मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात चाललंय काय? शिवसेनेच्या उपविभाग प्रमुखाची भररस्त्यात हत्या

ठाणे – राज्यात राजकीय नेत्यांच्या हत्येचे सत्र वाढले आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून दिवसा-ढवळ्या भररस्त्यात राजकीय पदाधिकाऱ्यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रात दहशत निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातही असाच थरार झाला असून शिवसेना उपविभाग प्रमुखाची काल रात्री दहा वाजता तीक्ष्ण हत्यारांनी हत्या करण्यात आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रवींद्र परदेशी (४८) हे ठाण्यातील खारकर आळी येथे राहण्यास असून ते जांभळी नाका येथील शिवेसनेचे उपविभाग प्रमुख आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच त्यांना हे पद दिले आहे. दरम्यान, पद मिळाल्यानंतर काहीच दिवसांत त्यांची हत्या झाल्याने ठाण्यात राजकीय दहशत निर्माण झाली आहे. त्यांच्या हत्येचे नेमके कारण अद्यापही समजू शकलेले नाही.

रवींद्र परदेशी यांचा ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत कटलरीचा व्यवसाय आहे. ते त्यांचं काम आटोपून घरी जात होते. यावेळी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार केला. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अंतर्गत वादातून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हत्या झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर तुफान गर्दी केली होती. पोलीस याप्रकरणी सखोल चौकशी करत असून खुन्याचा शोध घेत आहेत.