही युती केली आहे. आमची युती ही सत्तेसाठी नाही, आमची युती ही हिंदुत्वाच्या तत्वासाठी आहे, असे या दोन्ही पक्षांचे नेते सांगत असत. पण आजची स्थिती पाहता दोन्ही पक्षांनी हिंदुत्वाची फाळणी करून आमचे हिंदुत्व हेच खरे हे सिद्ध करण्याची जणू काही स्पर्धा लावली आहे, असेच चित्र उभे राहिलेले आहे. त्यामुळे भाजपचे आणि पर्यायाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेे हिंदुत्व कसे बेगडी आहे आणि प्रबोधनकारांनी सांगितलेले हिंदुत्व हे कसे बरोबर आहे, हे ठाकरेंनी ठासून सांगितले. ज्यांना प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयी माहिती आहे आणि त्यांची पुस्तके वाचली असतील, त्यांना हे माहीत आहे की, प्रबोधनकार ठाकरे ब्राम्हणेतर चळवळीचे एक प्रमुख नेते होते. त्यांनी हिंदू धर्मातील ब्राम्हणांना पोषक ठरणार्‍या अनेक चालीरितींवर सडकून टीका केली. त्यासाठी त्यांनी अतिशय कडवट आणि कठोर भाषाही वापरली. प्रबोधनकारांचे विचार हे आदर्श आणि समतेचा पुरस्कार करणारे असले तरी त्यांची अंमलबजावणी करणे अवघड असते, हे बरेचदा दिसून येते.

कारण प्रबोधनकारांनी ब्राम्हणांचा आणि ब्राम्हणशाहीचा सडकून विरोध केला, पण १९९५ साली जेव्हा शिवसेना-भाजप युतीची सत्ता राज्यात आली तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून ब्राम्हण असलेल्या मनोहर जोशी यांची निवड केली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेतील कुणा ब्राम्हणेतर बहुजनाची निवड केली नाही. आपण शिवसेनेसाठी कितीही त्याग केला तरी आपल्याला डावलले जाणार याचा सुगावा लागल्यामुळे त्याअगोदर छगन भुजबळ पक्षाबाहेर पडले होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सध्या देश हुकूमशाहीच्या दिशेने चाललेला आहे, त्यामुळे देशाला वाचवण्यासाठी आपण एकत्र यायला हवे, असे म्हटले, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लोकशाहीवर टीका करून हुकूमशाहीचे किती ठामपणे समर्थन करत असत हे त्यांची भाषणे पुन्हा ऐकल्यावर लक्षात येईल. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मनुस्मृतीमध्ये मनुने समाजाची जी चार भागात म्हणजे मनुष्याचे शिर, धड, पोट आणि पाय अशी रचना केली, त्यावर सडकून टीका केली.

वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी आपल्या भाषणातून समतावादी विचार मांडले, पण ते मांडताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला लक्ष्य केले. देशात सध्या मनुवादी विचारांना बळ देणारे वातावरण वाढत आहे, त्याला राजकीय संरक्षण देणारे पक्ष सत्तेवर आहेत. त्यामुळे हा वाढता मनुवाद समाजाला धोकादायक आहे. यांना लोकशाही नको, यांची रचना ही एकचालकानुवर्ती आहे. म्हणजेच हुकूमशाहीवर यांचा विश्वास आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या विरोधात आपण एकत्र यायला हवे, असे ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही मनुस्मृतीवर टीका केली होती, इतकेच नव्हे तर मागासवर्गीय आणि महिलांना जाचक असणार्‍या मनुस्मृतीचे दहन केले.

पण त्यानंतर बाबासाहेबांनी मागासवर्गींयांना शिका आणि संघटित व्हावा, इतकेच नव्हे तर सत्ताधारी व्हा, त्याशिवाय तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त होणार नाही, असे सांगितले होते. डॉ. आंबेडकरांच्या आवाहनाला अनुसरून या आंबेडकरी समाजाने परिस्थिती कठीण असतानाही परिश्रमपूर्वक शिक्षण घेतले, त्याचा त्यांना फायदा होत आहे. शिक्षणामुळे अनेक संधी उपलब्ध झाल्या, त्यामुळे आर्थिक स्तर उंचावला. शिक्षण आणि पैसा आल्यामुळे आत्मविश्वास वाढला, पूर्वी त्यांना कमी लेखणारे लोक आता त्यांना सन्मानाने वागवू लागले. हा सगळा फरक शिक्षणामुळे झालेला आहे. त्यामुळे आज आंबेडकरी समाज आणि इतरांमध्ये आंतरजातीय विवाह होत आहेत. अनेक आंबेडकरी नेत्यांच्या पत्नी या ब्राम्हण समाजातील आहेत. हे परिवर्तन उच्च शिक्षण आणि उंचावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे झालेले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी मनुस्मृतीनुसार समाजव्यवस्था घडविण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल संघावर म्हणजेच ब्राम्हण समाजावर ताशेरे ओढले. मुळात मनु हा ब्राम्हण होता की, क्षत्रिय यावरून वाद आहे. काहींचे म्हणणे आहे की, तो ब्राम्हण होता, तर काहींचे म्हणणे आहे तो क्षत्रिय राजा होता. त्याने त्या काळात जी समाजाविषयी आचारसंहिता लिहिली त्याप्रमाणे समाज चालविण्याचा विशिष्ट वर्गाचा प्रयत्न आहे, असा दावा केला जातो. पण आता काळ बदलत आहे हे लक्षात घ्यायला हवे. मनुस्मृतीप्रमाणे समाजात चातुर्वर्ण्य होता हे खरे आहे, पण आता त्यात बराच फरक पडलेला आहे. समाज सुधारणा आणि शिक्षणामुळे यात बदल होत आहेत. आता आधुनिक शिक्षण, वेगवान संपर्क आणि प्रवासाची साधने यामुळे जग अगदी जवळ आले आहे.

आज व्हिडिओ कान्फरन्सिंगच्या माध्यमातून जगाच्या विविध भागात असलेले लोक एका टेबलावर बसल्यासारखे बसून बोलू शकतात. शिक्षण आणि आर्थिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे आंतरजातीय विवाहांचे प्रमाण वाढत आहे. एकत्र शिक्षण आणि एकत्र काम करत असल्यामुळे माणसामाणसांमधील अंतर कमी होत आहे, त्यामुळे एकमेकांविषयी असलेला दुरावा कमी होत आहे. अशा परिस्थितीत मनुच्या स्मृती अजून किती काळ जागवत रहायच्या याचाही विचार करायला हवा. कारण त्याच्या नावाचा पुन्हा पुन्हा उच्चार करत राहिल्यास मेलेला मनु पुन्हा जिवंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनुस्मृतीवरून वाद पेटल्यानंतर बाजारात मनुस्मृतीच्या पुस्तकांची मागणी वाढली. कारण नेमके त्यात काय लिहिले आहे हे जाणून घेण्याची लोकांची उत्सुकता वाढली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या ब्राम्हणत्वावर टीका करताना उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंंबेडकर यांनी त्यांच्या अनेक गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे. १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. त्यानंतर संघ उत्तरोत्तर वाढत गेला. केवळ भारतातच नव्हे तर १४५ देशांमध्ये त्यांच्या शाखा आहेत. २०२५ साली संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. संघासोबत स्थापन झालेल्या अनेक संघटना निष्प्रभ झाल्या किंवा संपल्या. संघाला समांतर म्हणून स्थापन झालेला राष्ट्रसेवा दल आता नाममात्र उरला आहे. संघ वाढत आहे. त्यामागे सरसंघचालक आणि प्रचारकांची ध्येयनिष्ठा, त्याग आणि समर्पणाची वृत्ती आहे, त्यामुळेच हे शक्य झालेले आहे. संघावर जरी एकचालकानुवर्तीत्वाचा आरोप केला जात असला तरी संघाचे किंवा भाजपचे अनेक तुकडे पडलेले नाहीत. आज शिवसेनेचा विचार केला त्यांचे किती तुकड्यात विभाजन झालेले आहे हे आपल्या डोळ्यासमोर आहे.

एकेकाळी मराठी माणसांसाठी स्थापन झालेल्या संघटनेचे लोक आज एकमेकांना संपवायला निघाले आहेत. उद्धव ठाकरे यांनीही सुरुवातीला शिवसेनेला संघाच्या रचनेचा आकार देण्याचा प्रयत्न केला, तसे आराखडे तयार केले, पण ते कागदावरच राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच प्रेरणेतून स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा देशभर विस्तार होता. त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून येत असत. आज याच पक्षाचे ४० तुकडे झाले आहेत. एक गट दुसर्‍याला जुमानत नाही, अशी अवस्था आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिका आणि संघटित व्हा, पण आज विविध गटांचे किती आंबेडकरी नेते एकत्र येऊन संघटित व्हायला तयार आहेत, याचा विचार प्रकाश आंबेडकर करतील का? संघावर मनुस्मृती जोपासण्याचे तोशेरे ओढून मानसिक समाधान आणि टाळ्या मिळवता येतील, पण त्यातून ब्राम्हणेतर समाजाचा उत्कर्ष साध्य होणार आहे का?