घरमहाराष्ट्रतरुणाईचा ऑनलाईन डॉक्टरी सल्ल्याकडे कल

तरुणाईचा ऑनलाईन डॉक्टरी सल्ल्याकडे कल

Subscribe

मानसिक, लैंगिक आजारांबाबत विचारणा

ऑनलाईन खरेदीपाठोपाठ आता ऑनलाईन वैद्यकीय उपचार घेण्याकडेही लोकांचा कल वाढत आहे. औषध खरेदीपुरते मर्यादित असलेल्या वैद्यकीय क्षेत्रात आता डॉक्टरांचा सल्लाही ऑनलाईन मिळत असल्याने त्याला पसंती मिळत आहे. डॉक्टरांचा ऑनलाईन सल्ला घेण्यामध्येही वयस्कांपेक्षा तरुणांची संख्या अधिक आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे दैनंदिन वेळापत्रक फारच व्यस्त असल्याने आरोग्याच्या बाबतीत सध्याची तरुण पीढी फारच जागरुक होत आहे. व्यस्त वेळापत्रकामुळे डॉक्टरांकडे जाणे शक्य नसल्याने सध्या तरुणांकडून डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा ऑनलाईन सल्ला घेण्याकडे कल वाढत आहे. ऑनलाईन औषधे मागवण्याला प्राधान्य देणार्‍या तरुणांकडून आता डॉक्टरांचा सल्ला ऑनलाईन घेण्यात येत आहे. लैंगिक विकार, वेदना, मानसिकविकार, त्वचाविकार, इन्फेक्शन, वजन वाढणे व कमी करणे यासारख्या आजारांवर मोठ्या प्रमाणात डॉक्टरांचा ऑनलाईन सल्ला तरुणांकडून घेण्यात येत आहे.

- Advertisement -

सल्ला घेणार्‍यांमध्ये 20 ते 30 वयोगटातील तरुणांची संख्या 82 टक्के असून, याच वयोगटातील तरुणांची लैंगिक व मानसिक आरोग्याच्या समस्यांवर मार्गदर्शन घेण्याला अधिक पसंती आहे. यामध्ये 20 ते 25 वयोगटातील 73 टक्के तरुणांकडून तारुण्यपिटीका तसेच वीर्यस्खलन या लैंगिक आजारांवर विचारणा केली जाते तर 26 टक्के तरुणींकडून स्त्रीरोगासंदर्भात माहिती घेण्यात येते. 26 ते 30 वयोगटातील तरुणांकडून पुरळ येण्याबाबत सर्वाधिक विचारणा होते.

19 टक्के तरुणींकडून मासिक पाळीमधील अनियमितपणाबद्दल मार्गदर्शन घेण्यात येते. ऑनलाईन डॉक्टरांचा सल्ला घेण्यामध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण अधिक असले तरी स्त्रीरोगतज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याकडे महिलांचा कल अधिक आहे. त्यातही 30 वर्षांवरील स्त्रियांपेक्षा 20-30 वयोगटातील महिलांची याला अधिक पसंती आहे.

- Advertisement -

परदेशी कंपन्यांची गुंतवणूक
ऑनलाईन डॉक्टरांचा सल्ला घेण्याकडे नागरिकांचा वाढता कल पाहून परदेशी कंपन्याही या क्षेत्रात भारतात गुंतवणूक करू लागल्या आहेत. बेसेमर व्हेंचर पार्टनर्स आणि जपानी गुंतवणूक कंपन्या टेकमॅट्रिक्स कॉर्पोरेशन आणि डीएनए नेटवर्ककडून या व्यवसायामध्ये ७२ लाख डॉलर्स गुंतवले आहेत. तसेच जपानी व्ही सी कंपनी रिब्राइट पार्टनर्स यांनाही गुंतवणूक केली आहे.

2015 मध्ये ऑनलाईन डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्सअ‍ॅप सुरू झाले. त्यावेळी सल्ला घेण्यासाठी दरमहा 100 कॉल येत असत, परंतु 2019 मध्ये दोन लाख रुग्णांना पाच हजारहून अधिक डॉक्टर सल्ला देत आहेत. लोकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. – सतीश कनन, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉक्सअ‍ॅप

इंटरनेटवर सर्व माहिती सहज मिळत असल्याने तरुणांकडून त्याचा पुरेपूर वापर केला जातो. अनेकदा आमच्याकडे येणारे रुग्णच आम्हाला आजाराविषयी माहीत देतात. काहीजण एखाद्या आजारावरील नवी उपचार पद्धतीही सांगतात. अनेक डॉक्टरही ऑनलाईन सल्ला देण्याला प्राधान्य देतात. डॉक्टरांचा ऑनलाईन सल्ला घेण्यात कोणतीही अडचण नसली तरी, औषधे व उपचारासाठी डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे महत्त्वाचे आहे.
– डॉ. युसूफ माचीसवाला, ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ, जे. जे.हॉस्पिटल

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -