घरCORONA UPDATEदररोज १७० किमी बाईक चालवून ST कर्मचारी कामावर हजर; तर मुलगाही BEST

दररोज १७० किमी बाईक चालवून ST कर्मचारी कामावर हजर; तर मुलगाही BEST

Subscribe

कोरोना विषाणूने जगभरात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेल्या दीड महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. आता तर १७ मे पर्यत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे एकीकडे अत्यावश्यक सेवा देणाऱ्याचे कर्मचाऱ्यांचे मनोबल दिवसेंदिवस ढासळत आहे. मात्र दुसरीकडे कुर्ला नेहरूनगर आगारातील एक एसटी कर्मचारी निवृत्तीचा उंबरठ्यावर असून सुद्धा जीवाची आणि कुटूंबियांची पर्वा न करता मोठ्या उत्साहाने कर्तव्यावर येत आहे. दररोज चक्क दुचाकीने १७० किलोमीटर अंतर कापत ते कार्यालय गाठत आहेत. हे अंतर कापण्यासाठी तब्बल त्यांना ५ तासांचा कालावधी लागतो. विशेष म्हणजे त्यांच्या एक मुलगा सुद्धा बेस्टमध्ये चालक म्हणून देवनार डेपोत सेवा देतो आहे. बाप-लेकांच्या समर्पणाच्या भावनेमुळे एसटी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे.

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी रात्रंदिवस डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचारी, स्वछता कर्मचारी आणि पोलीस गेल्या दीड महिन्यापासून अहोरात्र काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळाकडून मुंबई, ठाणे आणि पालघर विभागात एसटी बसेस धावत आहेत. मात्र एसटी महामंडळातील अनेक कर्मचारी लॉकडाऊनमुळे गाव- खेड्यात अडकून असल्याने सध्या कर्तव्यांवर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. हा ताण अधिक वाढू नये, याकरिता कुर्ला नेहरूनगर आगारातील ५६ वर्षांचे वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर वाघोले दररोज पुण्या जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून रोज कामावर येत आहेत.

- Advertisement -

लॉकडाऊन पूर्वी ज्ञानेश्वर हे एसटी बसेस मधून कर्तव्यांवर येत होते. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने ज्ञानेश्वर दुचाकी वाहनाने कार्यलय गाठतात. ज्ञानेश्वर हे जुन्नर तालुक्यातील रविवार पेठ येथे वास्तव्याला आहेत. घरी ८२ वर्षांचे वडील आणि ७८ वर्षांची आई असून त्यांच्या देखभालीची जबाबदारी ज्ञानेश्वर यांच्यावरच आहे. त्यांना तीन मुले असून तिघेही अत्यावश्यक सेवेत वेगवेगळ्या जिल्हात काम करतात. तरी सुद्धा या दोन्ही आघाडीवर ते उत्तम काम करत आहे. जुन्नर ते मुंबई हे अंतर जवळपास १७० किलोमीटरचे आहे. दररोज आपल्या स्कुटीने कर्तव्यांवर येण्यासाठी ते भल्या पहाटे घरून निघायचे, तब्बल ५ तासांचा प्रवास करून कर्तव्यावर हजर राहत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्ञानेश्वर मुंबईत ये-जा करत असल्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन करण्याचे तिथल्या स्थानिक प्रशासनाने निर्णय घेतला होता. मात्र ज्ञानेश्वर यांनी अत्यावश्यक सेवेत आपलं महत्व पटवून देऊन आरोग्य विभाग आणि एसटी महामंडळाशी पत्रव्यवहार करून त्यातून सुटका मिळवली. आत फक्त सतत दोन किंवा तीन दिवसानंतर ते घरी ये-जा करत आहेत.

वडीलाबरोबर मुलगा सुद्धा बेस्टमध्ये देतोय सेवा

ज्ञानेश्वर यांचा मुलगा महेश ज्ञानेश्वर वाघोले हा बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागात कार्यरत आहे. तो सध्या देवनार डेपोत चालक म्हणून आपली सेवा देत आहे. महेश हा लॉकडाऊन काळात घरी न जाता सेवा देत आहे. तो देवनार डेपोतच मुक्काम करतो. हे दोघेही वडील आणि मुलगा एसटी आणि बेस्टमध्ये या संकटकाळात आपली सेवा देत आहेत. नुकतेच कुर्ला नेहरू नगर आगारात एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. तसेच बेस्टमध्ये सुद्धा कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे एकीकडे भीती असून दुसरीकडे कर्तव्य बजावणारे कर्मचारी आहेत. त्यामुळे सामाजिक जाणीव ठेवून कसलीही तक्रार न करता, वडील आणि मुलगा मोठ्या ध्येर्याने आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. या दोघेंचे कौतुक सुद्धा सर्वत्र होत आहे.

- Advertisement -

 

कोरोनाशी दोन हात करणारे डॉक्टर,पोलीस आणि स्वछता कर्मचारी हे खरे कोरोना योद्धा आहेत. त्यांना सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्नशील आहे. मी आणि माझा मुलगा आम्ही आपलं फक्त कर्तव्य बजावत आहे. एसटी महामंडळाकडून दिल्या प्रोत्साहनामुळे आज काम करत असताना कसली अडचण येत नाही आहे. – ज्ञानेश्वर वाघोले
Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -