घरताज्या घडामोडीराज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा धक्कादायक पराभव, छोटे पक्ष, अपक्षांची नाराजी आघाडीला भोवली

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा धक्कादायक पराभव, छोटे पक्ष, अपक्षांची नाराजी आघाडीला भोवली

Subscribe

उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असे स्वरूप लाभलेल्या राज्यसभेच्या लढाईत फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौशल्याने ठाकरे यांच्यावर मात करीत शिवसेनेला मोठा धक्का दिला.

महाविकास आघाडी विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला अखेर धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असे स्वरूप लाभलेल्या राज्यसभेच्या लढाईत फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौशल्याने ठाकरे यांच्यावर मात करीत शिवसेनेला मोठा धक्का दिला. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राज्यसभेची लढाई जिंकून भाजपने आघाडीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

राज्यसभा निवडणुकीत भाजपचे पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेचे संजय राऊत हे पाच उमेदवार पहिल्याच फेरीत निवडून आले. सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार यांना ३३, तर भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना पहिल्या पसंतीची २७ मते मिळाली. पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा न मिळाल्याने दुसर्‍या पसंतीची मते मोजली गेली. तिसर्‍या फेरीत महाडिक यांनी मतांचा कोटा पूर्ण केल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

- Advertisement -

राज्यसभा निवडणुकीत भाजप आणि आघाडीला पहिल्या पसंतीची मिळालेली मते लक्षात घेता आघाडीची 7 मते फोडण्यात भाजपला यश आल्याचे दिसते. आघाडीला साथ देणारे अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांची नाराजी शिवसेनेला भोवल्याचे स्पष्ट दिसते. अडीच वर्षांपूर्वी आघाडी सरकारच्या विश्वासदर्शक ठरवावेळी तटस्थ राहिलेल्या एमआयएम आणि माकपच्या आमदारांनी आघाडीला मतदान करूनही शिवसेनेला आपल्या उमेदवाराचा पराभव टाळता आला नाही. राज्यसभेतील पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागल्याने नजीकच्या काळात शिवसेना विरुद्ध भाजपमधील संघर्षाला आणखी धार चढणार आहे.

महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. मतदानानंतर भाजप आणि आघाडीने एकमेकांविरोधात तक्रारी करीत भारत निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवले होते. या आक्षेपांमुळे सायंकाळी 5 वाजता सुरू होणारी मतमोजणीची प्रक्रिया मध्यरात्रीपर्यंत खोळंबली होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेत भाजपने ही मते अवैध ठरविण्याची मागणी केली होती, तर आघाडीने सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतांना आक्षेप घेतला होता.

- Advertisement -

हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहचल्यावर आयोगाने व्हिडीओ चित्रीकरण मागवून घेतले. चित्रीकरण पाहून आयोगाने सुहास कांदे यांचे मत अवैध ठरवले. शिवसेनेचे एक मत बाद ठरवून आयोगाने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना मतमोजणी सुरू करण्यास परवानगी दिली. आयोगाचा लेखी आदेश मिळेपर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती. लेखी आदेश प्राप्त होताच निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी मतमोजणीला सुरुवात केली. ही मतमोजणी पहाटे साडेतीन वाजता पूर्ण होऊन पहाटे 4 वाजता निकाल घोषित करण्यात आला. निकालानंतर भाजपने जोरदार जल्लोष केला.

मतमोजणीत पहिल्या फेरीत भाजपचे पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे यांना प्रत्येकी ४८, काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढी यांना ४४, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना ४३, तर शिवसेनेच्या संजय राऊत यांना ४१ मते मिळाली. भाजपचे धनंजय महाडिक यांचे मतमूल्य तिसर्‍या फेरीत ४ हजार १५६वर पोहचल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. शिवसेनेचे दुसरे आणि आघाडीचे चौथे उमेदवार संजय पवार यांना ३३ मतांवर समाधान मानावे लागले. महाडिक यांनी मतांचा कोटा पूर्ण केल्याने पवार यांची दुसर्‍या पसंतीची मते मोजण्यात आली नाहीत. राज्यसभेसाठी २८५ आमदारांनी मतदान केले होते. यापैकी शिवसेनेचे एक मत बाद झाल्याने २८४ मते वैध ठरवून त्याआधारे विजयासाठी मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.

भाजपचे मतांचे व्यवस्थापन यशस्वी

राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी मतांचे अचूक व्यवस्थापन केले. पक्षाचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना निवडून आणण्यासाठी छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या मतांची बेगमी केल्यानंतर फडणवीस यांनी पीयूष गोयल आणि डॉ. अनिल बोंडे यांना पक्षाची पहिल्या पसंतीची जास्तीत जास्त मते टाकण्याची रणनीती निश्चित केली. त्यानुसार दोघांना समान म्हणजे प्रत्येकी ४८ मते मिळाली. विजयी कोट्यापेक्षा अधिकची मते महाडिक यांच्या विजयासाठी महत्त्वाची ठरली. मतदानाचे सूक्ष्म नियोजन आणि अपक्ष, छोटे पक्ष यांना आपल्या बाजूला वळविण्यात यश आल्याने भाजपचा विजय सुकर झाला.

आघाडीचे मतांचे गणित चुकले

राज्यसभा निवडणुकीत मतांचे गणित जमविण्यात आघाडीला अपयश आले. भाजप आपल्या पहिल्या दोन उमेदवारांना प्रथम पसंतीची किती मते देणार याचा अंदाज उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आला नाही. भाजपच्या रणनीतीबाबत आघाडीचे चाणक्य गाफील राहिले. आघाडीने आपले पाहिले तीन उमेदवार सुरक्षित केले. काँग्रेसने कोणतीही जोखीम न पत्करता आपली पहिल्या पसंतीची सर्व ४४ मते इम्रान प्रतापगढी यांच्या पारड्यात टाकली. राष्ट्रवादीने ५३ पैकी प्रफुल्ल पटेल यांना ४४ मते देऊन उर्वरित ९ मते शिवसेनेला हस्तांतरित केली. शिवसेनेने संजय राऊत यांना पहिल्या पसंतीची ४१ मते दिली. याचा परिणाम शिवसेना उमेदवार संजय पवार यांच्या मतमूल्यांवर झाला.

एमआयएम, माकपचा पाठिंबा मिळूनही पराभव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरवावेळी आघाडीकडे १७० इतके संख्याबळ होते. पंढरपूर पोटनिवडणुकीतील पराभवामुळे ते १६९ झाले. अपक्ष आमदार गीता जैन यांच्या शिवसेना प्रवेशामुळे ते पुन्हा १७० झाले. रमेश लटके यांच्या निधनामुळे आघाडीचे संख्याबळ एकने घटले असले तरीही या निवडणुकीत एमआयएमच्या दोन आणि माकपच्या एका आमदाराने आघाडीला पाठिंबा दिला होता. ही तीन अतिरिक्त मते मिळूनही शिवसेनेला राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवता आला नाही.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -