‘गर्व से काहो हम हिंदू हैं’; बंडानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

"गर्व से काहो हम हिंदू हैं. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा कधी आम्ही राजकीय फायद्यासाठी वापर केला नाही", अशी पहिली प्रतिक्रिया शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली.

eknath shinde

“गर्व से काहो हम हिंदू हैं. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा कधी आम्ही राजकीय फायद्यासाठी वापर केला नाही”, अशी पहिली प्रतिक्रिया शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली. मध्यरात्री २.२५ वाजताच्या सुमारास एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या आमदारांना बसने सुरत विमानतळावर नेण्यात आले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी थोडक्यात बातचीत केली.

नेमके काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“शिवसैनिकांनी कुठलेही बंड केलेले नाही. शिवसेना आमदारांनी कुठल्याही पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाचे विचार यापासून शिवसेना आमदार कधी फारकत घेणार नाहीत. मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली. चलो फार मिलते हैं… जय महाराष्ट्र… गर्व से कहो हम हिंदु हैं हा बाळा साहेबांचा नारा जो आहे यो बुलंद केला जाईल”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

“बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा कधी आम्ही राजकीय फायद्यासाठी वापर केला नाही आणि करणार नाही”, असेही त्यांनी म्हटले.

विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेच्या बांडखोर आमदारांना विमानतळावर नेताना भाजपा नेते मोहित कंबोज प्रसारमाध्यमांच्या कॅमेरात कैद झाले. त्यामुळे एकनाथ शिंदे भाजपच्या संपर्कात आहेत का, भाजपची वाट धरणार का, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

सुरत विमानतळावर पोहोचल्यावर प्रसारमाध्यमांनी एकनाथ शिंदे यांना नेमके काय झाले असे विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता, माझी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे, असे बोलून चलो जय महाराष्ट्र त्यांनी म्हटलं.