घरताज्या घडामोडीकाही लोकांना दुसरा उद्योग नसतो

काही लोकांना दुसरा उद्योग नसतो

Subscribe

किरीट सोमय्यांच्या आरोपांना भुजबळांचे प्रत्यु्त्तर

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोप करत भ्रष्टाचार प्रकरणी मंत्रीमंडळातून त्यांची हकालपटटीची मागणी केली होती. सोमय्यांच्या आरोपांना भुजबळ यांनी शनिवारी नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्यु्त्तर दिले आहे. मुळात जुने प्रकरण पुन्हा उकरून काढत शिळया कढीला ऊत आणण्याचा हा प्रकार आहे. या प्रकरणात कोर्टात केस चालू आहे. परंतु काही लोकांना दुसरा काही उद्योग नसतो त्यामुळे पुन्हा पुन्हा अशा प्रकारचे आरोप केले जातात असा टोला भुजबळ यांनी लगावला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अशा प्रकारचे आरोप करत बदनामीचे षडयंत्र आहे की काय ? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

किरीट सोमय्या यांनी गेल्या आठवडयात नाशिकमध्ये येत भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. तसेच भुजबळांवर आरोपांचा भडीमार केला. आयकर विभागाने भुजबळांची १२० कोटींची मालमत्ता जप्त केली असून मुंबईतील बंगल्याचा मालक कोण याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. सोमय्या यांनी केलेल्या आरोपाबाबत भुजबळांना विचारले असता ते म्हणाले, आयकर विभागाने अशी कुठलीही कारवाई केलेली नाही. आज ते जे आरोप करताहेत हे आरोप गेल्या चार पाच वर्षापूर्वीच त्यांनी आमच्यावर केले. या सगळ्याबाबत आता सेशन कोर्ट आणि हायकोर्टात केस सुरु आहे. परंतू पुन्हा शिळया कढीला ऊत आणण्याचा हा प्रयत्न आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर बदनामीचा हा कट तर नाही ना? किंवा कोर्टात केस सुरू असल्यामुळे पुन्हा आरोप करण्याचा हा डाव आहे की काय? अशी शंका उपस्थित करत काही लोकांना दुसरा उद्योग नसतो त्यामुळे ते सातत्याने आरोप करत असतात असा टोलाही भुजबळ यांनी सोमय्यांना लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -