गुरुपौर्णिमा हा तर निष्ठेचा उत्सव; राजन विचारेंचा एकनाथ शिंदेंना टोला

गुरुपौर्णिमा म्हणजे निष्ठा आणि विश्वास यांचा उत्सव असतो, अस म्हणत शिवसेना खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे माझेही गुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान एकनाथ शिंदे आणि राजन विचारे आनंद दिघे यांना गुरु मानतात. त्यामुळे दरवर्षी दोघेही एकत्र आनंद मठात जाऊन गुरुपौर्णिमा साजरी करतात. मात्र यंदा बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे गुरुपौर्णिमेला राजन विचारे यांनी एकट्याने आनंद मठात जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना पुष्पहार अर्पण करत वंदन केले, यानंतर त्यांनी दिघेंच्या शक्तीस्थळावर देखील भेट दिली.

हेही वाचा : उल्हासनगर, नाशिकमधील नगरसेवक-पदाधिकारी आमच्यासोबतच – एकनाथ शिंदे

यावेळी बोलताना विचारे म्हणाले की, ठाकरे यांचा आशीर्वाद आणि दिघे यांची शिकवण यामुळेच आज माझा सारखा सामान्य शिवसैनिक खासदार होऊ शकला. मागील 40 वर्षे मी एक सामान्य शिवसैनिक म्हणून मराठी लोकांसाठी आणि हिंदुत्वासाठी कार्य करतोय, तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम शिवसैनिक करीत आहेत.

८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या ध्येयाने शिवसेनेची वाटचाल सुरु आहे. दिघे शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना एके शिवसेना या ध्यासाने तळागाळातील लोकांसाठी तसेच ठाण्यासह महाराष्ट्रातील जनतेचे काम करत राहिले.

दरम्यान शिवसेनेच्या 19 खासदारांपैकी एक असलेले राजन विचारे देखील शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान यापूर्वी काही खासदारांनी देखील उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे गटात सामील होण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ आता खासदारही शिंदे गटात सामील होण्याच्या तयारीत आहेत.


हेही वाचा : राज्याच्या अनेक भागांत पूरस्थिती; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा बंद