घर महाराष्ट्र राष्ट्रवादी केजरीवालांच्या पाठीशी, अन्य राज्यांचाही पाठिंबा घेणार; शरद पवार

राष्ट्रवादी केजरीवालांच्या पाठीशी, अन्य राज्यांचाही पाठिंबा घेणार; शरद पवार

Subscribe

 

मुंबईः राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (NCP) अरविंद केजरीवाल यांच्या पाठिशी आहे. राज्यसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देईल, असे NCP चे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी शरद पवार यांची भेट घेतली. सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार दिल्ली सरकारला देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा निर्णय फिरवत मोदी सरकारने हे अधिकार राज्यपालांना देण्याचा अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशाला राज्यसभेत विरोध करण्यासाठी केजरीवाल सर्व विरोधी पक्षनेत्यांची भेट घेत आहेत. त्यासाठी केजरीवाल यांनी गुरुवारी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी केजरीवाल यांना पाठिंबा जाहिर केला.

शरद पवार म्हणाले, ही केवळ दिल्लीची समस्या नाही तर देशाची समस्या आहे. लोकांनी निवडून दिलेल्या राज्य सरकारचे अधिकार काढून घेणे योग्य नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष केजरीवाल यांच्या पाठिशी आहे. महाराष्ट्रातील जनताही केजरीवाल यांच्या पाठिशी उभी राहिल. लोकशाही वाचवण्याची ही वेळ आहे. लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क वाचवण्याची ही वेळ आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचा केजरीवाल यांना पाठिंबा आहे.

- Advertisement -

मी गेली ५६ वर्षे राजकारणात आहे. माझा अनेक बड्या नेत्यांशी संपर्क असतो. मी इतर राज्यात जाऊन माझ्या ओळखीच्या नेत्यांना केजरीवाल यांना पाठिंबा देण्यासाठी विनंती करेन, असेही शरद पवार यांनी सांगितले.

बुधवारी केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दोन निकाल दिले. एक शिवसेना संदर्भातील आणि दुसरा दिल्लीबाबत होता. सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्याबाबत एक निकाल दिला तो लोकशाहीसाठी आवश्यक होता. पण त्याच्या विरोधात केंद्र सरकारने अध्यादेश आणला. ही कोणती लोकशाही आहे. हे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. त्या प्रतिनिधींना काही अधिकार असतात. ते असायला हवेत की नाही? हे बघता असे वाटते की, आगामी काळात राज्यात निवडणुका होणार नाहीत फक्त केंद्रातच निवडणुका होतील. त्यामुळे देशातील जनतेला जागं करण्यासाठी आम्ही आता एकत्र आलो आहोत.

- Advertisment -