घर उत्तर महाराष्ट्र श्रावण सोमवार विशेष : शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह वाहणारे जगातील एकमेव 'त्र्यंबकेश्वर' मंदिर

श्रावण सोमवार विशेष : शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह वाहणारे जगातील एकमेव ‘त्र्यंबकेश्वर’ मंदिर

Subscribe

ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक अर्थात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर राजाचे मंदिर. मंदिराला ऐतिहासिक तसेच धार्मिक महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील तिसर्‍या श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी देशभरातील भाविक गर्दी करत असतात. दर १२ वर्षांनी नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा भरत असतो. विशेष म्हणजे देशभरातील हे एकमेव आश्चर्यकारक ज्योतिर्लिंग जेथे शिवलिंग नाही.

येथील शिवलिंगात ब्रह्मा, विष्णू, महेश हे तीनही देवता विराजमान आहेत. देशात एकत्र तीनही देवांची पूजा कुठेही होत नाही, ती केवळ त्र्यंबकेश्वरमध्येच होते. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरु असतो. या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग असल्याचे सांगितले जाते. या ज्योतिर्लिंगावर ‘त्रिकाल पूजा’ अर्थात दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते. ही पूजा द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरातच होते.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. सर्व १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे विशेष आहे. हे स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून २८ किमी अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी स्थित आहे. पवित्र गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे. मंदिर प्रांगणाच्या जवळच कुशावर्त तीर्थ आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधीदेखील त्र्यंबकेश्वरमध्येच आहे. त्र्यंबकेश्वरात अनेक धार्मिक संस्थाही आहेत ज्या वेदशाळा, संस्कृत पाठशाळा, कीर्तन पाठशाळा, प्रवचन संस्था चालवितात. पौराणिक संदर्भानुसार, ब्रह्मदेवांनी येथील एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले. हे ठिकाण नंतर ब्रह्मगिरी पर्वत नावाने विख्यात झाले. या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा आश्रम होता.

गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले. गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्योतिर्लिंग हा शब्द प्रकाशस्तंभ दर्शवतो. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर ११ ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे. कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा-विष्णु-महेश विद्यमान आहेत. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो. या स्वरूपाचे हे जगातील एकमेव शिवलिंग आहे. या मंदिराचे आणखी वैशिष्ठ्य म्हणजे, ज्योतिर्लिंगावर त्रिकाल पूजा केली जाते. स्थानिकांच्या माहितीनुसार ३५० वर्षांपासून पूजेची परंपरा सुरू आहे. ही पूजा १२ ज्योतिर्लिंगांपैकी केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरातच होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -