तुम्ही केलेल्या संघर्षाला यश.., एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना पवारांनी दिल्या शुभेच्छा

sharad pawar

मागील काही दिवसांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन केले जात होते. नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य केली असून सुधारित परीक्षा पद्धत अन् अभ्यासक्रम २०२५ पासूनच लागू होणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करत तुम्ही केलेल्या संघर्षाला यश मिळाले, असं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येत असणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार वर्णात्मक पद्धतीने घेण्यात येणार होती. सुधारित परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यात येणार होता. परंतु, नव्या शैक्षणिक धोरणाचा दाखला देत तो २०२३ पासूनच लागू करण्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ठरवले. याविरोधात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलन छेडले. पुण्यात या आंदोलनाला धार मिळाली होती. शरद पवार यांनी परवा रात्री आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला आणि आज ट्वीटही केलं. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय जाहीर करून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.


हेही वाचा : MPSC च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, सुधारित परीक्षा पद्धत अन् अभ्यासक्रम २०२५ पासूनच लागू होणार