घरमहाराष्ट्रनाशिक"मला कॉंग्रेसमधून बाहेर काढण्यासाठी स्क्रिप्ट तयार होती", सत्यजित तांबेंचा गौप्यस्फोट

“मला कॉंग्रेसमधून बाहेर काढण्यासाठी स्क्रिप्ट तयार होती”, सत्यजित तांबेंचा गौप्यस्फोट

Subscribe

मला कॉंग्रेसमधून बाहेर काढण्यासाठी स्क्रीप्ट तयार होती" असा खळबळजनक खुलासा करत त्यांनी महाराष्ट्र कॉंग्रेसवर गंभीर आरोप केलेत.

Satyajeet Tambe On AB Form: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसचा उमेदवार म्हणून गेले आणि अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यानंतर आता कॉंग्रेसमधल्या गोंधळामुळे ते भाजपची वाट धरणार का? अशा चर्चा रंगल्या असतानाच समोर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना धूळ चारत अखेर अपक्ष उमेदवार म्हणून सत्यजित तांबेंनी विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली. या सगळ्या घडामोडींमधून गेल्यानंतर अखेर विजयी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंनी आता या सगळ्या प्रवासातला गौप्यस्फोट केलाय. “मला कॉंग्रेसमधून बाहेर काढण्यासाठी स्क्रिप्ट तयार होती,” असा खळबळजनक खुलासा करत त्यांनी महाराष्ट्र कॉंग्रेसवर गंभीर आरोप केलेत.

सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर राज्यातील वातावरण आणखी तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता विजयानंतर सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्र कॉंगेसवर केलेल्या आरोपांमुळे हे चित्र आणखी रंगणार आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सत्यजित तांबे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “कॉंग्रेससोबत आम्ही निष्ठेने राहिलो. आव्हानात्मक परिस्थितीत अत्यंत प्रामाणिक काम केलं. आमचे प्रभारी एच.के. पाटील यांच्याकडे जेव्हा मी मला काहीतरी संधी द्या, अशी मागणी केली. त्यावेळी तुझ्या वडिलांच्या जागी निवडणूकीला उभा राहा, असं सांगितलं. वडिलांच्या जागी निवडणूकीला उभं राहू शकणार नाही, अशी माझी भूमिका होती. जे काही करायचं ते स्वतःच्या हिंमतीवर करायचं, असं माझं मत होतं. पण परिवारामध्ये झालेल्या चर्चानुसार वडिलांच्या ऐवजी मी निवडणूक लढवणार आहे, हे आधीच सांगितलं होतं. अनेक नेतेही सांगत होते, सत्यजितला संधी द्या. फक्त माझी मानसिकता नव्हती. त्यामुळे माझे वडील निवडणूक लढतील की मी हे शेवटच्या क्षणाला आम्ही सांगू, कोणतीही दुसरी उमेदवारी जाहीर करू नका हे ही सांगितलं होतं.”

- Advertisement -

“प्रभारी एच. के. पाटील यांच्यासोबत दोन दिवस आधी चर्चा झाली. त्यांनी मान्य केलं. अर्ज भरायच्या दोन दिवस ९ जानेवारीला एबी फॉर्मसाठी पक्ष कार्यालयाला सांगितले. १० तारखेला आमचा माणूस नागपूरला पोहोचला. सकाळी १० ते संध्याकाळी ७ पर्यंत दहा तास तिथे बसून राहिला. त्यावेळी नाना पटोले यांनी सांगितले दोन एबी फॉर्म दिले आहेत. ११ तारखेला सकाळी पोहोचल्यानंतर आम्ही अर्ज भरायला गेलो, त्यावेळी लक्षात आलं की जे आम्हाला एबी फॉर्म दिले ते नाशिक मतदार संघाचे नव्हतेच. जे ते म्हणतात दोन कोरे एबी फॉर्म दिले ते एक औरंगाबाद आणि दुसरा नागपूर शिक्षक मतदारसंघाचा अर्ज होता. तर प्रदेश कार्यालयाने चुकीचा एबी फॉर्म का दिला? असा माझा प्रश्न आहे. त्यावर अध्यक्षांची सही सुद्धा होती. याबद्दल जेव्हा नाशिकच्या मतदारसंघाच्या एबी फॉर्मसाठी मागणी केली त्यानंतर १२ तारखेला अर्ज आला होता. त्यावर सुधीर तांबेच्या नावाचा उल्लेख होता”, असा खुलासा सत्यजित तांबेनी केला.

“हे एक षडयंत्र होतं. बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी स्क्रिप्ट तयार होती. कुटुंबाला अडचणीत आणण्यासाठी हा डाव रचला होता. अर्ज भरण्याच्या दिवशी नाना भाऊंचा फोन बंद होता. एस.के. पाटील यांनी माझा फोन घेतला नाही. बाळासाहेब यांनी सांगितले की आपल्याला कॉंग्रेसमधूनच अर्ज भरायचा आहे. शेवटी मी कॉंग्रेसमधूनच फॉर्म भरला होता. पण त्याच्यासोबत एबी फॉर्म जोडला नसल्याने अपक्ष म्हणून ठरला. शेवटी अपक्ष उमेदवार म्हणून सर्वच पक्षाकडे पाठिंबा मागितला. पण त्यातही भाजपमध्ये ढकलण्याचंच काम झालं. ही सगळी स्क्रिप्टेड स्टोरी तयार होती,” असं देखील सत्यजित तांबे म्हणाले. सत्यजित तांबेंनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर कॉंग्रेसकडून काय प्रतिक्रिया येतेय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -