घरमहाराष्ट्रवाजपेयी, अडवाणींना विसरणारे बाळासाहेबांची स्वप्ने काय साकारणार?, सामनातून हल्लाबोल

वाजपेयी, अडवाणींना विसरणारे बाळासाहेबांची स्वप्ने काय साकारणार?, सामनातून हल्लाबोल

Subscribe

बई गिळायची हे तुमचे स्वप्न शिवसेना पूर्ण होऊ देणार नाही. हेच बाळासाहेबांचे स्वप्न! घोडा मैदान लांब नाही. तोपर्यंत शिंदे गटाकडून तेल मालीश करून घ्या! अशी खोचक टीका भाजपवर करण्यात आली आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशा दोन गटात शिवसेना विभागली गेली आहे. ज्या भाजपसोबत शिवसेनेने युती तोडली त्याच भाजपच्या पाठींब्याने शिंदे गटाने सरकार स्थापन केले. त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या राजकीय संघर्षाला सुरुवात झाली आहे. अशात सातत्याने दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरु आहे. दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र सामनातूनही शिंदे- फडणवीस सरकार टीकेची तोफ डागवली जात आहे. बाळासाहेबांचे स्वप्न वगैरे ही भाजपच्या तोंडची भाषा हे कारस्थान आहे. हे लोक अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी या मायबापांना विसरले ते बाळासाहेबांचे स्वप्न कसले साकार करणार? असा प्रश्न आज सामनातून उपस्थित करत शिंदे – फडणवीस सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

मुंबई गिळण्याचे स्वप्न शिवसेना पूर्ण होऊ देणार नाही

शिवसेना म्हणजे जनतेची शक्ती आहे. ही शक्ती दुर्बल होऊ नये म्हणून आम्ही तळमळतो. हेच बाळासाहेबांचे स्वप्न आहे. शिवरायांचा महाराष्ट्र आहे असे तोंडाने बोलायचे व कृती औरंगजेबाची करायची. हे धंदे चालणार नाहीत. मुंबई गिळायची हे तुमचे स्वप्न शिवसेना पूर्ण होऊ देणार नाही. हेच बाळासाहेबांचे स्वप्न! घोडा मैदान लांब नाही. तोपर्यंत शिंदे गटाकडून तेल मालीश करून घ्या! असं सामनातून म्हटलं आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीस गटाची सत्ता आली. पण राज्यात कायदेशीर सरकार स्थापन झाले काय? हा प्रश्न जनतेला पडू लागला आहे. सरकारच्या नावाखाली थिल्लरपणाच चालला आहे. मुख्यमंत्री म्हणून श्री. फडणवीस जितके प्रगल्भ, शहाणे होते त्या प्रतिष्ठेचे शिंदे गटाबरोबर मातेरे झालेले दिसत आहे. राज्याच्या प्रश्नांवर ते बोलत नाहीत. त्यांचे बोलणे फक्त शिवसेनेवर आहे. शिवसेना फोडूनही त्यांच्या मनात शिवसेनेचे भय आहे. त्यांच्या मानगुटीवर शिवसेना बसलीच आहे. फडणवीस मुंबईतील दहीहंड्या फोडत फिरले. त्यांनी शिवसेनेशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी ‘मुंबईवर 26/11 प्रमाणे दहशतवादी हल्ला करू, मुंबई उद्ध्वस्त करू’ अशा धमक्या दहशतवाद्यांकडून आल्याने मुंबईसह महाराष्ट्र भयग्रस्त झाला. दहीहंडीचा आनंदोत्सव कोणाला नको? सगळ्यांनाच हवाय. पण सर सलामत तो पगडी पचास! दोन वर्षे उत्सव बंदी होती ती काही मागील सरकारला हौस होती म्हणून नाही. कोरोनामुळे मोदी साहेबांनीच निर्बंध घातले होते ना? आता म्हणे आमच्या राज्यात उत्सव बंदी नाही. अहो देवेंद्रजी, राज्याचे आरोग्य ठिकठाक करून, जवळजवळ कोरोनामुक्त करूनच राज्य तुमच्याकडे सोपवले. पण गेल्या दोन दिवसांच्या उत्सवानंतरचे काय चित्र आहे? असे अनेक प्रश्न विचारात निर्बंधमुक्त सणांवरून सामनातून शिंदे फडणवीस सरकावर टीका केली आहे.

पुन्हा बाळासाहेबांचे नाव घेत मुंबईशीही बेईमानी सुरू

दहीहंडीच्या एकाच दिवशी कोरोनाचे 1500 रुग्ण वाढले आहेत. संसर्ग वाढू लागला आहे. मुंबईत साधारण 6000 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. यास कसला उत्सव म्हणावा? हिवताप, स्वाईन फ्लूने सर्वत्र थैमान घातलं आहे. विदर्भात हिवतापाचे बळी जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात स्वाईन फ्लूचे 17 बळी गेले आणि तुम्हाला पडली आहे मुंबई महानगरपालिकेची! फडणवीसांनी दोन दिवसांपूर्वी ‘बाळासाहेबांसाठी भाजपास मते द्या!’ असे आवाहन केले. त्यावर आम्ही म्हणतो, ‘बाळासाहेबांच्या नावावर कसली मते मागता? तुमचं ते मोदी पर्व, मोदी वादळ ओसरलं काय?’ मुंबई महानगरपालिकेत या मंडळींना शिवसेनेचा पराभव करायचा आहे व शिवसेनेचा पराभव करण्यासाठी ते बाळासाहेबांच्याच नावाचा वापर करीत आहेत. मुंबईचा महापौर त्यांना भाजपचाच म्हणजे दिल्लीश्वरांच्या मर्जीचा करायचा आहे आणि शिंदे गटाची त्यास मान्यता आहे. तुम्ही ठाणे लुटा, आम्ही मुंबईचा लचका तोडतो अशी लांडगेशाहीतील तडजोड झालेली दिसते. पुन्हा बाळासाहेबांचे नाव घेत मुंबईशीही बेईमानी सुरू आहे. असा आरोप सामनातून करण्यात आला आहे.

- Advertisement -

वाजपेयी, आडवाणी युगातील भाजप आज उरला आहे काय? सामनातून सवाल

श्री. फडणवीस म्हणतात, आम्ही खऱ्या शिवसेनेबरोबर आहोत. लोक ज्यांना फुटीर, गद्दार म्हणतात असे लोक फडणवीसांना ‘खरे’ वगैरे वाटत असतील तर या देशाचे, एकंदरीत हिंदू संस्कृतीचे काही खरे नाही. आम्ही म्हणतो, ‘आजचा भाजप अजिबात खरा नाही. अटलबिहारी वाजपेयी, आडवाणी युगातील भाजप आज उरला आहे काय? वाजपेयींचा भाजप शब्दाला आणि इमानाला जागणारा होता. त्या भाजपचा वंश तर सोडा, पण अंशही उरला नाही. अशा शब्दात भाजपावर हल्लाबोल केला आहे.

मरहाटी जनता तुमच्या ढोंगावर आणि सोंगावर थुंकते!

आम्ही त्या भाजपची साथ सोडली व आमच्या वेगळ्या हिंदुत्वाच्या वाटेने निघालो. आम्ही आमची राजकीय भूमिका आहे तशीच ठेवली आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, भाजपचे गुलाम नाही. आम्ही महाराष्ट्राचे इमानी सेवक आहोत, दिल्लीचे चरणदास नाही. आमची हिंदुत्व निष्ठा व महाराष्ट्र स्वाभिमान संशयातीत आहे. आगगाडीत बसणाऱ्या माणसांना झाडे आणि पर्वत पळतात असे वाटते. पण झाडे आणि पर्वत काही पळत नाहीत. ते आहे तेथेच असतात. शिवसेना म्हणजे सह्याद्रीच्या उंच कडेकपारीच आहे. उंदरांना तेथपर्यंत पोहोचता येणार नाही. श्री. फडणवीस हे उचकी लागल्याप्रमाणे बाळासाहेबांच्या नावाचा जप करीत आहेत. काय तर म्हणे, ‘मुंबई महापालिकेत भाजपास मते द्या. आम्ही बाळासाहेबांचे स्वप्न साकार करू.’ काय हे ढोंग? बाळासाहेबांनी ढोंगाचा सदैव तिरस्कार केला. पण या मंबाजींना खरेच बाळासाहेब कळलेत का? बाळासाहेबांची कोणती स्वप्ने तुम्ही साकार करणार आहात? शिवसेनेत फूट पाडून व त्या बळावर मुंबईवरील भगवा उतरवण्याचे तुमचे स्वप्न हे काय बाळासाहेबांचे स्वप्न झाले? मऱहाटी जनता तुमच्या ढोंगावर आणि सोंगावर थुंकते! अशी जहरी टीका शिंदे फडणवीस सरकारवर करण्यात आली आहे.

बाळासाहेबांचे स्वप्न वगैरे ही भाजपच्या तोंडची भाषा हे कारस्थान

फडणवीस वगैरे पुढारी बाळासाहेबांचे स्वप्न उराशी कवटाळून बसले आहेत. 2014 मध्ये शिवसेनेशी ‘युती’ तोडताना या महामंडलेश्वरांना बाळासाहेब आठवले नाहीत. 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेला शब्द तोडतानाही त्यांना बाळासाहेबांच्या स्वप्नांचे स्मरण झाले नाही. आता मोठे आले बाळासाहेबांचे स्वप्न साकार करायला! फडणवीसांचे बोल हे लबाड कोल्ह्याचे आवतण आहे. मुंबई-ठाणेकरांनी सावध राहायला हवे. राज्यात फक्त थिल्लरपणा सुरू आहे. सत्य फक्त हेच आहे की, मुंबईतून मराठी एकजूट संपवायची आहे व त्यासाठी शिवसेनेवर घाव आणि घाव घालायचे आहेत. बाळासाहेबांचे स्वप्न वगैरे ही भाजपच्या तोंडची भाषा हे कारस्थान आहे. हे लोक अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी या मायबापांना विसरले ते बाळासाहेबांचे स्वप्न कसले साकार करणार? असा सवाल सामनातून शिंदे फडणवीस सरकारला विचारण्यात आला आहे.

जगात उगवत्या सूर्याला अर्ध्य देणारे पुष्कळ लोक असतात. तोंडपूजा माणसांची जगात कधीच उणीव नसते. पण शिवसेना म्हणजे जनतेची शक्ती आहे. ही शक्ती दुर्बल होऊ नये म्हणून आम्ही तळमळतो. हेच बाळासाहेबांचे स्वप्न आहे. शिंदे गटाचे मुख्यमंत्रीपद हा साबणाचा बुडबुडा आहे. महाराष्ट्रात चीड आहे, संताप आहे. आम्ही शिवसेनेच्या उपनेत्यांना महाराष्ट्रात पाठवले आहे. आदित्य चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरत आहे. लोकांचा प्रचंड प्रतिसाद त्याला मिळत आहे. लवकरच आम्ही स्वतः महाराष्ट्र पिंजून नव्हे तर घुसळून काढणार आहोत. गद्दारांना त्यांची जागा दाखवून देऊच, पण शिवसेना फोडणाऱ्यांनाही याच जमिनीत गाडून दाखवू. हेच बाळासाहेबांचे स्वप्न आहे. शिवरायांचा महाराष्ट्र आहे असे तोंडाने बोलायचे व कृती औरंगजेबाची करायची. हे धंदे चालणार नाहीत. मुंबई गिळायची हे तुमचे स्वप्न शिवसेना पूर्ण होऊ देणार नाही. हेच बाळासाहेबांचे स्वप्न! घोडा मैदान लांब नाही. तोपर्यंत शिंदे गटाकडून तेल मालीश करून घ्या! अशी खोचक टीका भाजपवर करण्यात आली आहे.


शेतकरी आंदोलनादरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय; एमएसपी पारदर्शकतेसाठी समितीची स्थापना

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -