Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र परत घ्या, परत घ्या, साहेब निर्णय परत घ्या!; वाचा, नाशिकच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया

परत घ्या, परत घ्या, साहेब निर्णय परत घ्या!; वाचा, नाशिकच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया

Subscribe

नाशिक : राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षातील निवृत्तीच्या निर्णयावर नाशिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे. ‘परत घ्या, परत घ्या, साहेब निर्णय परत घ्या’, अशी आग्रही मागणी आमदार, पदाधिकार्‍यांनी केली आहे. शरद पवारांचं राजकीय आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’च्या सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन झाले. या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त करत राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांनी निर्णय जाहीर केल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक मंगळवारी तातडीने घेण्यात आली. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा असा ठराव या बैठकीत करण्यात आला…

शरद पवार साहेब आमचे सर्वेसर्वा आहेत. त्यांचा निर्णय आम्हाला मान्य नाही. मी शिवसेना सोडून त्यांचा हात धरुन राष्ट्रवादीत आलो. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासोबत बाहेर पडणारा पहिला कार्यकर्ता मी होतो. मग असे कसे ते आम्हाला अचानक सोडू शकतात? आम्ही पवार साहेबांच्या घरी जाऊन राजीनामा मागे घेण्यास भाग पाडू. : आ. छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे नेते

- Advertisement -

देशातील एक दुरदृष्टीचे नेते म्हणून पवार साहेबांकडे पाहीले जाते. त्यांचा राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनुभव दांडगा आहे. कोणत्यावेळी कोणता निर्णय घेतला पाहिजे, त्याचा समाज जीवनावर होणारा परिणाम याचा अत्यंत बारकाई अभ्यास त्यांचा असतो. त्यांच्यासारखी दुरदृष्टी आजतरी अन्य कोणत्याही नेत्याकडे नाही. त्यांचा हा निर्णय जनतेला रूचलेला नाही. : अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्याचे ऐकून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसला. हा राष्ट्रवादीचा अंतर्गत मामला असला तरी पवार साहेबांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. त्यांची महाराष्ट्र आणि देशाला गरज आहे. त्यामुळे त्यांनी निर्णय मागे घ्यावा. पवार साहेबांची दूरदृष्टी,सर्व क्षेत्रातील गाढा अभ्यास आहे. त्यामुळे त्यांची सर्व महाराष्ट्र आणि देशातील जनतेला खूप गरज आहे. : सुहास कांदे, आमदार, नांदगाव

- Advertisement -

पवार साहेबांचा निर्णय हा आमच्या सारख्या कार्यकर्त्याला पटलेला नाही. साहेबांच्या मार्गदर्शनाची या राज्याला आणि देशाला गरज आहे. पवार साहेबच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आहेत आणि राहतील. आज ज्या परिस्थितीतून देश चालला आहे अशा परिस्थितीत पवार साहेबांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे निश्चितच पवार साहेब आपल्या निर्णयाचा फेरविचार करतील. : दिलीप बनकर, आमदार निफाड

पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री असतांना शेतकरी, आदिवासी, दलित, महिला, कष्टकरी, कामगार यांच्यासाठी त्यांनी जे निर्णय घेतले त्यामुळे हा वर्ग जोडला गेला. या वर्गाचा विचार करुन तरी पवार साहेबांनी निवृत्तीचा निर्णय घेऊ नये ही जनभावना आहे. पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे ते याबाबत विचारपूर्वक निर्णय घेतील, अशी मला खात्री आहे. : श्रीराम शेटे, माजी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

पवार साहेबांचा निर्णय हा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पटलेला नाही. तळागाळातील प्रश्नांची सखोल जाण असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे. राज्याचेच नव्हे तर देशातील प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचे अढळ स्थान आहे. त्यांचा राजकीय, सामाजिक अनुभव पाहता पवार साहेबांच्या मार्गदर्शनाची आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आवश्यकता आहे. : रंजन ठाकरे, शहराध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस

पवार साहेब आमचे खंबीर नेतृत्व असून त्यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा ही आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे. साहेबच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आजपर्यंत देशावर आलेल्या प्रत्येक संकटसमयी साहेबांचा सल्ला घेतला गेलेला आहे. त्यामुळे साहेबांची पक्षालाच नव्हे तर देशाला देखील गरज आहे. सध्या देश ज्या परिस्थितीतून चालला आहे त्या काळात साहेबांची खंबीर साथ आवश्यक आहे. : कोंडाजी आव्हाड, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस 

शरद पवारांनी अत्यंत कष्टाने पक्षबांधणी केली आहे. राज्याचेच नव्हे तर देशाचे एक सक्षम नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांची चांगल्या प्रकारे जाण असलेला हा नेता आहे. पक्षाला त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने पवारांच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. : रविंद्र पगार, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

शरद पवार साहेबांचे वय बघता पक्षाची जबाबदारी सांभाळणे, देशात, राज्यात सातत्याने दौरे करणे, विविध क्षेत्रातील लोकांना भेटणे त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आदी सर्व कामाचा व्याप पाहता त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे असे मला वाटते. साहेब पदावर नसले तरी नवीन नेतृत्वाला त्यांचे मार्गदर्शन कायमच मिळतच राहणार आहे. : शिवदास डागा, ज्येष्ठ नेते

समाजवादी काँग्रेसपासून माझे वडील अ‍ॅड. पंडितराव पिंगळे व आम्हा कुटुंबीयांचा स्नेह, पवार साहेबांबरोबर राहिला आहे. वय व आजारपण बाजूला ठेवून, बहुजनांना साहेबांनी मदत केली. आजचा त्यांचा निवृत्तीचा निर्णय त्या अनुषंगाने क्लेशदायक आहे. व्यक्तिगत पातळीवर योग्य वेळी योग्य निर्णय साहेबच घेऊ शकतात. : सचिन पिंगळे, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

 

सर्व कार्यकर्त्यांना जोश हा पवार साहेबांकडूनच मिळतो. जर पवार साहेबच पक्षाच्या अध्यक्ष पदावर नसतील तर कार्यकर्त्यांच काय होईल? पवार साहेबांच्या नेतृत्वाची आम्हा युवा कार्यकर्त्यांना नितांत आवश्यकता आहे. त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी आमची मागणी आहे. : अंबादास खैरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

 

साहेब नेहमी म्हणतात, मी काय म्हातारा झालोय का? मग आज निवृत्त होण्याचा निर्णय का घेतला? पक्ष संकटात असतांना साहेब कधी पावसात उभे राहिले ज्यामुळे सत्तापालट झाला. तर कधी वादाळासारखे प्रत्येक संकटाशी लढत राहिले. साहेबांच्या निर्णयाने नेहमी पक्षाला पुढे नेले. मात्र आजचा निर्णय आम्हाला मान्य नाही. : प्रेरणा बलकवडे, महिला जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

शरद पवार साहेब हे आमच्या हृदयात आहेत. त्यांच्याशिवाय पक्ष अशी कल्पनाही करू शकत नाही. शरद पवार सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे नेते आहेत. पुरोगामी विचारसरणीचे देशातील सर्वात मोठे नेते आहे. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आलो आहेत व करणार. पवार साहेबांनी आपला राजीनामा मागे घ्यावा. : संजय खैरनार, सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस

- Advertisment -