बंडखोर आमदार कांदे पिंपळगाव टोल नाक्यावर वाहनातून उतरले, पण..

पिंपळगाव बसवंत : शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. ते शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचा मतदारसंघ असलेल्या मनमाडमध्ये शिवसैनिकांचा मेळावा घेणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी पिंपळगाव बसवंत येथील शिवसैनिक स्वागतासाठी टोलनाक्यावर जमले. याचवेळी बंडखोर आमदार सुहास कांदे यांचा ताफा पिंपळगाव टोल नाक्यावर आला असता, कांदे यांच्या ताफ्यातील सर्वांना वाटले की, ही सर्व आपल्याच स्वागतासाठी जमलेली मंडळी आहे. मात्र, वाहनांतून उतरताच शिवसैनिकांनी आ. कांदे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. अखेर पोलिसांच्या मदतीने सुहास कांदे यांना सुरक्षितपणे येथून रवाना करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, आदित्य ठाकरे यांच्या १५ मिनिट अगोदर शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचा ताफा पिंपळगाव टोल नाक्यावरून जात असताना शिवसैनिकांनी त्यांना अडवले. यावेळी वाहन उभे करण्यास सांगून आ. कांदे खाली उतरले. त्यावेळी जमलेल्या शिवसैनिकांनी कांदे यांना बघताच ‘गद्दार.. गद्दार..’ अशी घोषणाबाजी केली. पोलिसांनी तातडीने मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कांदे यांना वाहनांत बसवून मनमाडच्या दिशेने मार्गस्थ केले.
दरम्यान, याच टोलनाक्यावर काही कालावधीनंतर आलेल्या युवा सेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्याचे शिवसैनिकांकडून मोठ्या जल्लोषाने स्वागत करण्यात आले. यावेळी जमलेल्या शिवसैनिकांनी स्वागताप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत आदित्य यांना पाठिंबा दर्शवला.