घरमहाराष्ट्रअजूनही 'त्या' प्रवाशांची हिमालयाखालूनच जीवघेणी पायपीट, प्रशासनाने दखल घेण्याची गरज

अजूनही ‘त्या’ प्रवाशांची हिमालयाखालूनच जीवघेणी पायपीट, प्रशासनाने दखल घेण्याची गरज

Subscribe

मुंबई : सीएसएमटी (CSMT) व टाइम्स ऑफ इंडिया कार्यालय परिसर यांना जोडणारा हिमालय पूल (Himalaya Bridge) 2019 रोजीच्या दुर्घटनेनंतर चार वर्षांनी पुन्हा एकदा अधिक मजबुतीने उभारून प्रवाशांसाठी 30 मार्चपासून खुला करण्यात आला आहे. या पुलाचा वापर पूर्वीप्रमाणे प्रवासी करू लागले आहेत; मात्र अनेक प्रवासी आजही हिमालय पुलाच्या खालील भागामधून म्हणजे रस्ता दुभाजक ओलांडून अगदी वाहतूक सुरू असताना जीवघेणा प्रवास करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

मार्च 2019मध्ये सायंकाळच्या सुमारास हिमालय पुलाचा मोठा भाग अचानक कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यामध्ये, सात जणांचा बळी गेला तर 32 जण जखमी झाले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेने (BMC) या पुलाचे जुने बांधकाम पूर्णपणे पाडून टाकले होते. त्यानंतर चार वर्षांनी विविध अडथळ्यांवर मात करून हिमालय पुलाची नव्याने उभारणी करण्यात आली. गेल्या 30 मार्च रोजी हा हिमालय पूल प्रवाशांसाठी पुन्हा एकदा खुला करण्यात आला. त्यामुळे हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

मात्र गेल्या चार वर्षांपासून प्रवाशांना पूल उभा होईपर्यंत रस्ता ओलांडून जीवघेणी पायपीट करावी लागत होती. आता हिमालय पूल नव्याने उभारल्यानंतर सीएसएमटी रेल्वेस्थानक व टाइम्स ऑफ इंडिया कार्यालय येथून ये – जा करणारे प्रवासी हिमालय पुलाचा वापर करतील, असे वाटत होते. त्यातील अनेकजण हिमालय पुलावरून प्रवास करताना दिसत आहेत. मात्र, तरीही काही प्रवासी आजही हिमालय पुलाच्या खालूनच रस्ता ओलांडून ये – जा करताना पाहायला मिळातात. अनेक प्रवासी विशेषतः तरुण मंडळी तर रस्त्यावर वाहतूक सुरू असतानाही जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडत असल्याचेही निदर्शनास येत आहे.

त्यामुळे या प्रवाशांना न रोखल्यास रस्ता ओलांडताना एखादा गंभीर अपघात होण्याची व त्यामध्ये एखादी जीवित हानी होण्याची अथवा कोणी गंभीर जखमी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र याबाबत वाहतूक पोलीस, मुंबई महापालिका यांनी गांभीर्याने विचार करून काही तरी तोडगा काढायला पाहिजे अथवा उपाययोजना करायला पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -