एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव तयार ? अनिल परब अजितदादांच्या भेटीला

st worker strike anil parab move to meeting with ajit pawar discussion on payment hike
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव तयार ? अनिल परब अजितदादांच्या भेटीला

एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी बैठकीत चर्चा केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक असून हा संप आजच मिटण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढ करण्याबाबत राज्य सरकार तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु यामध्ये आर्थिक तरतूद गरजेची असल्यामुळे अनिल परब अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्ट मंडळासमोर मंगळवारी पगारवाढ करण्याचा पर्याय ठेवला होता. यानुसार बुधवारी अनिल परब आणि एसटी कर्मचारी यांच्यात बैठकीची दुसरी फेरी झाली आहे. या बैठकीत अनेक मागण्यांवर चर्चा करण्यात आली आहे. पगारवाढ करण्याचा प्रस्ताव आता अजित पवारांच्या कोर्टात गेला आहे. आर्थिक तरतूद मिळाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. अंतरिम पगारवढ करण्यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब सकारात्मक असून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करुन हा निर्णय घेण्यात येणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी असणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीमध्ये असे म्हटलं आहे की, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत अनेक विषायंवर चर्चा झाली आहे. चर्चा सकारात्मक सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अंतरिम पगारवाढीबाबत सखोल चर्चा करण्यात आली असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत हे दोन्ही नेते अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. बुधवारी संध्याकाळी ६ वाजता एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत अधिकृत माहिती देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांचे निलंबन, सेवानिवृत्तीची कारवाई मागे घेण्यात येणार

एसटी कर्मचाऱ्यांवर संपा दरम्यान करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्य सरकार आणि एसटी महामंडळाकडून ज्या कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आलं आहे. तसेच सेवानिवृत्तीची कारवाई देखील मागे घेण्यात येणार आहे. आंदोलकांवर जी कारवाई करण्यात आली त्या सर्व कारवाई आता राज्य सरकारकडून मागे घेण्यात येणार आहेत. सर्व एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा महिन्याच्या ७ तारखेपर्यंत होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.


हेही वाचा : महाराष्ट्र सरकारनं शेजारच्या राज्यांच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा अभ्यास करावा – शरद पवार