घरमहाराष्ट्रसरकारच्या निष्काळजीपणामुळे खारघरमधील घटना, शरद पवारांचा आरोप

सरकारच्या निष्काळजीपणामुळे खारघरमधील घटना, शरद पवारांचा आरोप

Subscribe

खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे मृत पावलेल्या श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणाच्या दुर्घटनेची चौकशी सरकारी अधिकाऱ्यांकडून नव्हे तर निवृत्त न्यायाधीशांमार्फत व्हावी, अशी मागणी यावेळी शरद पवारांनी केलीय.

खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १४ श्री सदस्यांच्या झालेल्या मृत्यूची दुर्घटना ही राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळेच घडली, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. तसंच या प्रकरणाची चौकशी सरकारी अधिकाऱ्यांकडून नव्हे तर निवृत्त न्यायाधीशांमार्फत व्हावी, अशी मागणी यावेळी शरद पवारांनी केलीय.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज मुंबई विभागाचा मेळावा घेण्यात आला. घाटकोपर पूर्व येथील गुरुकुल एज्युकेशन सोसायटीच्या हॉलमध्ये हा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल 2 हजार हून अधिक कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे बडे नेते व्यासपीठावर उपस्थित आहेत. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवारांनी राज्य सरकारला धारेवर धरलंय. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात रविवारी झालेल्या दुर्घटनेवरून आजच्या राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात सर्वच बड्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला जबाबदार ठरवलंय.

- Advertisement -

यावेळी बोलताना शरद पवार यांनी देशात आणि राज्यात घडत असलेल्या वेगवेगळ्या घटनांचा उल्लेख करत राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. “राज्यात आणि देशात चिंताजनक परिस्थिती आहे. अनेक गोष्टी देशात आणि राज्यात घडत आहेत. त्यावर पडदा टाकण्याचं काम केलं जातंय. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा हा राज्य सरकारचा होता. त्यामुळे या सोहळ्यातील दुर्घटनेची जबाबदारी १०० टक्के राज्य सरकारचीच आहे. खारघरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात सरकारने आवश्यक खबरदारी घेतली नाही. सरकारच्या निष्काळजीपणामुळेच श्री सदस्यांचा मृत्यू झालाय. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. यासाठी ज्या अधिकाऱ्याची नेमणूक केलीय ते प्रामाणिक आहेत. पण शेवटी ते सरकारी अधिकारी आहेत. पण कितीही प्रामाणिक असले तरी सरकारी अधिकारी त्याच्या बॉसची कशी चौकशी करणार?” असा सवाल देखील यावेळी शरद पवारांनी उपस्थित केलाय. त्यामुळे खारघर दुर्घटनेची चौकशी सरकारी अधिकाऱ्यांऐवजी हायकोर्टच्या निवृत्त न्यायाधीशांनीच करावी, अशी मागणीच यावेळी शरद पवारांनी केली.

यावेळी शरद पवारांनी गुजरात दंगलीबाबत उदाहरण देत गुजरात दंगलीतल्या आरोपींना आता सोडण्यात आलं आहे. या दंगलीत लोकांची हत्या तर झालीच पण या देशाचा कायदा आणि संविधानाचीही हत्या झाली आहे, असं देखील यावेळी शरद पवार म्हणाले. तसंच देशात सध्या बेरोजगारी, महागाईचा प्रश्न आहे. शेतकऱ्याला त्याचा शेतमाल रस्त्यावर फेकावा लागतो, त्यामुळे या देशातील अन्नदाता उद्धवस्त झालाय, असं देखील पवार म्हणाले.

- Advertisement -

त्याचप्रमाणे ईडी, सीबीआय चौकशी आता घराघरात माहित झाली आहे. ग्रामीण भागातही लोक म्हणतात, ईडी लावतो! असं म्हणतात. सरकारविरोधात बोललं की खोट्या केसेस टाकून आत टाकलं जातंय. देणगी स्वीकारणं हे भ्रष्टाचार कसा काय ठरू शकतो. अनिल देशमुखांना १३ महिने तुरूंगात ठेवलं. दर १५ दिवसांनी नवाब मलिकांची तारीख बदललेल्याची बातमी येते. नवाब मलिक पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडतात, म्हणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. विरोधकांना नाउमेद करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं देखील शरद म्हणाले.

एकंदरीत देशाचं राजकारण वेगळ्या दिशेला नेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय. या प्रवृत्तीच्या विरोधात लढावं लागणार आहे. काहीही किंमत द्यावी लागली तरी हिंमतीने लढावं लागेल, असं आवाहन शरद पवारांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलंय. यासाठी बूथ कमिटी उभं करण्याची गरज आहे आणि प्रत्येक बूथवर कार्यकर्ते तयार ठेवले पाहिजेत, असं म्हणत शरद पवारांनी कार्यर्त्यांना मार्गदर्शन केलंय.

 

(सविस्तर वृत्त लवकरच)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -