घरमनोरंजननाट्य परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर; प्रशांत दामले विजयी

नाट्य परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर; प्रशांत दामले विजयी

Subscribe

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकींचा निकाल लागला आहे. सोमवारी पहाटेपर्यंत मतमोजणी सुरू होती.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकींचा निकाल लागला आहे. सोमवारी पहाटेपर्यंत मतमोजणी सुरू होती. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूह’ पॅनलचा दणदणीत विजय झाला. तर प्रसाद कांबळी यांचं आपलं पॅनल पराभूत झालं.

मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक अखेर काल रविवार १६ एप्रिल रोजी पार पडली. संध्याकाळी ५.३० पर्यंत मतदान सुरू होते. या निवडणुकी नंतर तातडीने मत मोजणीला सुरुवात झाली. रात्री उशिरा पर्यंत मतमोजणी आणि फेरमोजणी झाल्यानंतर पहाटे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणूकीत प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूह’ पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे.

- Advertisement -

राजकीय निवडणुकीप्रमाणेच ही नाट्य परिषदचे निवडणूक रंगली. या निवडणूकीसाठी लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यंदा प्रशांत दामले विरुद्ध प्रसाद कांबळी अशी ही निवडणूक होती. या निवडणुकीत मुंबई मध्यवर्ती शाखेतील दहा जागांपैकी ८ जागांवर दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाचे उमेदवार निवडून आले. तर उर्वरीत दोन जागांवर प्रसाद कांबळी यांच्या आपलं पॅनलचे दोन उमेदवार निवडून आले. मुंबई मध्यवर्तीत शाखेत एकूण १,३२८ जणांनी मतदान केलं. त्यात माटुंगा इथल्या यशवंत नाट्य मंदिरात १,२४५ तर गिरगांव इथं ८३ जणांनी मतदान केलं. मुंबई उपनगर शाखा (मुलुंड – बोरिवली- वसई) इथं एकूण ७३० जणांनी मतदान झाले.

प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूह या पॅनलमध्ये अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. विजय केंकरे, अजित भुरे, सयाजी शिंदे, विजय गोखले, वैजयंती आपटे, सुशांत शेलार, सविता मालपेकर यासारखे बडे कलाकार या पॅनलमध्ये होते. तर प्रसाद कांबळी यांच्या पॅनलमध्ये सुकन्या मोने, मंगेश कदम, राजन भिसे, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अशोक नारकर, संतोष काणेकर, सुनील देवळेकर, दिगंबर प्रभू, राजन भिसे यांचा समावेश आहे. या पॅनलचं नाव ‘आपलं पॅनल’ असं आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात अनेक नाट्यकर्मींना, नाट्यसंस्थांना मोठा आर्थिक फटका बसला होता. याच आर्थिक फटक्याला अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेला देखील सामोरे जावे लागले आहे. गेल्या अनेक वर्षांत नाट्यपरिषद आणि वाद हे न संपणारे समीकरण झाले होते. त्यामुळे आता प्रशांत दामलेंचं पॅनल निवडून आल्यानंतर हे वाद संपतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -