घरमहाराष्ट्रSanjay Raut : कधी शिवी तर कधी थुंकणे... पूर्वाश्रमीच्या शिवसेना नेत्यांवर संजय...

Sanjay Raut : कधी शिवी तर कधी थुंकणे… पूर्वाश्रमीच्या शिवसेना नेत्यांवर संजय राऊत यांचा राग

Subscribe

मुंबई : बंड करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांवर पक्षाच्या इतर नेत्यांच्या अंगाचा तिळपापड होणे स्वाभाविक आहे. इतर नेत्यांकडून या ‘गद्दार’ नेत्यांवर बेछूट आरोप केले जात असताना, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून येणारी प्रतिक्रिया जास्त वादग्रस्त ठरत आहे. या पूर्वाश्रमीच्या नेत्यांना कधी शिवी तर, कधी थुंकून ते राग व्यक्त करत असल्याचे पहायला मिळते. त्यामुळे त्याचे तीव्र पडसादही उमटत असतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील नाते तर, विळ्याभोपळ्याचे आहे. याची झलक प्रथम, विधानसभेत बहुमत चाचणी जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य नेत्यांनी केलेल्या भाषणादरम्यान पाहायला मिळाली. ‘आपण भलत्याच माणसाला राज्यसभेवर पाठवल्या’ची टिप्पणी त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. तर, शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांनी थेट संजय राऊत यांच्या श्रीमुखात मारण्याची भाषा केली होती.

- Advertisement -

नारायण राणेंना दिली शिवी
दुसरीकडे खासदार संजय राऊत यांच्याकडूनही तशाच प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात. साधारणपणे चार-पाच महिन्यांपूर्वी खासदार राऊत यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता, “अरे सोड रे *** आहे तो”, असे संजय राऊत म्हणाले. नेमके याचवेळी दुसरा पत्रकार संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौराबाबत प्रश्न विचारत होता. त्याचाच संदर्भ घेत भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाराष्ट्राच राजकारण कोणत्या थराला नेत आहात संजय राऊत? असा सवाल करत संजय राऊत यांच्याकडे माफीची मागणी केली. त्यानंतर दोघांमध्ये ट्विटरवॉर रंगले आणि नंतर दोघांनीही ट्वीट डिलीट केले.

आता विरोधकांवर ‘थुंकण्या’चा प्रकार
आता खासदार संजय राऊत यांनी शिवीगाळ करण्याबरोबर ‘थुंकण्या’सही सुरुवात केली आहे. संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर खासदार संजय राऊत माध्यमांसमोरच थुंकले. त्याआधी दोन दिवसांपूर्वी टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता, उत्तरादाखल संजय राऊत थुंकले होते.

- Advertisement -

इतरांनाही शिव्यांची लाखोली
अभिनेत्री कंगना रणौत हिच्या मुंबईबद्दलच्या वक्तव्यानंतर खासदार संजय राऊत यांनी तिला ‘हरामखोर’ असे म्हटले होते. भाजपा नेते किरीट सोमय्या हे कायमच त्यांच्या निशाण्यावर असतात, त्यामुळे त्यांच्याबद्दलही त्यांनी शिव्यांचा वापर केला आहे. दरम्यानच्या काळात संजय राऊत यांची कथित ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल झाली होती. 17 सेकंदाच्या या क्लिपमध्ये त्यांनी 27 वेळा एका महिलेला शिव्या दिल्याचे समोर आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -