घरमहाराष्ट्रटाटा एअरबस प्रकल्प : महाराष्ट्रातील कोणते हवामान खराब झाले की...., जितेंद्र आव्हाडांची...

टाटा एअरबस प्रकल्प : महाराष्ट्रातील कोणते हवामान खराब झाले की…., जितेंद्र आव्हाडांची टीका

Subscribe

ठाणे : टाटा एअरबसबाबत आपण अनेक वर्ष ऐकत होतो. हा प्रकल्प महाराष्ट्रातच येणार होता. त्यासाठी जागेची निश्चिती करण्यात आली होती. हा प्रकल्प महाराष्ट्रात ‘लँड’ होत असताना अचानक महाराष्ट्रातील कोणते हवामान खराब झाले की, ते अचानक गुजरातमध्ये लँड झाले, हे कळायला मार्ग नाही. पण, महाराष्ट्राचे होणारे नुकसान; महाराष्ट्रातील तरुणांना मिळणारी नोकरीची संधी दिवसेंदिवस हिरावून घेतली जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.

वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता एअरबस प्रकल्प गुजरातला गेला आहे. याबाबत डॉ. आव्हाड यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यातील उद्योग परराज्यात जात आहेत. त्यावर महाराष्ट्राच्या वेदना तीव्र आहेत. एवढे मोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या घशातून ओढले जात असतील तर महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान आणि प्रगतीवर फेकलेला दगड आहे, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली.

- Advertisement -

एक काळ असा होता की, देशातील कोणात्याही भागातील तरुणाने महाराष्ट्रात यायचे आणि 24 तासात त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था ही महाराष्ट्राची माती करायची! या मातीचा गुणधर्मच होता की, भारतातील कोणत्याही माणसाला महाराष्ट्राने उपाशी झोपू दिले नाही. आता मात्र या मातीतच जन्माला आलेल्या तरुणाईला उपाशी झोपावे लागत आहे. दिवसेंदिवस बेरोजगारीचा जो आलेख चढताच आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच इतही बेरोजगारी महाराष्ट्रात दिसत आहे. ही बाब नक्कीच चांगली नाही. उपाशीपोटी झोपणारी मुले आणि त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्यात, असे ते म्हणाले.

- Advertisement -

चॉकलेटसारखे आमीष दाखवले
राज्यकर्ते जर येथून जाणारे प्रकल्प-उद्योग थांबवू शकत नसतील, तर त्यांचे ते मोठे अपयश आहे. इंग्लडमध्ये फक्त महागाई झाली म्हणून अवघ्या 45 दिवसांत पंतप्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. एवढी संवेदनशीलता अपेक्षित नाही. पण, फॉक्सकॉन गेल्यानंतर आम्हाला मोठा प्रकल्प देण्यात येईल, असे आश्वासित करण्यात आले होते. लहान मुलाला जसे चॉकलेटचे आमीष दाखविले जाते; तसेच आमीष फॉक्सकॉनच्या वेळी दाखविले होते. त्यावर आता काय उत्तर देणार? असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या अधोगतीला सुरुवात
आपल्या घरातून एखादा माणूस एखादी वस्तू घेऊन जातो. ही वस्तू घरातच राहील, ही जबाबदारी कोणाची? महाराष्ट्राच्या घराची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे; त्यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे सांगू जितेंद्र आव्हाड म्हणाले, औद्योगिक प्रगतीमध्ये 1950नंतर किंवा त्याच्याआधीही उद्योग स्थापन व्हायला सुरुवात झाली. औद्योगिकीकरणात महाराष्ट्र हे देशात प्रथम क्रमांकावर राहिले होते. आता अधोगतीला सुरुवात झाली आहे. एकेकाळी परराज्यातील मुलांना महाराष्ट्रात नोकरी मिळायची. आता अशी वेळ आली आहे की आपल्या राज्यातील मुलांना नोकरीसाठी परराज्याची वाट धरावी लागणार आहे, यापेक्षा मोठे दुर्देवं नाही, असे डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

तुम्ही काय झोपले होते का?
प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याबद्दल महाविकास आघाडीवर खापर फोडले जात असले तरी महाराष्ट्रातील जनता दुधखुळी नाही. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन आता चार महिने होत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार जर महाविकास आघाडीच्या चुका झाल्या असतील तर चार महिने तुम्ही काय झोपले होते का? आज तुमची दिल्लीमध्ये चलती आहे. त्यामुळे तुम्ही एअरबसच काय रॉकेट लाँचरचा प्रकल्प महाराष्ट्रात आणायला हवा होता, असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -