घरताज्या घडामोडीरोलेट: ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; शहरात डोळेझाक

रोलेट: ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; शहरात डोळेझाक

Subscribe

असंख्य तरुणांचे जीवन उद्धस्त करणार्‍या रोलेटचे पाळेमुळे शोधून काढण्यापर्यंत नाशिक ग्रामीण पोलिसांनी मजल मारली. दुसरीकडे नाशिक शहरात रोलेटचा पसारा अवाढव्य स्वरुपात वाढला आहे तेथे मात्र ठोस कारवाई होताना दिसत नाही.

असंख्य तरुणांचे जीवन उद्धस्त करणार्‍या रोलेटचे पाळेमुळे शोधून काढण्यापर्यंत नाशिक ग्रामीण पोलिसांनी मजल मारली असून यात रोलेटचा मुख्य सूत्रधार जोगेंद्र शहाला अटक देखील करण्यात आली. याशिवाय अन्य प्रकरणांत तपासकार्याला देखील गती आली आहे. दुसरीकडे ज्या नाशिक शहरात रोलेटचा पसारा अवाढव्य स्वरुपात वाढला आहे तेथे मात्र ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे आज शहरात सर्वत्र राजेरोसपणे रोलेटचा धंदा सुरु असल्याचे विदारक चित्र आहे.
शहरातील तरुणाईला रोलेट बिंगो जुगाराने ग्रासले असून त्यामुळे अनेक घरे बरबाद होत आहेत. विशेष म्हणजे, रोलेट अड्ड्यांवर यापूर्वी वारंवार छापे टाकले जाऊनही आज ते राजेरोसपणे सुरु आहेत. त्यामुळे ‘कुंपणच शेत खातेय का’ याचा शोध लावण्याचे आणि रोलेटचालकांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. सध्या नाशिक शहरातील पंचवटी, म्हसरुळ, निमाणी, मखमलाबाद, हिरावाडी, पेठरोड, दिंडोरीरोड, मालेगाव स्टॅण्ड, जेलरोड, नाशिकरोड, देवळाली, देवळाली कॅम्प, शिंदे गाव, इंदिरानगर, पाथर्डी, अंबड लिंक रोड, त्रिमूर्ती चौक, सातपूर, कॉलेजरोड आदी सर्वच भागात रोलेटचा अवैध व्यवसाय जोरदारपणे सुरु आहे. गुन्हेगारांचे आश्रयस्थान आणि गुन्हे घडण्यासाठी प्रवृत्त करणारे हे अड्डे आज राजेरोसपणे सुरू आहेत. गंभीर बाब म्हणजे असंख्य तरुणांचे आयुष्य रोलेटमुळे उद्ध्वस्त झाले आहे. वाढलेले कर्ज आणि त्याच्या परतफेडीसाठी केलेले गुन्हेगारी कृत्य असे चक्र रोलेटमुळे अव्याहतपणे फिरत असल्याने शहरातील गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही तक्रारदार नसल्याचे कारण देत पोलीस या अवैध धंद्याकडे कानाडोळा करीत आहे.

S.P. Sachin Patil
S.P. Sachin Patil

रोलेटवर ठोस कारवाई करण्यात शहर पोलिसांकडून उदासिनता दाखवली जात असताना दुसरीकडे ग्रामीण पोलीस मात्र अतिशय धडाक्यात कारवाई सुरु केली आहे. पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार सचिन पाटील यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी रोलेटच्या मुळाशी जाण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी तक्रारदारांच्या गाठीभेटी घेऊन तपासाचे चक्र फिरवले. त्याची परिणीती म्हणजे त्र्यंबकेश्वर तालुक्यात झालेल्या एका आत्महत्येचे गुढ उकलण्यात यश आले आहे. नामदेव रामभाऊ चव्हाण हा तरुण रोलेटवर लाखो रुपये हारल्याने त्याने वर्षभरापूर्वी आत्महत्या केल्याचे उघड झाले. या प्रकरणात जोगेंद्र शहासह रमेश चौरसिया, आंचल चौरसिया, कैलास शहा, शांताराम पगार आणि सुरेश वाघ या रोलेटचालकांनी चव्हाण यांना आमिष दाखवत रोलेट खेळ्यण्यास प्रवृत्त केल्याचे तपासात पुढे आले आहे. त्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी जोगेंद्र शहा यास अटक केली. यानंतर अन्य काही प्रकरणांच्या शोधकार्याला गती आली आहे. कोणत्याही दबावाला आणि आमिषाला बळी न पडता ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कारवाई सुरु केली असताना शहर पोलिसांकडून मात्र अजूनही ठोस कारवाई होताना दिसत नाही. केवळ रोलेटच्या अड्ड्यांवर छापे टाकून उपयोग होणार नाही, तर या अवैध धंद्यातील मुख्य सूत्रधारांना अटक करण्याचे ‘धारिष्ठ्य’ शहर पोलिसांनी दाखवणे गरजेचे असल्याचे बोलले जाते.

- Advertisement -

.. तर येतील गंभीर प्रकार पुढे

रोलेटवर कारवाई करण्याची जबाबदारी महसूल विभागाची असल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्पष्ट केले होते. परंतु हा दावा खोडून काढत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हे काम पोलिसांचेच असल्याचे ठणकावून सांगितले. त्यामुळे आता पोलिसांनी फार वेळ न दवडता रोलेटच्या मुख्य सूत्रधारांवर कारवाई करणे गरजेचे आहे. तक्रारदारांमधील दहशत कमी करण्याचे काम पोलिसांकडून घडल्यास अनेक गंभीर बाबी पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ओझर रोलट अड्ड्यावर छापा

रोलेटचा मुख्य सूत्रधार जोगेंद्र शहाला अटक केल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलीसांनी धाडसत्र सुरुच ठेवले आहे. ओझर येथील रोलेटच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तेथील पाच संशयितांना अटक केली. हे पाचही संशयित ओझरचेच रहिवासी आहेत.
ओझरमधील यात्रा मैदानाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये हा अड्डा सुरु होता. या अड्ड्यावर रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास छापा टाकण्यात आला. त्यात संशयित आरोपी राहुल कर्पे, सचिन इंगळे, महेश शेळके, प्रवीण अहिरे, कुमार जाधव यांना ताब्यात घेण्यात आले. ओझर पोलिसांनी ही कारवाई केली. न्यायालयाने या सर्वांना जामीन मंजूर केला. या संशयितांच्या खात्यांवर पैसे ट्रान्सपर झाल्याचे आढळून आले. त्यादिशेने आता पोलीस माहिती घेत आहेत.

- Advertisement -

 

 

रोलेट: ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; शहरात डोळेझाक
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -