घरमहाराष्ट्र'गरिबांना सरकारला प्रश्न विचारण्याचाही अधिकार नाही का?'

‘गरिबांना सरकारला प्रश्न विचारण्याचाही अधिकार नाही का?’

Subscribe

सरकारवर टीका केली म्हणून कोणावर थेट देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जात आहेत. तर अडचणीचे प्रश्न विचारले म्हणून कोणाला अटक केली जात आहे. ही मानसिकता लोकशाहीसाठी मारक असून, घटनेप्रती थोडा जरी आदर असेल तर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तातडीने या विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना अडचणीचा प्रश्न विचारला म्हणून दोन विद्यार्थ्यांना अटक करण्याचे आदेश देण्याच्या घटनेवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर तोफ डागली आहे. गरिबांना आता सरकारला प्रश्न विचारण्याचाही अधिकार राहिला नाही का? अशी संतप्त विचारणा त्यांनी केली आहे. शिक्षणमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या अमरावती दौऱ्यामध्ये ही घटना घडली होती. तावडे यांच्या कार्यक्रमात प्रश्नोत्तरे सुरू असताना पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्याने गरीब विद्यार्थ्यांना सरकार मोफत शिक्षण देणार का? असा प्रश्न विचारला होता. मात्र या साध्या प्रश्नावरून तावडे भडकले आणि तुला शिक्षण घेणे जमत नसेल नोकरी कर, असे निरूत्साहित करणारे उत्तर दिले होते. दरम्यान या संवादाचे दुसरा एक विद्यार्थी मोबाईलवरून चित्रिकरण करीत असल्याचे लक्षात येताच तावडे यांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते. प्रशांत राठोड आणि युवराज दाभाडे अशी त्या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत.

हेही वाचा – हे ‘जलयुक्त’ नाही ‘झोलयुक्त’ शिवार- विखे पाटील

- Advertisement -

काय म्हणाले विखे पाटील?

या घटनेवर संताप व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, या सरकारने असहिष्णुतेचा कळस गाठला आहे. अडचणीचे प्रश्न विचारले म्हणून विद्यार्थ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतले जात असेल तर ही राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांची गळचेपी आहे. त्या विद्यार्थ्यांनी मंत्र्यांसमोर असंसदीय किंवा बेकायदेशीर पद्धतीने नव्हे तर प्रश्नोत्तराच्या काळात अतिशय शांततापूर्वक पद्धतीने सरकारकडून आपली अपेक्षा मांडली होती. त्यांची मागणी मान्य नसेल तर मंत्र्यांनी किमान सौजन्याने नकार द्यायला हवा होता. मात्र त्याऐवजी त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देऊन आपली हुकूमशाही मानसिकता अधोरेखीत केली आहे. भाजप-शिवसेनेच्या राज्यात आता कोणालाही सरकारविरूद्ध प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार राहिलेला नाही का? असा जळजळीत प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सरकारवर टीका केली म्हणून कोणावर थेट देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जात आहेत. तर अडचणीचे प्रश्न विचारले म्हणून कोणाला अटक केली जात आहे. ही मानसिकता लोकशाहीसाठी मारक असून, घटनेप्रती थोडा जरी आदर असेल तर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तातडीने या विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा – सरकार सूडबुद्धीने वागत आहे – विखे पाटील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -