घरक्राइमशाही बडदास्त दररोज फक्त 700 रुपयात; मुश्रीफांनी दिले भोसलेंवरील व्हीआयपी उपचारांच्या चौकशीचे...

शाही बडदास्त दररोज फक्त 700 रुपयात; मुश्रीफांनी दिले भोसलेंवरील व्हीआयपी उपचारांच्या चौकशीचे आदेश

Subscribe

संजय सावंत
मुंबई : सर्वपक्षीय वरदहस्त असलेले, डीएचएफएल-येस बँक घोटाळ्यात अटकेत असलेले प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना आधी जे. जे. रुग्णालयात आणि आता सेंट जॉर्ज रुग्णालयात पंचतारांकित सुविधा पुरविण्यात येत असल्याचे वृत्त गुरुवारी आपलं महानगरने देताच या दोन्ही रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. राजकीय वर्तुळाबरोबरच आरोग्य खात्यातही धावपळ उडाली. विशेष म्हणजे, दिवसाला फक्त ७०० रुपये मोजून अविनाश भोसले यांना या सर्व शाही सुविधा मिळत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी आपलं महानगरला दिली आहे. ऑर्थररोडमधील कैद्याला व्हीआयपी इलाज दिल्याच्या प्रकाराने वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. (Shahi Baddast at just Rs 700 per day Hasan Mushrif ordered an inquiry into VIP treatment of Avinash Bhosle)

मनी लाँड्रिंगप्रकरणी सीबीआय आणि ईडीने अटक केलेले प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले हे कारागृहाऐवजी आधी जे. जे. रुग्णालयात आणि आता सेंट जॉर्ज रुग्णालयात मिळून 10 महिने असल्याची माहिती आपलं महानगरला विश्वसनीय सूत्रांनी दिली. नाशिकचा ड्रग्जमाफिया ललित पाटील हा पुण्याच्या ससून रुग्णालयात 18 महिन्यांपासून मुक्काम ठोकून असल्याचे प्रकरण सर्वत्र गाजते आहे. त्यापाठोपाठ अविनाश भोसले यांनादेखील मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात शाही बडदास्त मिळत असल्याचे ‘आपलं महानगर’ने समोर आणले आहे. ललित पाटील प्रकरण ताजे असतानाही जेजेच्या डीन डॉ. पल्लवी सापळे या हायप्रोफाईल आरोपी अविनाश भोसले यांच्यावरील उपचारांवर जातीने लक्ष देत आहेत.

- Advertisement -

‘आपलं महानगर’च्या वृत्तानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ

प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांनाही सेंट जॉर्ज रुग्णालयात व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचे वृत्त ‘आपलं महानगर’ने प्रकाशित केल्यानंतर सर्व संबंधित यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्याचे पहायला मिळाले. अविनाश भोसले यांच्या सुरक्षेसाठी गुरुवारी सकाळी रुग्णालयातील नर्सिंग होम आणि बाह्य परिसरात पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला. 5 हून अधिक पोलीस नर्सिंग होमबाहेर गस्त घालत होते, तर काही पोलीस हे बंदूक घेऊन बसले होते. अविनाश भोसले हे आरोपी असताना त्यांना विशेष सुविधा देण्यासह इतका फौजफाटा कोणाच्या सांगण्यावरून तैनात करण्यात आला आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अविनाश भोसले यांच्यासाठी स्पेशल वॉर्ड तयार केलेला नाही. त्यांना वैद्यकीय समस्या असल्यामुळे त्यांच्या वॉर्डमध्ये एसी बसविला असून विलगीकरण केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. तसेच भोसले यांना कोरोनासदृश्य लक्षणे दिसत असल्याने १० महिन्यापूर्वी जेजेमध्ये दाखल केले होते. मात्र आता तशी काही लक्षणे नसून पुढील आठवड्यात निर्णय होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘आपलं महानगर’चा दणका : अविनाश भोसलेच्या बडदास्तीची होणार चौकशी, मंत्री हसन मुश्रीफांनी दिले आदेश

वैद्यकीय शिक्षण खात्याकडून दखल

डीएचएफएल-येस बँक घोटाळ्यात मनी लाँड्रिंगप्रकरणी अटकेत असलेले प्रसिद्ध उद्योगपती आणि राजकीय वर्तुळात दबदबा असलेले अविनाश भोसले यांच्या जे. जे. आणि सेंट जॉर्ज रुग्णालयातील शाही बडदास्तीची चौकशी करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्याची माहिती विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आपलं महानगरला गुरुवारी दिली. या चौकशीत दोषी आढळणार्‍या जे. जे. सेंट जॉर्ज रुग्णालयातील दोषी डॉक्टर, अधिकारी-कर्मचार्‍यांवर कडक कारवाई करण्याची भूमिका विभागाने घेतली आहे. आपलं महानगरने ‘अविनाश भोसलेंची जेजे-सेंट जॉर्जमध्ये १० महिने बडदास्त’ या मथळ्याखाली गुरूवारी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर जेजे प्रशासन खडबडून जागे झाले. वैद्यकीय विभागाने कारागृहातील रुग्ण कैद्यांच्या उपचारासाठी विशेष नियमावली तयार करण्याबाबत असलेल्या नियमावलीचे अंमलबजावणीच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

डॉ. पल्लवी सापळे यांचे कानावर हात

याबाबत जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अविनाश भोसलेंवर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू असून याबाबत सेंट जॉर्जचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर माहिती देऊ शकतील असे सांगितले. मात्र सेंट जॉर्जपूर्वी भोसले हे ७ महिने जेजेच्या पहिल्या मजल्यावरील वॉर्ड ९च्या शेजारी वातानूकुलीत साईडरूममध्ये उपचार घेत होते यावर आपली प्रतिक्रिया काय असे विचारले असता डॉ. सापळे यांनी याबाबतची माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही. आपण विचारलेली माहिती आणि रेकॉर्ड जेजेचे अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्याकडून घेतल्यानंतरच आपणाशी बोलू शकेन असा सावध पवित्रा त्यांनी घेतला. मात्र कोणत्याही कारागृहातील कैद्याला रुग्णालयात उपचार देण्याबाबत एक समिती बनवण्यात आली असून त्या समितीचे प्रमुख रुग्णालयाचे अधिष्ठाता, अधीक्षक, सर्जरी विभागाचा प्रतिनिधी आणि मेडिसीन विभागाचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे डॉ. पल्लवी सापळे या अविनाश भोसले या कैद्याला उपचार देण्याच्या समितीच्या प्रमुख असूनही त्यांनी कानावर हात ठेवत सर्व जबाबदारी ही अधीक्षकांची असते असे सूचित केले. सेंट जॉर्जचे अधिक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार देत आपण माझ्या वरिष्ठांशी बोलावे असे सांगितले.

हेही वाचा – आरोपी अविनाश भोसलेंची ऑर्थररोड ऐवजी जेजे, सेंट जॉर्जमध्ये 10 महिने बडदास्त!

भोसलेंची उद्या जेजेत एमआरआय टेस्ट

उद्योगपती अविनाश भोसले यांना कागदोपत्री हृदयविकार, फुफ्फुसाचा आजारासह तीन-चार आजार असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र हायपरटेन्शनचाच त्रास आहे. हा त्रास सामान्यपणे कोणालाही होऊ शकतो, तर इतर आजार कोणत्याही वैद्यकीय अहवालात सकृतदर्शनी दिसत नसल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टर, नर्सकडून आपलं महानगरला सांगण्यात आली. त्यातच भोसलेंना अलीकडे चक्कर आल्यामुळे त्यांची येत्या शनिवारी जे. जे. रुग्णालयात एमआरआय टेस्ट करण्यात येणार आहे. न्यूरोसर्जनकडून या एमआरआय टेस्टचा अहवाल आल्यानंतर त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात पुन्हा दाखल करायचे की, आर्थर रोड कारागृहात रवानगी करायची, याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ डॉक्टर यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.

नर्सिंग होममध्ये भोसलेंना एसीसह उत्तमोत्तम सुविधा

ऑगस्ट 2023 मध्ये भोसले यांना जे. जे. मधून सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेजेमध्ये जानेवारी ते जूनपर्यंत भोसलेंवर उपचार झाले. तिथे कैद्यांसाठी विशेष व्यवस्था नसली तरी, तळमजल्यावरील नर्सिंग होममध्ये भोसलेंची खास बडदास्त ठेवली जात आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्यांना खासगी नर्सिंग होममध्ये उपचार घेण्यासाठी दिवसाला ३ ते 5 हजार रुपये मोजावे लागतात, पण अविनाश भोसले यांच्यासाठी दिवसाला केवळ 700 रुपये आकारले जातात. त्यातही त्यांना एसीसह उत्तमोत्तम सुविधा दिल्या आहेत.

कोरोनासदृश्य तापामुळे भोसले रुग्णालयात

अविनाश भोसले यांना सीबीआयने मे 2022 मध्ये अटक केली. त्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना ताब्यात घेतले. आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अविनाश भोसले यांना ताप आल्याच्या कारणास्तव ऑक्टोबर 2022 मध्ये जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी कोरोनासदृश्य लक्षणे दिसल्याचेही सांगण्यात येते.

जेजेचा जेल वॉर्ड कशासाठी?

आर्थर रोड कारागृहातील कैद्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात येते. त्यानंतर आवश्यकतेनुसार सेंट जॉर्ज किंवा जी. टी. रुग्णालयांत रेफर केले जाते. जे. जे. रुग्णालयातही कैद्यांसाठी तिसर्‍या मजल्यावर स्वतंत्र वॉर्ड असून तिथे आरोपी कैद्यांसाठी बेडची व्यवस्था आहे. असे असतानाही अविनाश भोसले यांना जे. जे. रुग्णालयातील पहिल्या मजल्याच्या वॉर्ड क्रमांक 9 जवळील व्हीआयपी सूटमध्ये ठेवण्यात आले होते. तिथे त्यांना एसीपासून विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. भोसले हे मागील 10 महिन्यांत कधीही जेल वॉर्डमध्ये अ‍ॅडमिट नव्हतेच, अशी धक्कादायक माहिती आपलं महानगरच्या हाती आली आहे.
अविनाश भोसले सेंट जॉर्ज रुग्णालयात असल्याचे वृत्त ’आपलं महानगर’ने दिल्यानंतर त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली. गेले 10 महिने हे सर्व काही बिनबोभाट सुरू होते, पण ‘आपलं महानगर’ने गुरुवारी (26 ऑक्टोबर 2023) यासंबंधीचे वृत्त दिल्यावर जे. जे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्याबरोबरच सेंट जॉर्जचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांच्यावर विविध ठिकाणांहून प्रश्नांची सरबत्ती होत असून त्यांच्यासह रुग्णालयाचा इतर स्टाफही गांगारुन गेला होता.

हेही वाचा – मिंधे-भाजपा सरकारच्या लाडक्या कंत्राटदारांसाठी… अंधेरीच्या पुलावरून आदित्य ठाकरेंची टीका

फडणवीसही होते नर्सिंग होममध्ये अ‍ॅडमिट

कोरोना महामारीच्या काळात पहिल्या लाटेत विद्यमान देवेंद्र फडणवीस यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जवळपास 3 वर्षांपूर्वी 24 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर 4 नोव्हेंबर 2020 रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. या कालावधीत त्यांना याच नर्सिंग होममध्ये ठेवण्यात आले होते. नर्सिंग होममध्ये आणखी 2 व्हीआयपी पेशंटवर उपचार करण्यात आल्याचे समजते. हे पेशंट 2 सनदी अधिकार्‍यांची 2 मुले होती. त्यापैकी एक माजी मुख्य सचिवांचा मुलगा होता, असेही सांगण्यात येते.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -