राहुल गांधींनी बांधली सोनिया गांधींच्या बुटाची लेस अन् अनेकांना आठवण झाली ‘त्या’ प्रसंगाची

या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वतः खाली वाकून सोनिया गांधींच्या बुटाची लेस बांधली. याचाच एक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात वडील – मुलगी किंवा आई – मुलगा यांच्या भावुक नात्यांचे क्षण जनतेला पाहायला मिळतात. राज्यात आणि देशात अनेक घराणी आहेत त्यात आई किंवा वडिलांसोबतच त्यांची मुलं सुद्धा राजकारणात मागील अनेक वर्षे सक्रिय आहेत. अशाच दोन मुलांच्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ते म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. 7 सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रारंभ झाला. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या कर्नाटक राज्यातील मांड्या या जिल्ह्यात सुरु आहे. 2024 च्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन राहुल गांधी पक्षबांधणीच्या हेतूने देशभर भारत जोडो यात्रेमार्फत जनतेशी संवाद साधत आहेत. राहुल गांधी यांच्या आई सोनिया गांधीसुद्धा (soniya gandhi) या यात्रेमध्ये सहभागी झाल्या आहेत.

या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वतः खाली वाकून सोनिया गांधींच्या बुटाची लेस बांधली. याचाच एक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर जनतेच्या प्रतिक्रिया येत आहेत. राहुल गांधी जेव्हा सोनिया गांधी यांच्या बुटाची लेस बांधत होते तेव्हा यापूर्वी घडलेल्या आणखी एका प्रसंगाची अनेकांना आठवण झाली.

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (lata mangeshkar) यांचं निधन झालं त्यावेळी शिवाजी पार्क मैदानावर विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थितांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होते. लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर शरद पवार खुर्चीवर येऊन बसले. तेव्हा ते बूट घालण्यासाठी खाली वाकत होते. आपल्या वडिलांना खाली वाकून बूट घालण्यासाठी त्रास होईल म्हणून सुप्रिया सुळे पुढे आल्या आणि त्यांनी खाली बसून वडिलांच्या पायात बूट घातले. हेच क्षण कॅमेरामध्येही टिपले गेले. वडील मुलीच्या नात्याचं अनेकांनी कौतुक केलं. आज राहुल गांधी यांनी त्यांच्या आईच्या बुटाची लेस बांधताना शरद पवार सुप्रिया सुळे यांच्याही भावुक प्रसंगाची आठवण अनेकांना झाली.


हे ही वाचा – राष्ट्रपती मुर्मूंबद्दल काँग्रेस नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य; महिला आयोगाकडून दखल