घरक्राइमआरोपी अविनाश भोसलेंची ऑर्थररोड ऐवजी जेजे, सेंट जॉर्जमध्ये 10 महिने बडदास्त!

आरोपी अविनाश भोसलेंची ऑर्थररोड ऐवजी जेजे, सेंट जॉर्जमध्ये 10 महिने बडदास्त!

Subscribe

डीएचएफएल-येस बँक घोटाळ्यातील सीबीआय, ईडीचे आरोपी प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले हे सध्या ऑर्थर रोड कारागृहाऐवजी मागील १० महिने जेजे-सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या उपचारावर जेजे हॉस्पिटलच्या डीन डॉ. पल्लवी सापळे, जेजेचे अधीक्षक डॉ. संजय सुरासेंसह सेंट जॉर्जचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर देखरेख करत आहेत.

संजय सावंत
 मुंबई : नाशिकचा ड्रग्जमाफिया ललित पाटील हा पुण्याच्या ससून रुग्णालयात 18 महिन्यांपासून मुक्काम ठोकून असल्याचे प्रकरण सर्वत्र गाजते आहे. तसाच काहीसा प्रकार सर्वपक्षीय वरदहस्त असलेले, डीएचएफएल-येस बँक घोटाळ्यात मनी लाँड्रिंगप्रकरणी अटकेत असलेले प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांच्याबाबतीत मुंबईतील सरकारी रुग्णालयात घडत आहे. भोसले यांची आर्थर रोड कारागृहाऐवजी जे. जे. रुग्णालयात ७ महिने आणि आता सेंट जॉर्ज रुग्णालयात ३ महिने असे मिळून १०  महिने राजेशाही बडदास्त ठेवली जात असल्याची माहिती आपलं महानगरला विश्वसनीय सूत्रांनी दिली. आरोपी असूनही अविनाश भोसले यांना जेजे रूग्णालयाच्या कैद्यांसाठी असलेल्या वॉर्डमध्ये कधीच दाखल केलेले नाही. त्याऐवजी भोसलेंवर जेजेच्या पहिल्या मजल्यावरील वॉर्ड क्रमांक ९ शेजारील वातानुकूलित स्पेशल वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर ऑगस्टपासून ३ महिने सोबत छायाचित्रात दिसत असलेल्या सेंट जॉर्ज रुग्णालयातील नर्सिंग होमच्या स्पेशल वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.भोसलेंच्या दिमतीला कायम शस्त्रधारी २ पोलीस असतात. ललित पाटील प्रकरण ताजे असतानाही जेजेच्या डीन डॉ. पल्लवी सापळे या हायप्रोफाईल आरोपी अविनाश भोसलेंवरील उपचारांची जातीने काळजी घेत आहेत. (Accused Avinash Bhosle sentenced to 10 months in JJ St George instead of Arthur Road!)

ड्रग्जमाफिया ललित पाटील हा पुण्याच्या ससून रुग्णालयात गेल्या 18 महिन्यांपासून मुक्काम ठोकून होता आणि तेथूनच आपले ड्रग्ज रॅकेट चालवायचा, हे उघड झाले आहे. त्याच्यामागे नेमकी कोणती राजकीय शक्ती होती, हे स्पष्ट झालेले नाही. केवळ आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, पण सर्वपक्षीय वरदहस्त असलेली आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी अटक करण्यात आलेले प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांची कारागृहाऐवजी आधी जे. जे. रुग्णालयात आणि आता सेंट जॉर्ज रुग्णालयात मिळून 10 महिने राजेशाही बडदास्त ठेवली जात असल्याची माहिती आपलं महानगरला विश्वसनीय सूत्रांनी दिली. आरोपी असूनही अविनाश भोसले यांच्या रुग्णालयातील शाही बडदास्तीमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई पोलिसांनी 18 ऑक्टोबरला ललित पाटील याला बंगलोरमधून अटक केल्यानंतर या सर्व प्रकरणात कोणाकोणाचा हात आहे, हे मी सांगेन, असा गौप्यस्फोट केला. त्यानंतर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री गिरीश महाजन या नेत्यांवर आरोप केले जात आहेत. या प्रकरणातील खरी नावे समोर येण्याची सुतराम शक्यता नसली तरी, याच्याच अनुषंगाने असेच एक हायप्रोफाईल प्रकरण समोर आले आहे.

डीएचएफएल – येस बँक घोटाळ्यातील आरोपी अविनाश भोसले यांना सीबीआयने मे 2022 मध्ये अटक केली. त्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना ताब्यात घेतले. न्यायालयीन कोठडीत असलेले अविनाश भोसले आजारपणामुळे ऑक्टोबर 2022 मध्ये जे. जे. रुग्णालयात दाखल झाले. आर्थर रोड कारागृहात असलेल्या कैद्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात येते. त्यानंतर आवश्यकतेनुसार सेंट जॉर्ज किंवा जी. टी. रुग्णालयांत रेफर केले जाते. जे. जे. रुग्णालयातही कैद्यांसाठी तिसर्‍या मजल्यावर स्वतंत्र वॉर्ड असून तिथे आरोपी कैद्यांसाठी बेडची व्यवस्था आहे. असे असतानाही अविनाश भोसले यांना जे. जे. रुग्णालयातील पहिल्या मजल्याच्या वॉर्ड क्रमांक 9 जवळील व्हीआयपी सूटमध्ये ठेवण्यात आले होते. तिथे त्यांना एसीपासून विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, अशी माहिती आता पुढे येत आहे. भोसले हे मागील 10 महिन्यांत कधीही जेल वॉर्डमध्ये अ‍ॅडमिट नव्हतेच, अशी धक्कादायक माहिती आपलं महानगरच्या हाती आली आहे.

- Advertisement -

जानेवारी 2023 मध्ये सीबीआयने अविनाश भोसले यांच्या जे. जे. रुग्णालयातील मुक्कामाला आक्षेप घेतला होता. त्याच्या अनुषंगाने विशेष न्यायालयात एक अर्जही करण्यात आला होता. भोसले यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढविण्याच्या दृष्टीने जे. जे.मधील डॉक्टर आणि त्यांच्या मेडिकल बोर्डाचे मत ‘मॅनेज’ करण्यात आल्याचा दावा सीबीआयने केला होता. त्यामुळे नवी दिल्लीतील एम्सच्या मेडिकल बोर्डाकडून अविनाश भोसले यांच्या स्वास्थ्याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या अर्जाद्वारे केली होती, पण न्यायालयाने ही मागणी फेटाळली आणि 3 दिवसांत त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्याचे आदेश जे. जे. रुग्णालयाला दिले. तसेच त्यानंतर त्यांची रवानगी पुन्हा कारागृहात पाठविण्याचे निर्देशही दिले होते, हे उल्लेखनीय आहे, मात्र असे असतानाही जानेवारी ते जुलै या काळात अविनाश भोसले जे. जे. रुग्णालयाच्या व्हीआयपी कक्षात फाईव्हस्टार सेवा घेत होते त्यांच्यासाठी जे.जे. चे अधीक्षक डॉ. संजय सुरासे हे जातीने लक्ष ठेऊन होते, असे सांगण्यात येते.

- Advertisement -

त्यानंतर ऑगस्ट 2023 मध्ये त्यांना जे. जे. मधून सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे कैद्यांसाठी विशेष व्यवस्था नसली तरी, तळमजल्यावरील नर्सिंग होममध्ये भोसलेंची खास बडदास्त ठेवली जात असल्याचा पुरावा आपलं महानगरकडे उपलब्ध आहे. त्यांच्यासाठी पंचतारांकित शाही व्यवस्था उपलब्ध करण्यात आली असून खोलीबाहेर दोन पोलीस तैनात आहेत. त्यातील एक शस्त्रधारी आहे. सरकारी रुग्णालयात येणार्‍या रुग्णांचे प्रमाण बघता, त्यांना तपासण्यासाठी वेळ नसला तरी, डॉक्टरांसह सेंट जॉर्जचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर हे जातीने लक्ष देऊन असतात, असे सांगितले जाते. डॉ. सावर्डेकर हे जे. जे. मध्ये मेडिसिन विभागाचे प्रमुख असल्याने भोसलेंना कोणते आजार आहेत हे त्यांचेच युनिट आर्थर रोड जेल प्रशासनाला कळवत असते. भोसले यांची बडदास्त चांगल्या पद्धतीने ठेवल्यामुळेच डॉ. सावर्डेकर यांना सेंट जॉर्जचे अधीक्षक बनवल्याची कुजबूज जे. जे. मध्ये आहे. त्यामुळेच मागील 3 महिन्यांपासून अविनाश भोसले हे डॉ. सावर्डेकर यांच्याच देखरेखेखाली नर्सिंग होममध्ये उपचार घेत आहेत असे समजते.

आरोपी असलेल्या अविनाश भोसले यांना भेटायला त्यांची पत्नी, नातेवाईक, मित्र परिवार येतच असतात. तिथेच त्यांच्या बिझनेस मिटिंगही होत असल्याची माहिती सेंट जॉर्जमधील सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, एखाद्या कैद्याला रुग्णालयात भेटण्यासाठीदेखील न्यायालयाची परवानगी लागत असतानाही या भेटीगाठी बिनदिक्कत सुरू आहेत. भोसले यांना कागदोपत्री हृदयविकार, फुफ्फुसाचा आजारासह तीन-चार आजार असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र हायपरटेन्शनचाच त्रास आहे. हा त्रास सामान्यपणे कोणालाही होऊ शकतो, तर इतर आजार कोणत्याही वैद्यकीय अहवालात सकृतदर्शनी दिसत नसल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टर आणि नर्सकडून मिळाली.

या कारणाने आले अविनाश भोसले मीडियाच्या चर्चेत

अविनाश भोसले यांना 2007 साली मुंबई एअरपोर्टवर कस्टम विभागाकडून अटक करण्यात आली. कस्टम ड्युटी चुकवून लंडनहून आणलेल्या महागड्या वस्तू आणि परदेशी चलन एअरपोर्टच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. तेव्हा अविनाश भोसले हे नाव चर्चेत आले. मात्र पुढे हे प्रकरण थंडबस्त्यात गेले. त्यानंतर 10 वर्षांनी प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्यावर पुन्हा हे नाव चर्चेत आले. तत्पूर्वी 2015 मध्ये ईडीने 2007 मध्ये दाखल झालेल्या फेमा उल्लंघन प्रकरणात भोसले यांना 1.8 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता, तर दुबईस्थित रॉचडेल असोसिएट्समध्ये 40.34 कोटी रुपयांच्या विदेशी सिक्युरिटीज विकत घेतल्याने भोसले कुटुंबाविरुद्ध फेब्रुवारी 2021 मध्ये फेमा चौकशी सुरू करण्यात आली होती. यासाठी कुटुंबाने सरकारच्या रेमिटन्स योजनेचा गैरवापर करून पैसे हस्तांतरित केले होते. राणा कपूरने डीएचएफएलच्या अल्प-मुदतीच्या नॉन-कन्व्हर्टेबल ‘डिबेंचर्स’ मध्ये रु. 3,700 कोटी आणि डीएचएफएलच्या ‘मसाला बाँड्स’ मध्ये येस बँक लिमिटेडद्वारे रु. 283 कोटी गुंतवले. या प्रकरणात आतापर्यंत ईडीने 1,827 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

हेही वाचा : मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणुकीसंदर्भात चौकशी अहवाल आला समोर; आशिष शेलारांना धक्का

महामंडळामार्फत ‘खोर्‍या’ने पैसा ओढला

अविनाश भोसले यांना खरे ‘अच्छे दिन’ आले ते 1995 सालच्या शिवसेना-भाजप युतीच्या काळात. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग ओलिताखाली आणण्यासाठी तत्कालीन युती सरकारने कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली. त्यावेळी जलसंपदा विभागातील कामे आंध्र प्रदेशातील कंत्राटदारांच्या पदरी पडायची, पण मराठी चेहरा असलेल्या अविनाश भोसले यांनी हा पायंडा मोडून काढला. तत्कालीन मंत्रिमंडळातील काही नेते आणि काही सरकारी अधिकार्‍यांशी संधान बांधत महामंडळाची बहुतांश कामे मिळविली. याच्या बरोबरीनेच राज्य सरकारच्या अनेक मुख्य पायाभूत प्रकल्पांच्या कामात सहभाग असल्याचा दावाही एबीआयएल ग्रुपने केला होता. पुढे 1999 मध्ये युती सरकार जाऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली, पण बड्या राजकीय नेत्यांची जवळीक साधण्याचा हातखंडा अविनाश भोसले यांचा असल्याने या सत्ताबदलाचा परिणाम अविनाश भोसले यांच्या कंत्राटांवर झाला नाही. उलट त्यांची आर्थिक भरभराट वेगाने सुरूच होती, त्याला ब्रेक लागला नाही. कृष्णा खोरे महामंडळाच्या कंत्राट वाटपावर अविनाश भोसले यांचेच वर्चस्व होते, असे सांगितले जाते. जलसंधारण विभागातील अनेक कामेदेखील त्यांना किंवा त्यांच्यामार्फत दिली गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर का? अजित पवार गटातील नेत्याने सांगितलं कारण

डीएचएफएल आणि येस बँक घोटाळा

येस बँकेचे माजी एमडी आणि सीईओ राणा कपूर यांनी बँकेच्या माध्यमातून डीएचएफएलच्या (दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) अल्प-मुदतीच्या नॉन-कन्व्हर्टेबल ‘डिबेंचर्स’ मध्ये 3,700 कोटी आणि डीएचएफएलच्या ‘मसाला बाँड्स’मध्ये 283 कोटी गुंतवले होते. त्यापैकी डीएचएफएलने संजय छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुपच्या तीन कंपन्यांना 2420 कोटी रुपये कर्ज म्हणून दिले. रेडियस ग्रुपला दिलेले हे कर्ज 2130 कोटी रुपयांच्या थकबाकीसह डीएचएफएलच्या रेकॉर्डमध्ये ते एपीए झाले. डीएचएफएलकडून कर्ज मिळविण्यासाठी अविनाश भोसले यांनी रेडियस ग्रुपकडून सल्लागार सेवा देयके (कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पेमेंट्स) म्हणून 350 कोटी रुपये घेतल्याचे सीबीआयच्या तपासातून समोर आले आहे. त्यामुळे अविनाश भोसले, रेडियस ग्रुपचे संजय छाब्रिया या दोन बिल्डरसह राणा कपूर तसेच डीएचएफएलचे प्रवर्तक-दिग्दर्शक कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रिक्षावाला ते हेलिकॉप्टरवाला… थक्क करणारा प्रवास

सर्वच राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध असलेल्या अविनाश भोसले यांचे सातारा जिल्ह्यातील तांबवे हे मूळ गाव. नोकरीच्या निमित्ताने वडील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरला गेले. संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले आणि तिथे त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. पुण्यातील रास्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहणार्‍या अविनाश भोसले यांनी रस्त्यांच्या कामाची लहान-मोठी कंत्राटे घेण्यास सुरुवात केली. सार्वजनिक बांधकाम विभागातील काही ओळखी वाढवून तसेच काही ठेकेदारांशी संधान साधत त्यांनी हे काम सुरू केले आणि रिक्षा भाड्याने चालवण्यासाठी देऊ लागले. नंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही, अविनाश भोसले यांनी 1979 मध्ये एबीआयएल ग्रुपची (अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्टचर लिमिटेड) स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी बांधकाम क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. राजकारण्यांशी जवळीक निर्माण करत ते कोट्यधीश झाले आणि ते तीन हेलिकॉप्टरचे मालक बनले. विशेष म्हणजे, त्यात ऑगस्टा हेलिकॉप्टरही होते, तर बाणेर येथे व्हाइट हाऊस हा अलिशान बंगला उभा केला. तो अमेरिकेतील व्हाइट हाऊसप्रमाणेच तो होता, असे सांगण्यात येते.

राजकारण्यांना सेवा देण्यासाठी तत्पर

अविनाश भोसले यांच्या मालकीचे तीन हेलिकॉप्टर्स होते. निवडणूक प्रचारासाठी विविध बड्या पुढार्‍यांना अविनाश भोसले आपली हेलिकॉप्टर्स उपलब्ध करून देत होते. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातील इतर नेत्यांकडूनही हेलिकॉप्टर्सची मागणी होती, असे सांगण्यात येते.

(Input : Manoj Joshi)

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -