सावरकरांचा राष्ट्रवाद स्वीकारल्यास भारत हिंदुराष्ट्र – शरद पोंक्षे

आज सावरकरवाद स्वीकारण्याची गरज असून तो स्वीकारला तरच भारत हिंदू राष्ट्र म्हणून यशस्वी ठरेल. विज्ञानाची कास, भाषाशुद्धी, संरक्षण सज्जता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार त्यांनी मांडला होता, असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले आहे.

sharad ponkshe
सावरकरांचा राष्ट्रवाद स्वीकारल्यास भारत हिंदुराष्ट्र – शरद पोंक्षे

गांधीवादामुळे ७० वर्षांत देश अपयशी ठरला आहे. मात्र आज सावरकरवाद स्वीकारण्याची गरज असून तो स्वीकारला तरच भारत हिंदू राष्ट्र म्हणून यशस्वी ठरेल. विज्ञानाची कास, भाषाशुद्धी, संरक्षण सज्जता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार त्यांनी मांडला होता, असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले. जागतिक देवरुखे ब्राह्मणत ते बोलत होते. ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या भूमीत स्थानबद्ध होते आणि त्यांनी राष्ट्राला वंदनीय कार्य केले, तेथे बोलताना मला नेहमीच भरून येते. पतितपावन मंदिर असो वा कारागृहातील स्मारकात नतमस्तक कोणीही व्हावे. खरा इतिहास नेहरूंपासून साऱ्यांनी लपवून स्वातंत्र्यवीर सावरकरांना बदनाम केले. भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाला तरी सावरकरांना १९६३ पर्यंत स्वातंत्र्यसैनिक म्हणून सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे लागले, हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – सावरकरांवरील ‘हे मृत्यूंजय’ नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

नेमकं काय म्हणाले शरद पोंक्षे?

शरद पोंक्षे म्हणाले की, देशाने ७० वर्षे गांधीवाद जोपासला. नेहरूंनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काही सूचनांचे पत्र पाठवले होते. विज्ञानवादी राहा आणि सुरक्षा व्यवस्थेतील सैनिक, पोलीस आणि शिक्षणकार्य करणाऱ्या शिक्षकांना समाधानी ठेवा. ही सूचना न ऐकल्यामुळेच आज सैनिक किंवा पोलिसांबद्दल वाट्टेल ते बोलले जात आहे. शिक्षक मनापासून शिकवत नाहीत. गुरुकुल शिक्षण पद्धत अमलात आणा. सर्वाधिक संहारक शस्त्रे आपल्या दलामध्ये सामील करा, या सूचनेचेही पालन केली नाही. त्यामुळे चीनविरुद्ध आपण हरलो. दुबळ्या माणसाच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाही. त्यामुळे सुरक्षेची काळजी घ्यायला हवी होती. चरख्यावरच्या सुताने नव्हे तलवारीच्या पात्याने आणि रक्ताने देशाच्या सीमा सुरक्षा करायल्या हव्या होत्या, असे पोंक्षे म्हणाले.

महात्मा गांधी आणि सावरकरांचा एक प्रसंग

यावेळी शरद पोक्षे यांनी एक प्रसंग सांगितला. ते म्हणतात की, कस्तुरबा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या पत्नीची भेट रत्नागिरीतील वास्तव्यात झाली होती. गांधी आणि सावरकर यांची दीड तास चर्चा झाली. पण, दोघांची मते भिन्न होती. त्यानंतर गांधीजींनी सौ. सावरकरांना वंदन केले आणि ते म्हणाले, मी आज यांच्या मतांमध्ये पोळून निघालो. तू यांच्याशी संसार कसा करतेस, असा प्रसंग पोंक्षे यांनी सांगितला.


हेही वाचा – सावरकरांच्या अवमानाविरोधात हिंदुत्ववाद्यांनी आक्रमक व्हावे