‘एलआरटी’साठी ‘ग्रीन थंब’ची स्वाक्षरी मोहीम

पुणे : बीआरटीच्या रस्त्यात एलआरटी मेट्रो टाकण्याच्या संदर्भात ‘ग्रीन थंब पर्यावरण संस्थेॠतर्फे शहरात सह्यांची मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे जनजागृती करून पुणेकरांना पुणे मेट्रो आणि बीआरटीची अनावश्यकता पटवून देण्यात येणार आहे. लाखो पुणेकरांच्या स्वाक्षरींसह एलआरटीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत असलेली ‘ग्रीन थंब’ यापुढे पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाचा असलेला वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी काम करणार असून एलआरटी ही त्याचाच एक भाग आहे.

या मोहिमेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही करण्यात येणार आहे. तसेच ड. आशुतोष श्रीवास्तव यांच्याद्वारे मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात येणार आहे.

शहर आणि उपनगरांना जोडणार्‍या सर्वसमावेशक वाहतूक पर्यायाची आज पुणेकरांना नितांत गरज आहे. पुणे मेट्रोवर होणारा हजारो कोटींचा खर्च टाळून वाहतुकीचा सर्वसमावेशक पर्याय म्हणून एलआरटी हा सर्वोत्कृष्ट पर्याय आहे.या मोहिमेत पुणेकरांना सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांचे मत जाणून घेण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा परिसंवाद शुक्रवार दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान नवी पेठेतील पत्रकार भवनच्या सभागृहात होणार आहे.

‘ग्रीन थंब’ ही पुणे परिसरात पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत असलेली माजी सैनिकांची एक स्वयंसेवी संस्था आहे. संस्थेतर्फे आतापर्यंत खडकवासला धरणातून सुमारे १० लाख टन गळ काढून येथील परिसरात सुमारे ५ लाख झाडांची लागवड करण्यात आली आहे. धरण काठाला तारेचे कुंपण करून येथील परिसराचे अतिक्रमणापासून संरक्षण केले आहे. शेतकर्‍यांना गाळाचे मोफत वाटप करून हजारो एकर शेतीची उत्पादन क्षमता वाढविली असून धरण किनार्‍यावर एक सुंदर पर्यटनस्थळ विकसित केले आहे.