घरमहाराष्ट्रनाशिकसमृद्धी महामार्गामुळे नगर १० जिल्ह्यांशी जोडले जाणार

समृद्धी महामार्गामुळे नगर १० जिल्ह्यांशी जोडले जाणार

Subscribe

पर्यटन वाढीला मिळणार चालना, जिल्ह्यात उभारली जाणार कृषी समृद्धी केंद्रे

अहमदनगर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गात अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील १० गावे येतात. जिल्ह्यातील या रस्त्याची लांबी धोत्रे ते दर्डे कोर्‍हाळे ( २९.४० किमी ) इतकी तर रुंदी १२० मीटर इतकी आहे. समृध्दी द्रुतगती मार्गाचा डिझाइन स्पीड १२० किलोमीटर प्रति तास आहे. या द्रुतगती मार्गावरून १०० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने गेल्यावर मुंबईपासून शिर्डी येण्यास अवघे दोन तास लागणार आहेत. नागपूरहून शिर्डी येण्यास अवद्ये ५ तास लागणार आहेत.

समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी असा ५२० किलोमीटरच्या या पहिल्या टप्प्यातील वाहतूक-दळणवळण सेवेचे ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. समृध्दी महामार्गाची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी २९.४० किलोमीटर असून, कोपरगाव इंटरचेंजपासून शिर्डी ५ किलोमीटर आहे. अहमदनगर मुख्यालयाचे अंतर ११० किलोमीटर आहे. समृध्दी महामार्गालगत जिल्ह्यात दोन कृषी समृध्दी उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे शिर्डी व अहमदनगर परिसरातील कृषी, उद्योग व व्यवसायाला चालना मिळून रोजगार वाढणार आहे. समृध्दीमुळे शिर्डीत देशविदेशातून येणार्‍या भाविकांची संख्या ही वाढणार आहे. शिर्डी व परिसराच्या विकासाला बूस्ट मिळणार आहे.

- Advertisement -

समृध्दी महामार्गामुळे शिर्डी, शनि शिंगणापूर, ज्ञानेश्वर मंदीर (नेवासा),देवगड आदी पर्यटन स्थळे इतर जिल्ह्यांच्या नजीक येणार आहेत. शिर्डीत येणार्‍या भाविकांच्या दृष्टीने ही रस्ता वरदान ठरणार आहे. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे व राहाता तालुक्यातील सावळीविहिर येथे कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे केली जाणार आहे. सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावर विकसित केले जाणारे प्रत्येक कृषी समृद्धी केंद्र स्वयंपूर्ण नवनगर असेल. एका कृषी समृद्धी केंद्रात ३० हजार थेट तर ६० हजार अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे नवनगरांच्या माध्यमातून भविष्यात १५ ते २० लाख नवीन रोजगारांची संधी निर्माण होणार आहे.

ठळक मुद्दे :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी उदया समृद्धी महामार्गावर १० कि. मी.चा प्रवास करणार आहेत.
  • कोपरगाव तालुक्यातील धोत्रे व राहाता तालुक्यातील सावळीविहिर येथे कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे केली जाणार आहे.
  • शिर्डी ते नागपूर ५२० कि.मी.साठी ९०० रुपये टोल भरावा लागणार आहे.
  • समृध्दी महामार्गाला अहमदनगरशी जोडणारा मनमाड-नगर रस्त्याच्या कामास जानेवारी २०२३ पासून सुरूवात होत आहे. हा रस्ता डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे.
  • शिर्डी ते नागपूरपर्यंत पहिल्या टप्प्यात १९ टोलबूथ आहेत.
  • छोट्या चारचाकी वाहनांसाठी प्रति किमी एक रुपये ७३ पैसे टोल असेल.
  • हलक्या व्यावसायिक किंवा मालवाहतुकीच्या वाहनांसाठी २  रूपये ७९ पैसे प्रति किमीचा दर राहणार आहे.
  • बस, ट्रक या वाहनांसाठी ५ रूपये ८५ पैसे प्रति किमीचा दर राहणार आहे.
  • मोठ्या व्यावसायिक वाहनांना ६ रूपये ३८ पैसेच्या दराने टोल असेल.
प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -