घरमहाराष्ट्रराज्यसभेच्या सहा जागांसाठी सात अर्ज, आघाडी आणि भाजपचा विजयाचा दावा

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात अर्ज, आघाडी आणि भाजपचा विजयाचा दावा

Subscribe

उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपेपर्यंत भाजप किंवा शिवसेनेने माघार घेतली नाही तर राज्यसभेसाठी दहा वर्षानंतर प्रथमच खुले मतदान होईल. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपत आहे. त्यानंतर १ जून रोजी अर्जांची छाननी केली जाईल. ३ जून रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल.

येत्या १० जून रोजी होऊ घातलेल्या राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. हे सातही अर्ज कायम राहिले तर राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha election) मतदान (voting) अटळ आहे. मतदान झाल्यास अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांचा भाव वाढून घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.

भाजप (bjp), राष्ट्रवादी कॉंग्रेस (ncp) आणि कॉंग्रेस (congress) उमेदवारांनी सोमवारी आपापले अर्ज दाखल झाल्यानंतर भाजपने आपला तिसरा उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. तर भाजपला या निवडणुकीत घोडेबाजार करायचा आहे, असा आरोप शिवसेनेने (shiv sena) केला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपेपर्यंत भाजप किंवा शिवसेनेने माघार घेतली नाही तर राज्यसभेसाठी दहा वर्षानंतर प्रथमच खुले मतदान होईल. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपत आहे. त्यानंतर १ जून रोजी अर्जांची छाननी केली जाईल. ३ जून रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. या मुदतीत भाजप किंवा शिवसेना आपापल्या उमेदवारांवर ठाम राहिले तर आपले उमेदवार निवडून आणताना  दोन्ही पक्षांची कसोटी लागेल.

- Advertisement -

आघाडीने एक उमेदवार मागे घ्यावा : फडणवीस
राज्यसभा निवडणुकीत भाजपने तीन उमेदवार उभे केले आहेत. आमचे तीनही उमेदवार निवडून येणार आहेत. त्यामुळे आघाडीने एक उमेदवार मागे घेतला तर घोडेबाजार होण्याचा प्रश्न उरत नाही. त्यांनी उमेदवार ठेवला तरीही घोडेबाजार होणार नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलताना सांगितले. आमचे तीनही उमेदवार महाराष्ट्रातील आणि राजकीय क्षेत्रात सक्रीय  आहेत. काही लोक सद्सद्विवेक बुद्धीने आम्हाला मतदान करणार आहेत त्यामुळे निश्चितपणे आमचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

अपक्षांच्या पाठिंब्याने आमचा कोटा पूर्ण होणार : जयंत पाटील
राज्यसभा निवडणुकीत भाजपला जशी काही मते कमी पडतात तशी काही मते महाविकास आघाडीला कमी पडतात. परंतु आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो.  त्यामुळे आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस येईल, तेव्हा आपल्या सोबत किती आमदार आहेत याचा विचार सर्वच पक्ष करतील. महाराष्ट्र विधानसभेने  कधी घोडेबाजार पाहिला नाही.  त्यामुळे घोडेबाजार कोण करेल असे वाटत नाही. खास करुन भाजप करणार नाही, असा टोला पाटील यांनी लगावला.

- Advertisement -

बिनविरोध निवडीला भाजपकडून तिलांजली : नाना पटोले
राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. पण विरोधी पक्षाने या परंपरेला तिलांजली दिली आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली. राज्यसभेसाठी खुले मतदान होत असते, महाविकास आघाडीकडे बहुमत असून आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस पक्ष हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. पक्षात लोकशाही असून प्रतापगढी यांच्या उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. एका तरुण आणि उत्साही कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारले आहे. राज्यसभा उमेदवारीवरून हायकमांड यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वांनी स्वागतच केले आहे. त्यांच्या उमेदवारीवरून जी चर्चा सुरु आहे ती निरर्थक आहे. भाजपामध्ये तर लोकशाहीच नाही, मत मांडण्याचाही अधिकार त्यांच्या पक्षात नाही. त्यामुळे त्यांच्या टीकेकडे आम्ही फारसे गांभिर्याने पहात नाही, असेही पटोले म्हणाले.

शिवसेना, राष्ट्रवादीची अनुपस्थिती
दरम्यान, कॉंग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांनी सोमवारी राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. त्यांचा अर्ज दाखल होत असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीचा कोणताही नेता किंवा आमदार उपस्थित नव्हता. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रतापगढी यांनी अर्ज भरला.

यांचे उमेदवारी अर्ज दाखल
शिवसेना :
संजय राऊत, संजय पवार
भाजप :
पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे, धनंजय महाडिक
राष्ट्रवादी :
प्रफुल्ल पटेल
कॉंग्रेस :
इम्रान प्रतापगढी

अपक्ष आमदारांची साथ
आघाडी : शंकरराव गडाख, राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रकांत पाटील, मंजुळा गावित, किशोर जोरगेवार, संजयमामा शिंदे, आशीष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर
भाजप : विनय कोरे, प्रकाश आवाडे, महेश बालदी, राजेंद्र राऊत, रवी राणा, विनोद अग्रवाल

विधानसभेतील पक्षीय बलाबल
काँग्रेस ४४, राष्ट्रवादी ५३, शिवसेना ५५, भाजप १०6, छोटे पक्ष १६ (बविआ २, सपा २, एमआयएम २, प्रहार २, मनसे १, सीपीआय १, स्वाभिमानी १, आरएसपी १, जनसुराज्य १, शेकाप १, क्रांतीकारी शेतकरी पक्ष १ ), अपक्ष १३, असे २८७ सदस्य विधानसभेत आहेत.
शिवसेनेच्या रमेश लटके यांचे निधन झाल्याने एक जागा रिक्त आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -