फडणवीसांना उपमुख्यमंत्रीच व्हायचे होते तर मुख्यमंत्रीपदावरून युती का तोडली?, सामनातून शिवसेनेचा सवाल

Sanjay Raut

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर काल (30 जून) एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखामधून भाजप आणि बंडखोर आमदारांवर टीका करण्यात आली आहे. सामनाने अग्रलेखाला सत्ता मिळाली; पुढे काय? असे नाव दिले आहे. अग्रलेखात आम्हाला देवेंद्र फडणवीस यांचे आश्चर्य वाटते. त्यांना पुन्हा यायचे होते मुख्यमंत्री म्हणून, पण झाले उपमुख्यमंत्री, दुसरे असे की, हाच म्हणजे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचे हा फॉर्म्युला निवडणुकीपूर्वी दोघांनी ठरवला होता, मग तेव्हा मुख्यमंत्रीपदावरून युती का तोडली?, असा प्रश्न सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.

सत्त हेच सर्वस्व आणि बाकी सगळे झूठ  –

अग्रलेखात सत्ता हेच सगळ्या प्रश्नांचे उत्तर बनले आहे. महाराष्ट्रात गुरूवारी जे घडले त्यावरून सत्त हेच सर्वस्व आणि बाकी सगळे झूठ यावरच शिक्कामोर्तब झाले. ठीक आहे, अनैतिक मार्गाने का होईना, तुम्ही सत्ता मिळवली, पण पुढे काय? प्रश्न उरतोच. त्याचे उत्तर उद्या जनतेला द्यावेच लागणार आहे. कौरवांनी द्रौपदीस भरसभेत उभे करून बेइज्जत केले व धर्मराजासह सगळेच निर्जीव बनून हा तमाशा पाहत राहिले. तसेच काहीसे महाराष्ट्रात घडेल, पण शेवटी भगवान श्रीकृष्ण अवतरले. त्यांनी द्रौपदीच्या अब्रुचे, प्रतिष्ठेचे रक्षम केले. जनता हा श्रीकृष्णाप्रमाणे अवतार घेईल व महाराष्ट्राची अब्रू लूटणाऱ्यांवर सुदर्शन चक्र चालवील…नक्कीच!, असे म्हटले आहे.

बंडखोरांच्या रक्षणासाठी हजारो जवान –

महाराष्ट्रातले आमदार आधी सुरतला नेले. तेथून त्यांना आसामला हलवले. आता ते गोव्यात आले व त्यांचे स्वागत भाजपवाले मुंबईत करीत आहेत. देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी असलेले हजारो जवान खास विमानाने मुंबईच्या विमानतळावर उतरले. इतका बंदोबस्त केंद्र सरकार ठेवत आहे तो कोणासाठी? ज्या पक्षाने जन्म दिला त्या पक्षाशी, हिंदुत्वाशी, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी द्रोह करणाऱ्या आमदारांच्या संरक्षणासाठी? असा सवाल देखील सामनामधून उपस्थित करण्यात आला आहे. हिंदुस्थानसारख्या महान देशाला आणि त्या महान देशाच्या घटनेला नैतिक ऱ्हासाने ग्रासून टाकले आहे. या परिस्थितीत नजीकच्या भविष्यकाळात तरी बदल होण्याची चिन्हे दिसत नाहीत कारण बाजारात सर्वच रखवालदार विक्रीसाठी उपलब्ध आहेत, असे सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हटले आहे.

आमदार फुटावेत यासाठी कोणत्या महाशक्ती प्रयत्न करीत होत्या हे उघड झाले –

सामनाच्या संपादकीयमधून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. जगभरात लोकशाहीचा डंका वाजवत फिरायचे आणि आपल्याच लोकशाही व व्यक्तिस्वातंत्र्याच्या दिव्याखाली अंधार, अशी सध्याची स्थिती आहे, विरोधी पक्षाचे अस्तित्व संपवून या देशात लोकशाही कशी जिवंत राहणार? शिवसेनेचे आमदार फुटावेत यासाठी कोणत्या महाशक्ती प्रयत्न करीत होत्या हे मुंबईत उतरविलेल्या सैन्याने उघड केल्याचे सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हटले आहे.