राम आणि हनुमानच्या नावावर दंगली घडवण्याचे मनसुबे, पंतप्रधान यावर गप्प का? – संजय राऊत

sanjay raut

रामनवमी आणि हनुमान जयंतीला घडलेल्या हिंसक घटनेप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीमध्ये घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे. तसेच राम आणि हनुमानच्या नावावर दंगली घडवण्याचे मनसुबे सुरू असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर गप्प का?, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांना विचारला आहे.

राम आणि हनुमानच्या नावावर दंगली घडवण्याचे मनसुबे

संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, देशातील निवडणुकांतील देशातील वातावरण ठरवून बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. दिल्लीमध्ये हनुमान जयंतीच्या यात्रेवर हल्ला करण्यात आला. याआधी असा हल्ला कधीही झालेला नव्हता. रामनवमी आणि हनुमान जयंती हे दोन्ही उत्सव शांततापूर्ण मार्गाने साजरे केले जात होते. परंतु आता राम आणि हनुमानच्या नावावर दंगली घडवण्याचे मनसुबे सुरू आहेत. जे हल्ले होतायत ते प्रायोजित आहेत. देशातील वातावरण बिघडवण्यासाठी अशा प्रकारचे हल्ले करण्यात येत आहेत. पुन्हा एकदा हिंदु-मस्लिमांमध्ये दंगे निर्माण होण्यासाठी अशा प्रकारचे हल्ले घडवण्यात येत आहेत.

महाराष्ट्रात सुद्धा शांतता भंग करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न

हनुमान चालिसाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी संजय राऊत यांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, काल महाराष्ट्रात शांतता भंग करण्याचं काम सुरू होतं. महाराष्ट्रात सुद्धा शांतता भंग करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न सुरू होता. परंतु राज्यातील पोलीस अत्यंत मजबूत आणि संयमी असल्यामुळे आम्ही हे होऊ दिलं नाही. तसेच पुढे सुद्धा होऊन देणार नाही. ही परिस्थिती पाहता देशातील संपूर्ण १३ प्रमुख राजकीय पक्षांनी चिंता व्यक्त केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर गप्प का आहेत?, अशी चिंता या राजकीय पक्षांनी व्यक्त केली आहे, असं राऊत म्हणाले.

दंगे भडकवणं हे नव हिंदुत्ववादी ओवेसींचं लक्ष्य

जर दहा राज्यांमध्ये रामनवमी उत्सवाला दंगे होतात. त्यावेळी पंतप्रधानांनी देशातील नागरिकांना आवाहन केलं पाहिजे. पंतप्रधानांनी सांप्रदायिक ऐकतेबाबत बोललं पाहिजे. दंगे भडकवणं हे नव हिंदुत्ववादी ओवेसींचं लक्ष्य असल्याचा आरोपही त्यांनी विरोधकांवर केला आहे. पंतप्रधानांना ही सर्व परिस्थिती समजत नसेल तर त्यांनी जनतेच्या समोर येऊन मन की बात बोलायला पाहिजे, असं राऊत म्हणाले.


हेही वाचा : तुम्ही कारण नसताना कोणत्याही पावत्या आमच्यावर फाडू नका, जेम्स लेनप्रकरणाबाबत अजित पवारांचा सल्ला