Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढण्याबाबत राजेश टोपेंचा इशारा, मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार

लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढण्याबाबत राजेश टोपेंचा इशारा, मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार

४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी ३१ मे पर्यंत वाढणार असल्याचे सूतोवाच सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी केले. मात्र, यासंदर्भात मुख्यमंत्री हेच अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्‍यात लॉकडाऊन केल्‍यानंतर कोरोना रूगणांच्या संख्येत चांगलीच घट झाल्‍याचे दिसून आले आहे. देशातील इतर राज्‍यांच्या तुलनेत रूग्‍णवाढीचा दरही घसरला आहे. त्‍यामुळे सध्या राज्‍यात असलेले निर्बंध ३१ मे पर्यंत वाढवावेत, असेच मत राज्‍य मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्‍त करण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने १४ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. सुरुवातीला या निर्बंधांची मुदत ३० एप्रिलला संपल्यानंतर पुन्हा दोन आठवड्यासाठी म्हणजे १५ मे पर्यंत वाढविण्यात आली. आता ही मुदत या आठवड्यात संपत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनचा आढावा घेऊन त्याचा कालावधी वाढविण्याची मागणी बहुतांश मंत्र्यांनी केल्याची माहिती टोपे यांनी दिली.

- Advertisement -

राज्‍यात लॉकडाऊन लावण्याआधी रूग्‍णांची संख्या ७ लाखापर्यंत पोहोचली होती. मात्र लॉकडाउननंतर आता ती ४ लाख ७५ हजारापर्यंत खाली आली. देशाचा रूग्‍णवाढीचा दर १.४ आहे तर राज्‍याचा ०.८ पर्यंत आहे. देशातील ३६ राज्‍यांच्या तुलनेत महाराष्‍ट्राचा याबाबत ३० वा क्रमांक आहे.त्‍यामुळे निर्बंधांचे निश्चितच सकारात्‍मक परिणाम दिसून आले असल्‍याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुतांश मंत्र्यांनी निर्बंध अधिक वाढवावेत असेच मत व्यक्‍त केले. त्‍यामुळे १५ मे नंतरच्या निर्बंधांबाबतच्या मार्गदर्शक सूचना येत्‍या दोन ते तीन दिवसात जाहीर करण्यात येतील, असे टोपे यांनी सांगितले.

४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य

राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांच्या दुसऱ्या लसीच्या डोसचा कालावधी येत आहे. यामध्ये जवळपास २० लाख नागरिकांच्या लसीकरणाचा दुसऱ्या डोस देण्यात येणार आहे. या नागरिकांच्या लसीकरणासाठी लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारकडून कमी लसीचा अपुरा पुरवठा होत आहे. लसीच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ वर्षांमधील नागरिकांचे लसीकरण तुर्त स्थगित करण्यात आले आहेत. सध्या राज्यात १६ लाख कोव्हिशिल्ड डोस दुसऱ्या डोससाठी लागणार आहेत. तर ४ लाख कोवॅक्सिन डोस असे मिळून २० लाख नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण बाकी आहे. तसेच सध्या आपल्याकडे ७ लाख कोव्हिशिल्ड आणि ३ लाख कोवॅक्सिनचे डोस असे मिळून १० लाख डोस उपलब्ध आहेत. यामुळे सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसऱ्या डोससाठी प्राधान्याने येत्या ३ दिवसांत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -