Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र श्रावण सोमवार विशेष : गोदावरीचे उगमस्थान ब्रह्मगिरी, विविध पुजा-विधी यांसह 'हे' आहेत...

श्रावण सोमवार विशेष : गोदावरीचे उगमस्थान ब्रह्मगिरी, विविध पुजा-विधी यांसह ‘हे’ आहेत ‘त्र्यंबकेश्वर’चे वैशिष्टे

Subscribe

“सह्याद्रिशीर्षे विमले वसन्तं गोदावरितीरपवित्रदेशे।
यद्दर्शनात् पातकमाशु नाशं प्रयाति तं त्र्यम्बकमीशमीडे॥

ब्रह्मगिरी पर्वत हे अत्यंत प्रतिष्ठित स्थान आहे. या ठिकाणी पवित्र गोदावरीचा उगम झाला आहे. ब्रह्मगिरी पर्वताची उंची समुद्रसपाटीपासून ४२४८ फूट असून ब्रह्मगिरीच्या पर्वतरांगांतून गोदावरी नदी वाहत जाते. ब्रह्मगिरी पर्वतावर ७०० पायर्‍या असून शिखराकडे जाण्यासाठी किमान ४ ते ५ तास लागतात.गंगाद्वार हे ब्रह्मगिरी पर्वताचे मुख्यद्वार मानले जाते. पायथ्यापासून साधारण अर्ध्या किलोमीटर अंतरावर गंगाद्वार आहे. येथे श्री गोदावरी देवीचे मंदिर आहे. असे मानले जाते की, गंगा नदी प्रथमतः गंगाद्वार येथे प्रकट झाली होती आणि गौतम ऋषींनी कुशावर्त तीर्थावर गंगेला पुढे जाण्यास रोखले. त्यामुळे गोदावरी ही गौतमी गंगा नावाने ओळखली जाऊ लागली. कुशावर्त तीर्थावर १२ वर्षांतून एकदा येणारा कुंभमेळा भरतो. पवित्र गंगा नदी तीन दिशेने म्हणजेच पूर्वेकडे-गोदावरी नदी, दक्षिणेकडे-वारणा नदी तर, पश्चिम दिशेला पश्चिमवाहिनी नदी म्हणून ओळखली जाते आणि अंततः ती चक्रतीर्थाला जाऊन मिळते. भाविक त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर पवित्र गंगा आणि अहिल्या नदीच्या पवित्र संगमावर संतती प्राप्तीसाठी वेगवेगळ्या पूजा करण्यासाठी येतात. त्यामुळे या स्थानाला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे.

प्राचीन भारताचा समृद्ध वारसा असलेले मंदिर

त्र्यंबकेश्वर मंदिर अनुकरणीय स्थापत्यकलेचे तेज दर्शविते. विविध कालखंडातील विविध शैलींचे मिश्रण प्रदर्शित करते. मंदिराच्या बाह्य संरचनेत गुंतागुंतीचे कोरीवकाम, शिल्पे आणि अलंकारिक आकृतिबंध आहेत, जे प्राचीन भारताच्या समृद्ध कलात्मक वारशाचा पुरावा म्हणून काम करतात. मंदिराच्या गर्भगृहात भगवान शिवाला समर्पित मुख्य मंदिर आहे. त्र्यंबकेश्वरचे प्रतिनिधित्व करणारे मध्य लिंगम, मौल्यवान रत्नांनी सुशोभित केलेले आहे आणि असंख्य भक्तांकडून श्रद्धापूर्वक पूजा केली जाते. मंदिर परिसरात भगवान विष्णू, भगवान गणेश आणि देवी पार्वती यांसारख्या देवतांना समर्पित इतर विविध मंदिरेदेखील समाविष्ट आहेत.

त्र्यंबकेश्वरमध्ये केल्या जाणार्‍या महत्त्वपूर्ण पूजा

  • नारायण नागबली पूजा : पितृदोषांपासून मुक्ती आणि पूर्वजांच्या शांतीसाठी तसेच, नागाच्या दोषातून मुक्त होण्यासाठी नारायण नागबळी पूजा केली जाते.
  • कालसर्प दोष शांती : ही पूजा जन्मकुंडलीत राहू आणि केतू समोरासमोर असल्यास दोष निवृत्तीसाठी केली जाते.
  • त्रिपिंडी श्राद्ध पूजा : कुटूंबातील एखाद्या व्यक्तीचे अकस्मात निधन झाले असेल व त्याचे धार्मिक अंत्यसंस्कार अथवा श्राद्ध विधिवत झाले नसतील तर अशा आत्म्याला मुक्ती मिळावी या उद्देशाने ही पूजा केली जाते.
  • कुंभ विवाह : एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत मांगलिक दोष असेल तर विशिष्ट समयी मांगलिक व्यक्तीच्या जोडीदाराचा अनैसर्गिक मृत्यू होण्याची शक्यता असते असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते. अशावेळी हा दोष दूर करण्यासाठी व सुखी वैवाहिक जीवनासाठी कुंभ विवाह पूजा केली जाते.
  • रुद्राभिषेक : सुख-समृद्धी लाभावी आणि उत्कर्ष व्हावे यासाठी आराध्य देव शंकराच्या प्रसन्नतेसाठी रुद्राभिषेक केला जातो.
  • महामृत्युंजय मंत्र जप : निरोगी, दीर्घायूष्य, तसेच अकाली मरण टाळण्यासाठी शास्त्रांमध्ये महामृत्युंजय मंत्राचे जाप विधान सांगितले आहे.
- Advertisement -

हेही वाचा : शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह वाहणारे जगातील एकमेव ‘त्र्यंबकेश्वर’ मंदिर

पूजक, पुजारी, पुरोहित या तीन घटकांची जबाबदारी निश्चित

त्र्यंबकेश्वरमध्ये विशिष्ट घराण्यांकडे पूजेचा मान देण्यात आला आहे. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही ती करू शकत नाही. यासाठी पूजा, पूजक आणि पूजारी असे तीन वेगवेगळे घटक आपापल्या जबाबदार्‍या पार पडतात. पुजारी हे वतन तुंगारांकडे आहे. म्हणजे संपूर्ण व्यवस्थापन करणे, साफसफाई करणे, पिंडीची आजुबाजूची स्वच्छता करणे ही सर्व त्यांची जबाबदारी. आलेल्या भाविकांकडून पूजा करून घेण्याचे काम पुरोहितांचे आहे. मंदिरात दररोज सकाळी ७: ते ९: दुसरी पूजा १०: ते १२: आणि सायंकाळी ७ ते ८: या कालावधीत तिसरी पूजा होते. शयन आरतीनंतर मंदिर बंद होते. देवकांची पूजा करण्याचे अधिकार पूजकांकडे आहे. देशभरात त्र्यंबकेश्वर हे असे एकमेव ज्योर्तिलिंग आहे जेथे मंदिरात दररोज त्रिकाल पूजा केली जाते. या पूजेचे घराणेही निश्चित करण्यात आलेले आहेत. त्या घराण्यांव्यतिरिक्त ती पूजा कुणीही करू शकत नाही.

मराठा, पेशव्यांनी केले मंदिराचे जतन

- Advertisement -

शतकानुशतके, त्र्यंबकेश्वर मंदिराची स्थापत्य, अखंडता टिकवून ठेवण्यासाठी अनेकदा नूतनीकरण आणि जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मराठा आणि पेशव्यांसह विविध राज्यकर्त्यांनी आणि राजघराण्यांनी मंदिराच्या देखभाल आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अलीकडच्या काळात, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि मंदिर ट्रस्टने मंदिराच्या वारशाचे रक्षण आणि पुनर्संचयित करण्यासाठी भरीव उपक्रम हाती घेतले आहेत

हेही वाचा : हेमाडपंती स्थापत्यशैलीतील ‘त्र्यंबकेश्वर’ मंदीराबद्दल तुम्हाला ‘हे’ माहितीये का ?

पालखी मिरवणूक

दर सोमवारी पालखी सोहळा होतो. दुपारी ३ वाजून ४७ मिनिटांनी पालखी मिरवणूक सुरू होते. श्रावण महिन्यात ही मिरवणूक एक तास आधी निघते. ही पालखी त्र्यंबक मंदिरातून कुशावर्त तीर्थावर जाते. कुशावर्त तीर्थावर पालखी आल्यानंतर त्याची पूजा करण्याचा मानही फडके घराण्याकडे देण्यात आलेला आहे. त्यांच्याशिवाय हा मान कुणालाही दिला जात नाही. पूजेनंतर पालखी मेनरोडने मंदिराकडे जाते. पालखीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर त्र्यंबकेश्वराच्या पेशवेकालीन मुकूटाची पूजा केली जाते. पालखीत पंचमुखी मुखवटा आणला जातो. तो ११ किलोचा असून सोन्याचा आहे. या मूर्तीलाही ठराविक घटक स्पर्श करू शकतात. महाशिवरात्रीची पालखी संपूर्ण गावातून जाते. गावात सीमोल्लंघनाची परंपरा आहे.

देवस्थानची स्वतंत्र घटना आहे. घटनेत पूर्वी ज्योर्तिंलिंगाच्या व्यतिरिक्त कोणत्याही सार्वजनिक उपक्रमाकरीता खर्च करण्याची तरतूद घटनेत नव्हती. मात्र, आता ती तरतूद झाली आहे. प्रसादालयाची इमारत तयार आहे. २८० लोक एकावेळी भोजन करू शकतील अशी व्यवस्था आहे. भक्तनिवासाचीही इमारत तयार आहे. त्यात ४० खोल्या बांधण्यात आलेल्या आहेत. देवस्थानच्या वतीने विविध प्रकारचे उत्सव साजरे केले जातात. यंदाच्या वर्षी सर्वसमावेशक विश्वस्तांची नियुक्ती झाली आहे. पुरोगामी विचारांची ही फळी निश्चितच विकासासाठी कटिबद्ध आहे. येणार्‍या भाविकांना चांगल्या सुविधा निर्माण करून देण्याबरोबरबरच मंदिर परिसराचाही विकास केला जाईल. : मनोज थेटे, विश्वस्त प्रतिनिधी, पुरोहित संघ

- Advertisment -