शिवसेनेला अजून एक झटका, शिवसेना नेते रामदास कदम यांचा राजीनामा, शिंदेगटात जाणार ?

नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने शिवसेनेची साथ सोडत असून आता शिवसेनेचे नेते व माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनीही राजीनामा दिला आहे.

ramdas kadam

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेला घरघर लागली आहे. राज्यातून सत्ता गेल्यानंतर दिवसागणिक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने शिवसेनेची साथ सोडत असून आता शिवसेनेचे नेते व माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनीही राजीनामा दिला आहे. कदम यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला मोठा झटका बसल्याचे समजले जात आहे. रामदास कदम यांनी आपला राजीनामा मातोश्रीवर पाठवला आहे. यात कदम यांनी पक्षात घुसमट होत असल्याचे म्हटले आहे.

Shiv Sena leader Ramdas Kadam has given resignation from the leader post of Shiv Sena. He was in Uddhav Thackeray’s faction.

(file pic) pic.twitter.com/JKbnhh47Na

— ANI (@ANI) July 18, 2022

रामदास कदम यांचा मुलगा आमदार योगेश हा आधीच गुवाहटीला जाऊन शिंदेगटात सामील झाला होता. तेव्हापासूनच कदम देखील शिंदेगटात जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. रामदास कदम यांनी पर्यावरणमंत्री आणि विरोधी पक्षनेतेपदही भूषवले असून फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद देण्यात आले होते. दरम्यान, विधानपरिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारले होते. त्यानंतर ३९ आमदारांबरोबर त्यांनी सूरतमार्गे गुवाहाटी गाठले. या बंडाळीनंतर ठाकरे सरकार अल्पमतात गेल्याने मविआ सरकार कोसळले. तर भाजपबरोबर शिंदेगटाने राज्यात सत्ता स्थापन केली असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. आजच्या तारखेला शिंदेगटात ५० आमदार असून यातील ४० आमदार हे शिवसेनेचे असून १० अपक्ष आमदार आहेत. सुरुवातीला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर शिंदे यांचा गड असलेल्या ठाणे आणि नवी मुंबईसह इतर महानगरपालिकेत मोठ्या संख्येने असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनीही एकनाथ शिंदे यांना पाठींबा देण्याचे जाहीर केले. त्यानंतर शिवसेनेच्या युवा सेनेतील कार्यकरत्यांनीही शिंदेना पाठींबा देण्याची घोषणा केली आहे.

रामदास कदम यांचे राजीनामा पत्र

प्रति,

सन्माननीय श्री. उध्दवजी ठाकरे,

यांसी

जय महाराष्ट्र !

शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहीली नाही, हे मला पहायला मिळालं.

आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला व माझा मुलगा आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानीत करण्यात आले.

विधानसभेच्या निवडणूकीच्या आधी आपण मला आचानक मातोश्रीत बोलवून घेतले आणि मला आदेश दिलेत की यापुढे तुमच्यावरती कोणही कितीही टिका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोण काही बोललं तरी आपण मिडीयासमोर अजिबात जायचे नाही. मिडीयासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही, यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही. मागील ३ वर्षापासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करित आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे.

२०१९ साली आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सरकार बनवत होतात त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत संघर्ष केला व हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत युती करु नका, ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल. अशी आपल्याला विनंती केली होती. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही याचेही दुःख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. आणि म्हणून मी आज “शिवसेना नेता ” या पदाचा राजीनामा देत आहे.

दरम्यान शिंदेगटात मोठ्या संख्येने आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकरत्येही जात असल्याने शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. आता खासदारही शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजप आणि शिंदेगटाशी जुळवून घेण्याचा सल्ला देत आहेत. यामुळे पक्ष टीकवण्यासाठी ठाकरे सरकारपुढे शिंदेगट भाजप सरकारमध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्यायही उरलेला नाही.