एकलहरे वीजप्रकल्पात रेल्वे इंजिनची कारला धडक; कार प्रतिबंधित क्षेत्रात गेलीच कशी?

नाशिक : एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कोळसा हाताळणी केंद्राच्या परिसरात रेल्वे इंजिनने वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कारला जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी (दि.२१) घडली. सुदैवाने या अपघातात जिवितहानी झाली नसली तरी कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताचे ठिकाण प्रतिबंधित क्षेत्र असल्याने या कार अपघाताची चौकशी वरिष्ठ पातळीवरुन सुरु झाल्याचे समजते.

एकलहरे वीज निर्मिती केंद्रातील उपकार्यकारी अभियंता अरविंद वाकेकर मंगळवारी (दि.२१) दुपारी प्रकल्पातील कोळसा हाताळणी केंद्र ३ मध्ये कामानिमित्त आपल्या कार मधून कोळसा वाहतूक करणार्‍या रेल्वे ट्रकवरुन जात असताना अचानक लोको मशिनने कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की कार फरपटत नेल्याने कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने वाकेकर यांना कोणतीही इजा झाली नसल्याचे समजते. याबाबत मुख्य अभियंता नितीन पुणेकर यांच्याशी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद दिला नाही.

कोळसा हाताळणी केंद्रात वाहनास प्रवेश नसताना खासगी वाहनातून अधिकारी याठिकाणी कशासाठी गेले होते. याबाबत चर्चा सुरु आहे. या घटनेबाबत अधिकार्‍यांकडून गोपनियता बाळगली जात असली तरी अपघाताचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने घटना उघडकीस आल्याने अधिकारी वर्गाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही.