Kishor Aware : तळेगावातील जनसेवा विकास आघाडीच्या अध्यक्षाची अज्ञातांकडून निर्घृण हत्या

पुणे : जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे (Kishor Aware) यांच्यावर पुण्यामध्ये प्राणघातक हल्ला झाला आहे. जखमी अवस्थेतील आवारे यांना उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपाचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. किशोर आवरे यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार करुन कोयत्याने वार केले आहेत.

जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात आज (12 मे) दुपारी दोनच्या सुमारास कामानिमित्त आले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यापैकी दोघांंनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, तर दोघांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. सदर घटनेनंतर तळेगाव दाभाडे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी आवरे यांच्यावर हल्ला केल्यानंतर ते रक्‍ताच्या थारोळ्यात पडले होते. यावेळी हल्लेखोर काहीवेळ त्या ठिकाणी थांबले होते. हल्लेखोर निघून गेल्यावर जखमी आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणं बंद केले आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाशी दांडगा जनसंपर्क
किशोर आवारे यांनी जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून तळेगावात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाशी दांडगा जनसंपर्क बनवला होता. त्यामुळे किशोर आवारे यांना मानणारा तळेगावात मोठा वर्ग होता. सहा वर्षांपूर्वी तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत किशोर आवारे यांनी जनसेवा विकास समितीचे नगरसेवक निवडून आणून राजकारणात आपले स्थान बळकट केले होते. त्यामुळे राजकीय वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

समाजभूषण पुरस्कार जाहीर
किशोर आवारे यांना सामाजिक कार्याची त्यांना  आधीपासून आवड असल्यामुळे त्यांनी स्वत:ला समाजकार्यात वाहून घेतले होते. त्यांनी कोरोना महामारी तसेच कोल्हापूर आणि चिपळूण पूर आदी आपत्कालीन परिस्थितीत किशोर आवारे यांनी स्वखर्चातून भरीव मदतकार्य केले होते. त्यामुळे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा यांच्या वतीने डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार किशोर आवारे यांना जाहीर झाला होता.

 

सविस्तर बातमी लवकरच