घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रSpecial Report : शिक्षक फसला ‘सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात; व्हिडिओ गेला थेट मुलाकडे आणि...

Special Report : शिक्षक फसला ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात; व्हिडिओ गेला थेट मुलाकडे आणि पुढे घडले असे…

Subscribe

नाशिक : तरुणांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातून अनेकांनी पैसेदेखील उकळले आहेत. मात्र, आता सायबर भामट्यांंनी थेट शिक्षकांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. नाशिकमधील एका शिक्षकाला सायबर भामट्याने सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून लाखो रूपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, सायबर भामट्याने शिक्षकाच्या मुलाला अश्लिल व्हिडीओ पाठविले. त्याबाबत मुलाने वडिलांना विचारणा केली असता त्यांना धक्का बसला. याप्रकरणी शिक्षकाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळी सुटी सुरु झाल्याने नाशिक शहरातील एक शिक्षक घराजवळील झाडाखाली बसले होते. त्यावेळी ते फेसबुकवरील पोस्ट पाहत होते. दरम्यान, त्यांना अनोळखी क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला. व्हिडीओ कॉलमध्ये सुंदर तरुणीचा फोटो दिसत असल्याने त्यांनी कॉल रिसीव्ह केला. मात्र, हा कॉल त्यांना फसवणूक करण्यासाठी आलेला आहे, हे समजले नाही. तरुणीने शिक्षकाशी भावनिक बोलण्यास सुरुवात केले. तिचे बोलणे ऐकून ते प्रभावीत झाले. ही संधी साधत तरूणीने थेट न्यूड कॉल केला. तरीही शिक्षक तिच्याशी भावनिक बोलत होते. अनोळखी तरूणीने शिक्षकाला बोलण्यात गुंतवत पटकन व्हिडीओ डाऊनलोड करण्यासह स्क्रिनशॉट काढून घेतला.

- Advertisement -

अनोळखी तरुणीने शिक्षकाला कॉल करत पैशांची मागणी सुरु केली. तिचा सुरुवातीचा संवाद आणि आता थेट पैशांची मागणी ऐकून शिक्षकांना काय बोलावे आणि काय करावे, ते सुचत नव्हते. शिवाय, ही बाब कुटुंबियांनासुद्धा समजली. शेवटी, त्यांनी एका पोलीस मित्राला कॉल करत आपबिती सांगितले. पोलीस मित्राने त्यांना मार्गदर्शन करत पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले. तोपर्यंत अनोळखी तरूणीचे वारंवार धमकीचे कॉल सुरु होते. शिक्षकाने सायबर पोलीस ठाण्यात येत आपबिती सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शिक्षकाला आधार देत कारवाईचे आश्वासन दिले. तेंव्हा शिक्षक तणावमुक्त झाले. याप्रकरणी शिक्षकाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

व्हिडीओ पाहून मुलगा म्हणला, या वयात हे असले उद्योग

अनोळखी तरुणीने शिक्षकाचा अश्लिल व्हिडीओ मुलाला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला. तो व्हिडीओ पाहून मुलाला धक्काच बसला. तो वडिलांना व्हिडीओ दाखवत म्हणाला की, या वयात हे असले उद्योग कशाला करता. मुलाचे बोलणे ऐकून आणि अश्लिल व्हिडीओ असल्याचे समजताच ते अस्वस्थ झाले. तितक्यात त्यांना अनोळखी तरूणीने कॉल करत पैशांची मागणी केली. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सुरु झाला.

- Advertisement -

जाळ्यात अडकण्यासाठी अशी केली जाते फसवणूक

अनोळखी व्यक्तीला पहिलं पेमेंट करण्यापूर्वीच पोलिसांची मदत घ्या. खर्‍या महिलेचा फक्त फोटो टार्गेटला दाखवलेला असतो. व्हिडिओ कॉलमध्ये टार्गेटचा फ्रंट कॅमेरा आणि महिलेचा रिअर कॅमेरा चालू असतो. महिला स्वतः नग्न होत नसते तर रिअर कॅमेरा चालू आहे दाखवून पॉर्न व्हिडिओ चालवले जातात. पण यात टार्गेटचा फ्रंट कॅमेरा चालू असल्याने अडकवले जाते.

काय आहे सेक्स्टॉर्शन

 सुरुवातीला फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली जाते. सायबर भामट्यांनी तरुणींना अश्लिल बोलायला तयार केलेले असते. अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन हा व्हिडिओ कॉल केला जातो. ओळख होताच तरुणी नग्न होऊन व्हिडिओ कॉल करते. समोरच्या व्यक्तीलाही कपडे काढायला लावते. बोलण्यात गुंतवून रेकॉर्डिंग केले जाते. त्यांतर खंडणी मागण्यास सुरुवात होते. खंडणीची रक्कम बनावट खात्यात मागवली जाते. पहिले पेमेंट ही फक्त सुरूवात असते. पैसे दिल्यानंतर वारंवार खंडणीची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. व्हॉईस मॉड्युलेशनचा वापर करुनही खंडणी मागितली जाते. हे रॅकेट दिवसेंदिवस वाढत आहे.

अशी घ्या खबरदारी

  • ओळखी व्यक्तीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली तरी तो आयडी त्याच व्यक्तीचा आहे की नाही, याची शहानिशा करावी.
  • फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, स्नॅपचॅटवर चॅटिंग करताना खासगी गोष्टी व बँक खात्याची माहिती कोणालाही देवू नये.
  • सोशल मीडियावर अनोळखी व्यक्ती ब्लॅकमेल करुन धमकावत असेल तर तात्काळ कुटुंबियांसह पोलिसांना माहिती द्यावी.
  • फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवरील फ्रेंडलिस्ट नियमित तपासावी. त्यामध्ये अनोळखी व्यक्ती सहभागी झाला आहे की नाही, याची शहानिशा करावी.
  • सोशल मीडियावर अश्लिल व बदनामीकारक चॅटिंग करु नये.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -