घरदेश-विदेशराज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील, तर भाजपकडून संजय उपाध्याय

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील, तर भाजपकडून संजय उपाध्याय

Subscribe

राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी होणार पोटनिवडणूक, सोनिया गांधींनी केले नाव जाहीर

येत्या ४ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातून रजनी पाटील यांना उमेदवारी दिलीय. काँग्रेसचे सरचिटणीस मुकूल वासनिक यांनी सोमवारी पाटील यांच्या नावाची घोषणा केली. राजीव सातव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. रजनी पाटील या काँग्रेसच्या जम्मू काश्मीरच्या प्रभारी आहेत. दरम्यान, भाजपने राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसचे युवा नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करायची शेवटची मुदत २२ सप्टेंबरला संपणार आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये स्पर्धा होती. राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांच्यासह राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, मुकूल वासनिक, संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा होती. अखेर काँग्रेसने रजनी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. जागेवर काँग्रेसकडून कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या रिक्त जागेसाठी काँग्रेसकडून मुकूल वासनिक, राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव आणि मिलिंद देवरा यांच्या नावांचीही चर्चा होती.

- Advertisement -

रजनी पाटील यांचं नाव राज्यसभेसाठी निश्चित झाल्यानं त्यांचं नाव विधान परिषदेवरील राज्यपाल नामनियुक्त सदस्यांच्या यादीतून वगळावं लागणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून नव्या नावांची शिफारस करावी लागेल.

भाजपकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी

दरम्यान, भाजपने राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपाध्याय यांच्या नावाची घोषणा केली. उपाध्याय २२ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करतील, असंही पाटील यांनी सांगितलं.

- Advertisement -

पोटनिवडणूक बिनविरोध?

राज्यसभेसाठी खुलं मतदान असल्यानं पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची जास्त शक्यता आहे. राज्यातील महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्यबळ असल्याने भाजप आपला उमेदवार मागे घेण्याची शक्यता आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -