नाशिकमध्ये ठाकरे गटाची रविवारी ‘शिवगर्जना’

नाशिक : शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने राज्यभरात शिवसंवाद अभियान हाती घेण्यात आले असून या अभियानांतर्गत रविवार दि. २६ रोजी नाशिकमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सातपूर येथील सौभाग्य लॉन्स येथे आयोजीत या सभेला माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, शिवसेना उपनेत्या संजना धाडी, युवासेना सचिव वरूण सरदेसाई उपस्थित राहणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. या निर्णयानंतर ठाकरे गटाचे नेत्यांनी बैठका, चर्चा आणि राज्यातील विविध भागात दौरे करण्यावर भर देण्यात आला आहे. या अभियानाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न या अभियानाद्वारे केला जाणार आहे. तसेच पक्षाची पडझड रोखून संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न केले जाणार आहेत. या अभियानासाठी जिल्हावार पदाधिकार्‍यांच्या बैठका घेऊन आढावा घेण्यात येणार आहे. तसेच शाखांची माहिती, पदाधिकार्‍यांची रिक्त पदे, स्थानिक प्रश्नांची माहिती या अभियानाद्वारे घेतली जाणार आहे.

राज्यातील सत्तांतराना नाशिकचा गड मानल्या जाणारया शिवसेनेला मोठा धक्का बसला. दोन आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. नाशिकचे पालकंत्रीपदही शिंदे गटाचे आमदार दादा भुसे यांना देण्यात आले. खासदार हेमंत गोडसे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. एकेक करत नाशिकचा गड ढासाळत असतांना खासदार संजय राउत यांनी नाशिकचा गड सावरण्याचा प्रयत्न केला खरा परंतू ज्या ज्यावेळी राउत नाशिक दौरयावर येत त्यावेळी शिंदे गटाकडून ठाकरे गटाला हादरा देत प्रवेश सोहळे पार पडत आहेत. शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह माजी नगरसेवकांनीही सेनेत प्रवेश केल्याने नाशिकमध्ये शिंदे गटाची ताकद वाढू लागली. आता तर पक्षाचे नाव आणि चिन्हही शिंदे गटाला मिळाल्याने ठाकरे गटाने कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी शिवगर्जना आणि शिवसंवाद अभियान हाती घेतले असून या अभियांनातर्गत संपूर्ण राज्यात सभा घेण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत आता नाशिकमध्येही सभेचे आयोजन करण्यात आले आहे.